Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

साखर, तेल, डाळी कडाडल्या महागाई निर्देशांक फसवा?
नगर, १४ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनाजिंकण्याची, तर मतदारांना वाढत्या महागाईची चिंता आहे. गेल्या आठ दिवसांत साखर व खाद्यतेलांत क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी दरवाढ झाली. डाळींबरोबर अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही कडाडले आहेत. महागाईचा निर्देशांक कमी झाल्याचे केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले जात असले, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईने घेरले आहे. विशेष म्हणजे आठ महिन्यांपूर्वी महागाईचा निर्देशांक बारा टक्के होता. तो आता ०.२२ टक्के इतका खाली आल्याचे जाहीर झाले.

‘‘सोयरेशाही’तील पुढाऱ्यांची स्वीस बँकेतील खाती तपासा’
थोरात, गडाख, राजळेंवर ढाकणेंचे टीकास्त्र
नगर, १४ एप्रिल/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील ‘सोयरेशाही’तील बऱ्याच पुढाऱ्यांची मुले परदेशात होती. त्यांची स्वीस बँकेतील खाती तपासून तो पैसा भारतात आणला पाहिजे, अशी सनसनाटी मागणी करताना माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी सोयरेशाहीतून थोरात, गडाख, राजळे यांनी सत्ता मिळूनही जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागास वंचित ठेवल्याचा आरोप केला. ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजप-शिवसेना युतीस पाठिंबा दिल्याचा पुनरूच्चार केला.

पाचपुतेंनी डोक्यावर बर्फ ठेवूनच माझ्यावर टीका करावी - जगताप
युतीच्या मेळाव्यात नागवडेंची स्तुती
श्रीगोंदे, १४ एप्रिल/वार्ताहर
वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी डोक्यावर बर्फ ठेवून दहा वेळा विचार करून माझ्यावर टीका करावी. मला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचाही सात-बारा माझ्या खिशात आहे, अशा शब्दांत ‘कुकडी’चे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांनी पाचपुतेंना सुनावताना माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांची मात्र ‘प्रामाणिक व्यक्ती’ अशी स्तुती केली. शहरातील रत्नकमल मंगल कार्यालयात आज भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.

साई मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न कायम
राहाता, १४ एप्रिल/वार्ताहर

शिर्डीतील साई मंदिराच्या सुरक्षेसाठी सुरक्षा एजन्सीकडून अद्यापि माजी सैनिक उपलब्ध न झाल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्थानने संबंधित एजन्सीस दोन दिवसांत सुरक्षारक्षकांची नेमणूक न केल्यास कारवाईची नोटीस बजावली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर संस्थानने सुरक्षारक्षक नेमल्याची माहिती संस्थानचे संरक्षणप्रमुख दौलतगिरी गोसावी यांनी दिली.

.. आता लढाई निवडणुकीनंतर!
भ्रष्टाचाराची ७०० प्रकरणे अण्णांकडे
नगर, १४ एप्रिल/प्रतिनिधी
निवडणुकीपूर्वी मौन धारण करून राज्य सरकारची झोप उडवणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ऐन प्रचाराच्या धामधुमीत काय करीत आहेत? भ्रष्टाचाराचा ठोस पुरावा असलेल्या राज्यातील सुमारे ७०० प्रकरणांच्या कागदपत्रांची ते स्वस्थपणे, पण काळजीपूर्वक जुळवणी करीत आहेत. राळेगणच्या भेटीत अण्णांनीच ‘लोकसत्ता’ला ही माहिती दिली.

‘महात्माजींनंतर राहुल गांधीच..’!
कृपाशंकर सिंहांनी उडविली पवारांची खिल्ली
राहाता, १४ एप्रिल/वार्ताहर
महात्मा गांधीजींनंतर गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांची सुख-दुखे समजावून घेणारा राहुल गांधी हा पहिला नेता आहे, अशी भलामण करतानाच ‘पंतप्रधान होण्यासाठी संख्याबळ लागते. खयाली पुलाव खाऊ द्या सगळ्यांना,’ अशा शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी आज शरद पवार यांची खिल्ली उडविली.शिर्डीत साईदर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दहशतवादी हल्ले व सुरक्षेच्या कारणामुळे राज्यातील प्रचारदौऱ्यात सोनिया व राहुल गांधी रोड शो करणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

