Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

मंदीचा तडाखा, त्यात उन्हाचा कडाका
थेट मतदारसंघातून (दक्षिण मध्य मुंबई)

शेखर जोशी / कैलास कोरडे

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखेपूर्वी ४८ तास अगोदर निवडणूक प्रचार समाप्त होतो. त्यामुळे मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघातील प्रचार २८ तारखेला सायंकाळी पाच वाजता समाप्त होईल. प्रचार संपायला बरेच दिवस शिल्लक असले तरी मुंबईला अद्यापही निवडणूक ज्वर चढलेला दिसत नाही. हा मतदारसंघही त्यास अपवाद नाही. मुंबईतील पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र मुंबईतील लोकसभा निवडणुकीचे वातावरण अद्याप तापले नसल्याचे दक्षिण मध्य मुंबईतही सर्वत्र ऐकायला मिळते. त्याची दोन कारणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाली. त्यापैकी एक म्हणजे आचारसंहितेमुळे पोस्टर व बॅनरबाजी पूर्णत: बंद झाली असून, गाडय़ांवर भोंगा लावून किंवा भिंती रंगवून वातावरणनिर्मितीचा जमाना राहिलेला नाही.

सर्वसामान्यांच्या वसाहतीत असावे पोलिसांचे घर !
विकास नाईक

बहुतेक पोलीस लाइन्स वसाहती कशा असू नयेत याचे उत्तम उदाहरण असतात. मोडकळीस आलेल्या इमारती, रंग उडालेल्या भिंती, तुटके जिने, गळकी गच्ची तर घरामध्ये पाण्याचे बाराही महिने दुर्भिक्ष्य, आवारामध्ये घाणीचे साम्राज्य, जप्त केलेल्या धूळ खात पडलेल्या गाडय़ा.. अशा अवस्थेतील पोलीस लाइन्स या बहुतेक करून पोलीस ठाण्यालगतच असतात. सहाजिकच पोलीस ठाण्याशी येथील मुलांचा रोजच संबंध येतो. तेथील वातावरणाचा विपरित परिणाम तेथील तरुण मुलांवर होतो. वसाहतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचे भाऊ-बहीण, आई अथवा वडील तसेच शेजारी-पाजारी सगळेच पोलीस कर्मचारीच असतात. त्यामुळे वसाहतीमधील चर्चा, गप्पांचा विषयही गुन्हा, गुन्हेगार आणि पोलीस यांच्याशी संबंधितच असतो.

अनधिकृत बांधकामावरून आयएएस-आयपीएस लॉबीत धुमशान
संजय बापट

भारतीय सनदी सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यांच्यात मोठेपणावरून विळ्याभोपळ्याचे नाते असले तरी अनधिकृत बांधकामावरील कारवाईवरून या दोन्ही लॉबीमध्ये पुन्हा एकदा धुमशान सुरू झाले आहे. मुख्य सचिवांसमोरच झालेल्या या धुमशानानंतर आता या वादावर ते कोणता तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांचा विषय सध्या सर्वांसाठीच डोकेदुखी ठरला आहे. उच्च न्यायालयानेही या प्रकरणावर कठोर भूमिका घेत जिल्ह्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली आहे. शिवाय निवडणूक काळातही अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई चालूच ठेवा, असेही आदेश दिले आहेत.

डॉ. होमी भाभा जन्मशताब्दीनिमित्त निबंध स्पर्धा
प्रतिनिधी

सन २००९ हे डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे जन्मशताब्दी वर्ष (३० ऑक्टोबर १९०९ ते २००९) असून, त्यानिमित्त भारतीय महिला वैज्ञानिक संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. कनिष्ठ गटामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी, तर वरिष्ठ गटामध्ये इयत्ता १२ वीवरील कुठल्याही शाखेत शिकणारे महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी ही स्पर्धा खुली आहे. निबंध स्पर्धेसाठी तीन विषय देण्यात आले असून, त्यापैकी एका विषयावर टंकलिखित अथवा सुवाच्य अक्षरात एक हजार शब्दमर्यादेपर्यंत निबंधलेखन करायचे आहे.

