Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

मोहन भागवत, कुप्प. सी. सुदर्शन यांच्याशी बंदद्वार चर्चा
उद्धव ठाकरे यांनी घेतले संघ नेत्यांचे आशीर्वाद

नागपूर, १४ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस शिल्लक असतानाच शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयी जावून आजी सरसंघचालक मोहन भागवत आणि माजी सरसघचालंक कुप्प. सी. सुदर्शन यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा बंदव्दार होती. ही सदिच्छा भेट होती, असे नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावर शिवसेनेने मोठे आंदोलने केलीत. यासाठी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांचा नागपूर येथे मुक्काम होत असे. मात्र त्यांनी यापूर्वी कधीही संघकार्यालयाला भेट दिली नाही. नागपूर आणि रामटेक येथे सभा झाल्यावरही त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत संघ मुख्यालयाच्या भेटीचा उल्लेख नव्हता. मात्र यवतमाळ जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असताना त्यांची ही भेट अचानक ठरली.

उमेदवारांना ‘आठवले’ बाबासाहेब!
नागपूर, १४ एप्रिल/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आणि युगनायक बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा योग साधून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दलित मतांवर डोळा ठेऊन केलेली मोर्चेबांधणी निवडणूक आयोगाच्या भाषणबंदीमुळे फोल ठरल्याचे चित्र आज रिझव्र्ह बँक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होते. लोकसभा निवडणुकीत दलित मते निर्णायक ठरत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना ती हवी असतात. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीही केली जाते. या निवडणुकीतही ती करण्यात आली. प्रचारादरम्यान सर्वच पक्षांनी दलित मतदारांना विविध आश्वासने दिली.मात्र प्रचाराच्या सांगतेच्या दिवशीच आंबेडकर जयंतीचा योग आल्याने सर्वच राजकीय पक्षांना दलित समाजाप्रती कळवळा दाखवण्याची एक आयती संधी चालून आली. एरवी आंबेडकर जयंतीच्या दिवशी विशिष्ट संघटना आणि ठराविकच राजकीय पक्षांचे नेतेच आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात. आज मात्र सर्वानाच आंबेडकर आठवले.

धडाक्याशिवायच प्रचाराची सांगता
नागपूर, १४ एप्रिल/ प्रतिनिधी

आचारसंहितेच्या धसक्यापोटी यावेळी लोकसभा निवडणूक प्रचाराची सांगता धडाक्याशिवायच झाली. मिरवणुका निघाल्या पण. त्या नित्याच्याच होत्या. त्यात प्रचाराच्या सांगतेचा जोश नव्हता. पदयात्रा, चौकसभा आणि मिरवणुका काढूनच उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराची सांगता केली.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्वच १० लोकसभा मतदारसंघात १६ एप्रिलला मतदान होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण विदर्भात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचाराला विदर्भातील वर्धा मतदारसंघातून सुरुवात केली.

मतदानाची खूण आता मधल्या बोटावर
नागपूर, १४ एप्रिल/ प्रतिनिधी

सर्वाधिक खर्च शिवसेनेचे कृपाल तुमाने यांचा
आचारसंहिता भंगाचे सर्वाधिक गुन्हे पुरोहितांवर
३५ मतदान केंद्रांवर बंदूकधारी सुरक्षा जवान तैनात
मतदानाची तयारी पूर्ण
मतदानानंतर मतदानाचा पुरावा म्हणून पारंपरिक पद्धतीने तर्जनीवर करण्यात येणारी शाईची खूण यंदा मध्यल्या बोटावर करण्यात येणार आहे. काही जिल्ह्य़ात नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायतच्या निवडणुकीत मतदात्यांच्या तर्जनीवर शाईची खूण करण्यात आली आहे.

पुरोहित बहुजनांसाठी तुरुंगातही गेले -बावनकुळे
नागपूर, १४ एप्रिल / प्रतिनिधी

भाजप-सेना युतीचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बनवारीलाल पुरोहित हे खऱ्या अर्थाने बहुजनांसाठी धावून जाणारे नेते आहेत. यापूर्वी भाजपचे खासदार असताना त्यांनी केलेली आंदोलने व शहरासाठी केलेली विकास कामे यांना तोड नाही. म्हणून बहुजन समाजातील मतदारांनी पुरोहित यांना प्रचंड मताने विजयी करावे, असे आवाहन आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. पुरोहित यांनी कोराडी प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी यासाठी आंदोलने केली. यासाठी त्यांनी आठ दिवस कारावासही भोगला. झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीबांच्या समस्यांकरिता सतत संघर्ष करताना नागपूरकरांनी पुरोहितांना बघितले आहे. मालकी हक्काच्या पट्टय़ाचा प्रश्न असो अथवा सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचा प्रश्न असो, पुरोहित सदैव संघर्षरत राहिले असल्याचे बावनकुळे म्हणाले. बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी नागपुरात सर्वात जास्त संघर्ष करणारा नेता जर कोणी असेल तर ते पुरोहित व सर्वाधिक संघर्ष करणारा पक्ष कोणता तर भाजप आहे. जनतेला भूलथापा देऊन मत मागणाऱ्या उमेदवारांपासून बहुजन समाजाने सावध रहावे. राजकारणात राहून स्वच्छ प्रतिमा कायम ठेवणारे व सामान्य माणसांकरिता धावून जाणारे बनवारीलाल पुरोहित यांना बहुजन समाजाने मोठय़ा संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