रंग प्रचाराचे
अजून भरपूर पळायचे आहे..
‘चलो, तिलक लगाओ’
राजू इनामदार

सकाळी साडेसहा वाजता दिलीप गांधी आपल्या घरात सांगतात. पांढरा शुभ्र सफारी, अर्थातच फुलबाह्य़ांचा, प्रसन्न चेहरा. सरोजभाभी पुढे येतात. त्यांच्या डोक्याला टिळा लावतात. त्यांच्याबरोबरच सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांनाही! श्रीकांत साठे, उदय अनभुले, अनिल शर्मा आणि आणखी बरेच. गंध लावून झाल्यावर प्रत्येकाच्या हातावर गुळाचा खडा!
हे सर्व रोजचे. तसेच आताही, निवडणुकीच्या ऐन धामधुमीतसुद्धा! सगळे झाले की मग गांधींचा दिवस सुरू होतो. भाजपचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीप गांधींचा दिवस.

‘सोनिया गांधी व खासदार विखेंसाठी निवडणूक गांभीर्याने घ्या’
निझर्णेश्वराच्या साक्षीने मंत्री विखेंचे आवाहन
राहाता, १४ एप्रिल/वार्ताहर
आठवलेंना उमेदवारी म्हणजे खासदार बाळासाहेब विखे यांच्या विचारावर शिक्कामोर्तब. मतदारसंघात काही उलटेपालटे घडल्यास त्याचे उत्तर कोण देणार, असा सवाल करतानाच सोनिया गांधी व खासदार विखे यांच्या प्रतिष्ठेला बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी निवडणूक गांभीर्याने घेऊन शेवटपर्यंत निरोपाची, आदेशाची वाट न बघता निरपेक्षपणे आठवलेंच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

विखे समर्थकांची भूमिका निर्णायक
राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी तालुक्यात प्रारंभापासूनच प्रचारात आघाडी घेतली. भाजपचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर उमेदवार दिलीप गांधी यांनाही वातावरण चांगले दिसते. अपक्ष राजीव राजळे यांच्या नातेवाईक व विकास मंडळाच्या शिवाजी गाडे यांची फौज पाठिशी उभी राहिल्याने तालुक्यात तिरंगी लढत होऊन चुरस निर्माण झाली आहे. विखेसमर्थकांची भूमिकाही निर्णायक ठरू शकते.

कर्डिलेंची आघाडी रोखण्याचे आव्हान
माजी खासदार दादा पाटील शेळके यांची भक्कम साथ, प्रचारातील सुसूत्रता, स्थानिक उमेदवार म्हणून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी तालुक्यात प्रचारात आघाडी घेतल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांना प्रचार यंत्रणेतील ढिलाईमुळे चांगलेच झुंजावे लागत आहे. दोन्ही उमेदवारांवरच्या नाराजांवर अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांची भिस्त आहे. स्वतच्या तालुक्यातून मोठी आघाडी कर्डिलेंना अपेक्षित असून, त्यावरच त्यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. कर्डिलेंची आघाडी रोखण्याचे गांधी व राजळे यांच्यासमोर आव्हान आहे.

स्वतंत्र विद्यापीठ, रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, रस्ते विकास..
राजळे यांचा ‘परिवर्तना’चा जाहीरनामा
नगर, १४ एप्रिल/प्रतिनिधी
‘संकल्प परिवर्तनाचा, भविष्य बदलण्याचा’ असे आवाहन करणारा जाहीरनामा अपक्ष उमेदवार आमदार राजीव राजळे यांनी आज प्रसिद्ध केला. जिल्ह्य़ासाठी स्वतंत्र विद्यापीठ, नगर शहरास मुंबईप्रमाणे पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅसपुरवठा, गरिबांसाठी घरकुले, कल्याण-बीड-परळी व दौंड-नगर-मनमाड रेल्वेमार्गाचे दुपरीकरण व विद्युतीकरण, कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय मार्ग पूर्ण करणे, डी-झोनची अंमलबजावणी आदी आश्वासने त्यांनी जाहीरनाम्यात दिली आहेत.

निवडणुकनामा
गलबला जोरात सुरू आहे..

निवडणुकीचा गलबला जोरात सुरू आहे. कोणी म्हणतंय देशाचे धोरण ठरवणारी ही निवडणूक आहे, कोणाला सोनिया गांधींचे हात बळकट करायचे, तर कोणाला पंतप्रधानपदी शरद पवारांना बसवायचंय. कोणी दोन रुपयांत तांदूळ देतोय, तर कोणाला सात-बारा कोरा करायचाय! प्रचाराचा गलबला जोरात सुरू आहे.