६५ वर्षांपूर्वी म्हणजेच १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईतील व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या जहाजाला लागेल्या आगीत अग्निशमन दलाच्या अनेक कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. ही आग आटोक्यात आणायला तब्बल तीन दिवसांचा अवधी लागला होता. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या स्मरणार्थ भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात स्मारकही उभारण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी १४ एप्रिल रोजी भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्याचप्रमाणे याच जवानांच्या स्मरणार्थ १४ ते २१ एप्रिल हा आठवडा अग्निसुरक्षा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो.

स्वातंत्र्यवीरांचे चरित्रगायन
प्रतिनिधी

ज्यांच्या लेखणीत, वाणीत केवळ प्रवचन नव्हते तर वचनबद्धता होती त्या स्वा. सावरकर यांना राष्ट्रासाठी समर्पण करणारा तरुण अभिप्रेत होता, असे विचार स्वा. सावरकर चरित्र गायक सतीश भिडे यांनी गीत वीर विनायक हा सांगीतिक कार्यक्रम सादर करताना व्यक्त केले. गजानन महाराज मंदिर, ठाणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समतानंद अनंत हरि गद्रे आणि राजा राममोहन रॉय यांनी यांनी जी वैचारिक उंची समाजाला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न आजचा तरुण राखू शकला तर भारत पुन्हा अखंड होऊ शकतो, असे आवाहनही भिडे यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाचे आयोजन विनय जोशी यांनी केले. त्यांना रोहित देव यांनी तबला साथ दिली. समतानंद गद्रे यांच्या कन्या जोशी आणि श्रीधर जोशी या वेळी उपस्थित होते.

वृक्षसौदर्याचा रसास्वाद येत्या शनिवारपासून
प्रतिनिधी

वातावरणात सध्या प्रचंड उकाडा असला तरी हा निसर्ग बहरण्याचा मोसम आहे. मुंबईतील रस्त्यांतून येता-जाता विविध फुललेले वृक्ष दृष्टीस पडतात. मुंबईतील या निसर्गसौंदर्याविषयी अनेकांनी फारशी माहिती नसते. अनेक वृक्ष पाहून माहीत असतात, पण त्यांचे नाव-गांव, वैशिष्टय़े, पर्यावरणातील त्यांचे महत्त्व या विषयी सर्वसामान्य तसे अनभिज्ञच असतात. आता या वृक्षवल्लरीची जवळून ओळख करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे शनिवार, १८ एप्रिल पासून तीन शनिवार-रविवार दुपारी ३ ते ६ या वेळेत ‘वृक्षसौंदर्याचा रसास्वाद’ या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात फोर्ट भागातील मुंबई विद्यापीठाचा परिसर, कुलाबा, वाळकेश्वर, राणीची बाग, पंच उद्यान (फाइव्ह गार्डन), सागर उपवन या ठिकाणी असलेल्या वृक्षांची माहिती देण्यात येईल. डॉ. चंद्रकांत लट्टू, डॉ. रंजन देसाई, डॉ. राजेंद्र शिंदे आणि डॉ. विद्याधर ओगले हे वृक्षतज्ज्ञ या उपक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. अधिक माहिती व प्रवेशिकांसाठी ‘मुंबई विद्यापीठ बहि:शाल विभाग, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पू.)’ या पत्त्यावर अथवा ६५९५२७६१ व ६५२९६९६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सुंदराबाई सभागृहात भव्य पुस्तक महोत्सव
प्रतिनिधी

आशीष बुक सेंटरने न्यू मरिन लाईन्स येथील सुंदराबाई सभागृहात आयोजित केलेला पुस्तक महोत्सव येत्या २८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पुस्तकप्रेमी आणि वाचकांना या भव्य पुस्तक महोत्सवास भेट देता येईल. या महोत्सवात सुमारे एक लाखांहून अधिक पुस्तके मांडण्यात आली आहेत. या पुस्तक महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे भारतासह जगभरातील नामवंत प्रकाशकांची विविध विषयांवरील इंग्रजी पुस्तकेही येथे असून कला, कथा, कादंबरी, कविता, पाकशास्त्र, व्यवस्थापन, आरोग्य, बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा यात समावेश आहे. महोत्सवात खरेदी केल्या जाणाऱ्या पुस्तकांवर चांगल्या प्रकारे सवलत देण्यात येणार आहे. चांगली पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे आयोजक दामजी निसार यांनी सांगितले. जास्तीत जास्त साहित्यप्रेमी आणि वाचकांनी या महोत्सवाला भेट द्यावी,असे आवाहनही निसार यांनी केले आहे.