‘त्या’ घोटाळेबाजाला विद्यापीठाचे कवच
नागपूर, १४ एप्रिल/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कुलपतींच्या पत्रांना केराची टोपली दाखवायचा नवीन पायंडा विद्यमान कुलगुरूंनी पाडला आहे की काय अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. गुणपत्रिका आणि पुनर्मूल्यांकन घोटाळ्यात उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आणि दोन महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा भोगलेल्या सुनील मिश्रा याच्या अधिव्याख्याता पदाची मान्यता अद्याप विद्यापीठाने रद्द केलेली नाही. मिश्राची सेंट्रल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन ही संस्था महापालिकेने यापूर्वीच सीलबंद केली आहे. मिश्राच्या एकूण व्यवहारांवर कुलपती कार्यालयाकडून अधिव्याख्याता पदाची मान्यता काढण्याबद्दल १८ मार्चला कुलगुरूंना मान्यता रद्द करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे राज्य शासनानेही विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे पत्र व्यवहार करून यासंदर्भात निर्णय निर्देश दिले आहेत. स्वत: कुलपती आणि राज्य शासनानेही मिश्राच्या अधिव्याख्याता पदाची मान्यता काढण्याचे निर्देश दिले असताना झोपेचे ढोंग करीत असलेल्या विद्यापीठाला त्याचे काहीही अप्रूप नाही. मिश्राला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप प्रकाश बन्सोड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. यासंदर्भात पत्र न आल्याचा खुलासा कुलसचिव सुभाष बेलसरे यांनी केला आहे.

तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
नागपूर, १४ एप्रिल / प्रतिनिधी

भगवान नगरात राहणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सापडल्याने खळबळ उडाली आहे. जयपाल रघुनाथ भुते हे त्याचे नाव आहे. दीपक पसीने व मनीश गोडसेलवार या दोघांसह तो सहा महिन्यापासून भाडय़ाने राहत होता़ दीपक व मनीश दोघेही बाहेरगावी गेले होते. सोमवारी दुपारी मनीश खोलीवर परतला तेव्हा त्याला जयपाल मृतावस्थेत दिसला. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. विषारी द्रव्याचा डब्बाही बाजूला पडला होता. त्याने लगेचच अजनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तरुणाची आत्महत्या प्रफुल नत्थुराम चिवडे (रा. स्मृती नगर) याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याच्या वडिलांना दिसला. घराच्या छताच्या पंख्याला ओढणीने गळफास स्थितीत मृतदेह होता. हे समजताच कोराडी पोलीस तेथे गेले. पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. कोराडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

ट्रकच्या धडकेने मोटारसायकल चालकाचा मृत्यू
नागपूर, १४ एप्रिल / प्रतिनिधी

ट्रकच्या धडकेने मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. सावनेरपासून सात किलोमीटर अंतरावरील माळगाव येथे ८ तारखेला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. एमएच ३१ सीएफ ४०३४ क्रमांकाच्या मोटारसायकलने अरुण शेषराव बागडे (रा. ताबगाव खैरी मध्य प्रदेश) हा जात असताना विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या ट्रकने त्याला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अरुणला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या अनोळखी मोटारसायकल चालकाविरुद्ध सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

५० हजाराची दारू जप्त; दोघांना अटक
नागपूर, १४ एप्रिल / प्रतिनिधी

इमामवाडा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर रामबाग व बारासिग्नल या दोन वस्त्यांमधील दोन घरी छापा टाकून दारूचा मोठय़ा प्रमाणावर अवैध साठा जप्त केला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुरुवारी लोकसभेसाठी मतदान होत असून आजपासून तीन दिवस मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ऐन मतदानाच्या आधी दुकाने बंद असल्याने मद्य शौकिन आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची पंचाईत झाली. बंदी काळात दुपटीने दारू विकली जात असल्याने दारूचा अवैध साठा करून ठेवला असल्याचे समजताच इमामवाडय़ाचे पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रामबाग व बारा सिग्नल या दोन वस्त्यांमधील दोन घरी छापा मारला. देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या खोक्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी एकूण ५० हजार रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी योगेश ऊर्फ बंडू रूपलाल ब्राह्मणे (रा. बारासिग्नल) व धर्मा रामटेके (रा. रामबाग इमामवाडा) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फुटाळा वस्तीत छापा मारून देशी दारूच्या २८८ बाटल्या (प्रत्येकी १८० मिलि.) किंमत ७ हजार २०० रुपये जप्त केला. या अवैध साठा करणाऱ्या आरोपी कमला दिवाकर कळस्कर हिला अटक करण्यात आली.