भक्तिभावाचा खेळ व मेळ!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे हनुमान भक्त आहेत. भक्तीमुळेच त्यांना निवडणूक जिंकता आली असल्याचा शोध शिर्डी मतदारसंघातील श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईभक्त उमेदवाराला लागला. ओबामाप्रमाणेच आपल्यालाही निवडणूकजिंकता येईल, या आशावादातून ते दिवसभर प्रचार करताना नेहरू शर्टच्या खिशात हनुमानाची मूर्ती ठेवत आहेत. ओबामाप्रमाणे हनुमान आपल्याला पावेल, असा त्यांचा ‘होरा’आहे.

मुखवटे
‘तुम्ही पुतळे तयार करता म्हणे!
मुखवटेही करत असाल ना?’
सदोबा प्रचारातल्या धामधुमीतून वेळ काढून शिल्पकाराला भेटायला आला होता. मुंबई, पुण्यात, दिल्ली, लखनौत नेत्यांचे मुखवटे रस्तोरस्ती मिळतात. सोनिया, अडवाणी, लालूप्रसाद, बहेनजी यांचे मुखवटेही पॉप्युलर झालेत. आपल्याकडे असे मुखवटे का नाही मिळत? सहा-सहा तालुक्यांत फिरताना उमेदवाराचे काय हाल होतात! मुखवटे असले की किती त्रास वाचेल! कुणाही कार्यकर्त्यांने मुखवटा चढवायचा आणि हात जोडत प्रचारफेऱ्या काढायच्या!

दहशतवादाविरोधात युतीचे कठोर सरकार हवे - जैन
कोपरगाव, १४ एप्रिल/वार्ताहर

देशात दहशतवाद मोठय़ा प्रमाणात फोफावत असून, केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार या प्रश्नी निद्रिस्ताची भूमिका घेत आहे. दहशतवाद थांबविण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे कठोर भूमिका घेणारे सरकार पाहिजे, असे मत शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांनी येथे व्यक्त केले.
शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी मुळीच कळवळा नाही. क्रिकेट सामने व चीअर गर्लस्चे समर्थन ते करीत असल्याची टीकाही त्यांनी येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत केली.
शिवसेना उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुलसीदास खुबाणी होते. आमदार अनिल राठोड, वाकचौरे, काका शेखो, कैलास जाधव, जगन्नाथ आढाव आदी उपस्थित होते. गेल्या १० वर्षांत एक मेगाव्ॉट विजेची निर्मितीही झाली नाही. आता मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एक मिनिटाचीही वीज जाऊ दिली जाणार नाही असे सांगतात, अशी टीका जैन यांनी केली. प्रास्ताविक डॉ. अजेय गर्जे यांनी केले. वाकचौरे यांनी ‘कोपरगावचा जावई’ म्हणून निवडून देण्याचे आवाहन केले.


तहसीलदारांना सिलेंडर देऊन गांधीगिरी
कोपरगाव, १४ एप्रिल/वार्ताहर

शहरातील सरकारी कार्यालयांत अग्निशमनाची व्यवस्थाच नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी कार्बनडाय ऑक्साईडचे सिलेंडर तहसीलदारांना भेट देऊन गांधीगिरी केली. श्री. काळे यांनी गेली दोन वर्षे याबाबत पत्रव्यवहार केला. ऑगस्ट महिन्यात दिलेल्या अर्जावर काय कारवाई केली हे विचारले असता, त्याचे उत्तर आजवर मिळाले नाही. नगरपालिक, न्यायालये, वखार महामंडळाचे गोदाम, ग्रामपंचायत कार्यालये, एस. टी. स्टँड, पंचायत समिती आदी सरकारी, निमसरकारी कार्यालयांत अग्निशमनाची सिलेंडर्स मोकळी अथवा कालबाह्य़ झालेली आढळतात. आज अग्निशमन दिन म्हणून पाळला जातो. त्या पाश्र्वभूमीवर श्री. काळे यांनी तहसीलदारांना कार्यालयात जाऊन कार्बनडाय ऑक्साईडचे छोटे सिलेंडर भेट दिले. अग्निशमनाची साधने ठेवता येत नसतील, तर अग्निशमन दिन साजराच करू नका, असे निवेदन काळे यांनी दिले.

कालव्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला
राहाता, १४ एप्रिल/वार्ताहर

प्रवरा डाव्या कालव्यावर मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आज सकाळी पावणेअकरा वाजता प्रवरानगर येथील प्रवरा डाव्या कालव्याच्या नेहरू पुलाजवळ मिळाला. प्रकाश सुरेश पलघडमल (वय २२, राहणार सात्रळ, तालुका राहुरी) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. सोमवारी दुपारी मयत प्रकाश हा लोणी-पाथरे रस्त्यावर प्रवरा डाव्या कालव्यात मित्रांसह पोहत होता. परंतु त्याला पोहता येत नसल्यान तो वाहून गेला. त्याचा शोध पोलीस व त्याच्या नातेवाईकांनी घेतला. परंतु तो सापडला नाही. त्याचा मृतदेह आज सकाळी प्रवरानगर येथे कालव्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

तलाठय़ाच्या श्रीमुखात भडकावल्याने एकास अटक
कोपरगाव, १४ एप्रिल/वार्ताहर

पिवळे रेशनकार्ड न दिल्याचा राग आल्याने एकाने तलाठय़ाच्या श्रीमुखात भडकावली. पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद करून एकास अटक केली. तालुक्यातील वारी येथे आरोपी बाबासाहेब नामदेव लकारे याने तलाठी रमेश एकनाथ राक्षे यांच्याकडे पिवळ्या रेशनकार्डची मागणी केली. ते न दिल्यने राग आल्याने लकारे याने तलाठी राक्षे यांच्या तोंडात मारली. सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून तलाठी राक्षे यांनी बाळासाहेब लकारे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
राहाता, १४ एप्रिल/वार्ताहर

रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पादचारी जागीच ठार झाला. हा अपघात नगर-मनमाड रस्त्यावर साकुरी शिवारात आज मध्यरात्री झाला.
महेंद्र दत्तात्रय हादगे (वय ३०, राहणार साकुरी) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. महेंद्र रात्री साडेबाराच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्याने डांगे रुग्णालयासमोरून घराकडे जात होता. त्यास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन फरार झाले.

खंडेरायामहाराजांची यात्रा उत्साहात
राहुरी, १४ एप्रिल/वार्ताहर

शहराचे ग्रामदैवत श्रीखंडेरायामहाराजांची यात्रा मोठय़ा उत्साहात पार पडली. दोन हजार कावडय़ांनी श्रीखंडेरायाला जलाभिषेक केला. यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामदैवत खंडेरायामहाराज यात्रेनिमित्त पुणतांब्याहून आणलेल्या पवित्र जलाची, कावडय़ांची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. सुमारे २ हजार कावडय़ांचा त्यात समावेश होता. दुपारी बारा गाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी तो पाहण्यासाठी खंडोबा मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली.
नांदूर रस्त्यालगत मैदानात कुस्त्यांचा फड रंगला. यात अनेक नामवंत मल्ल सहभागी झाले होते. खंडोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. खंडोराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे, यात्रा समितीचे अध्यक्ष बापूसाहेब वराळे, दत्तात्रेय येवले, अशोक पवार, धनंजय मेहेत्रे, डावखर, भुजाडी आदींनी यात्रा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

‘आठवले यांना मताधिक्य द्यावे’
नेवासे, १४ एप्रिल/वार्ताहर
मराठा आरक्षणाला सर्वप्रथम पाठिंबा देणारे, तसेच सर्वाधिक क्रियाशील खासदार ठरलेल्या रामदास आठवले यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य द्यावे, असे आवाहन प्रशांत गडाख यांनी केले.
गडाख यांनी शिरसगाव, वरखेड, सलाबतपूर गोगलगाव, खडके आदी गावांत दौरा केला. दोन दिवसांत त्यांनी ९ सभा घेतल्या. शिरसगाव येथेही मोठी सभा झाली. अण्णासाहेब पठारे, महेश मापारे, हरिभाऊ दरंदले वैभव नहार आदी प्रचारात सहभागी झाले होते. महेश मापारी यांनी आपल्याला काम करणारा खासदार मिळेल, असे स्पष्ट केले. आमदार यशवंतराव गडाख यांच्या आदेशानुसार व त्यांचे हात बळकट करण्यासाठी आठवले यांना मोठे मताधिक्य द्यावे, असे आवाहन केले.

अलका कर्डिलेंची पाथर्डीत प्रचारफेरी
पाथर्डी, १४ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी अलका कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज शहरातून फेरी काढली. सुवर्णा कोतकर, वैशाली कोतकर, सुभांगी शेलार, नगरच्या पं. स. सभापती नंदा शेंडगे, संगीता भगत, आदी प्रचारफेरीत सहभागी झाल्या होत्या.

नगरच्या गुरुद्वारांमध्ये बैसाखी उत्साहात
नगर, १४ एप्रिल/प्रतिनिधी

खालसा पंथाचा स्थापना दिन अर्थात बैसाखीचा सण येथील गुरुद्वारांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुसिंग सभा गुरुद्वारा (गोविंदपुरा), नानक दरबार गुरुद्वारा (तारकपूर), एसी डेपो गुरुद्वारा (कोठला) येथे आज विविध धार्मिक कार्यक्रम झाले. कीर्तनकार दीपपाल सिंग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देश व धर्माच्या रक्षणाकरिता खालसा पंथातील गुरूगोविंद सिंगजी कुटुंबासह शहीद झाले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शीखधर्मियांनी देशाचे रक्षण करावे. कर्नलसिंग मांगर, प्रीतम कौर चावला, तेजिंदर कौर लुधियानावाले यांचेही कीर्तन झाले. दि. २४ मार्चपासून गोविंदपुरातील गुरुद्वारात सुरू असलेल्या अखंड पाठकीर्तनाचा आज भंडाऱ्याने समारोप झाला. महापौर संग्राम जगताप, नगरसेवक संजय गाडे, इंद्रसिंग धुप्पड, व्ही. एन. अ‍ॅबट आदी या वेळी उपस्थित होते. हरजितसिंग वधवा यांनी आभार मानले. भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

डीएलबी प्रतिष्ठानतर्फे बुद्धिबळ महोत्सव
नगर, १४ एप्रिल/प्रतिनिधी
डीएलबी प्रतिष्ठानच्या वतीने दि. २४पासून तीन दिवसांचा बुद्धिबळ महोत्सव आयोजित करण्यात आला असून, विजेत्यांना तब्बल ४० हजारांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.संस्थेचे अध्यक्ष यशवंत बापट यांनी ही माहिती दिली. स्पर्धा तीन वयोगटात होईल. १२ वर्षांखालील वयोगटात (कै. दाजी विनायक मुळे स्मरणार्थ) २०० रुपयांपासून १ हजारांपर्यंत, २० वर्षांखालील वयोगटात (कै. गबाजी भाऊराव चौरे स्मरणार्थ) ३०० ते २ हजार ५००पर्यंत व खुल्या गटास ४०० ते ५ हजारांपर्यंत अशी प्रत्येकी १० बक्षिसे दिली जातील, असे सचिव श्याम कांबळे यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक गटात उत्तेजनार्थ १० करंडक दिले जातील. विजेता व उपविजेत्यास फिरता करंडक मिळेल. स्पर्धा सुयोग मंगल कार्यालयात होतील. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विष्णू कुद्रे, राजा रासने, विवेक मुळे, सुबोध ठोंबरे, तेजस अतितकर, विनायक शिवरात्री प्रयत्नशील आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी श्री. बापट, यशवंत होजिअरी, जयश्री मार्केट, नवीपेठ, नगर यांच्याशी (मोबाईल ९३२६०९२५०१ किंवा ०२४१-६९५७१५२) संपर्क साधावा.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षपदी संजय जोशी
नगर, १४ एप्रिल/प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहराध्यक्षपदी डॉ. प्रकाश गरूड, कार्याध्यक्षपदी पत्रकार संजय जोशी, तर उपाध्यक्षपदी भारतभूषण भागवत यांची निवड झाली. समितीचे राज्य निरीक्षक हेमंत धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व वसंतराव सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत विनायक सापा (कार्यवाह), भाऊसाहेब चौधरी (वैज्ञानिक जाणिवा प्रसारप्रमुख), बाळासाहेब जगधने (उपक्रम सचिव), नागेश कुसळे (प्रकाशन वार्तापत्र), अतुल पाडळकर, चेतन अमरापूरकर (युवा) यांचा समावेश आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सायंकाळी ६ वाजता सावेडी रस्ता, श्रद्धा हॉटेलसमोरील डॉ. गरूड हॉस्पिटलच्या तळघरात संघटनेची बैठक होणार आहे. अंधश्रद्धेबाबतच्या तक्रारींसाठी नागरिकांनी मोबाईल ९८२२०४०३७५, ९४२३७१३३१६, ९४२२२२६४९५वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘सावेडीचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन’
भाजप-सेनेचा इशारा
नगर, १४ एप्रिल/प्रतिनिधी
सावेडीतील पाणीपुरवठा येत्या ८ दिवसांत सुरळीत झाला नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त कल्याण केळकर यांना देण्यात आला. सावेडी विभागांतर्गत येणाऱ्या प्रभाग ८, ९, १०, १५, १७ व १८मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही कार्यवाही झालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. भाजपचे शहराध्यक्ष अनंत जोशी यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब वाकळे, नीलिमा गायकवाड, नितीन शेलार, संगीता खरमाळे, सुमन गंधे, सोनाबाई तायगा शिंदे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम या वेळी उपस्थित होते.