Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
ऐतरेयोपनिषद : उत्तरार्ध

 

या उपनिषदातले ऋषी म्हणतात- ‘आत्म्याशिवाय हा देह कसा जिवंत राहील व आपण या देहात कसे शिरावे, असा विचार करून मस्तकावरील भांग काढण्याची जागा चिरून त्या द्वाराने आत्म्याने शरीरात प्रवेश केला.’ याला विदृती म्हणतात. हे आनंदस्थान असून, योगी आनंद भोगतात. जन्माला येणारा जीव बापाच्या ठिकाणी रेतरूपात असतो. यावर अनाम ऋषी म्हणतात, ‘मी गर्भात असतानाच देवांचे सर्व जन्म जाणले.’ असे ज्ञान ज्याला झाले ते वामदेवऋषी. यांनी आत्म्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि आत्मचिंतनातून त्यांना असे जाणवले, हृदयस्थ आत्मा हा मनाचा प्रकाशक आहे. जाणणे, विवेक, दृष्टी, धैर्य, विचार, स्मृती, संकल्प इ. सर्व वृत्ती जाणिवेचेच व्यक्त प्रकार आहेत. प्रज्ञान हेच ब्रह्म होय. जे जे सजीव, चालणारे, उडणारे आणि निश्चल आहेत ते सर्व प्रज्ञाननेत्र आहेत. प्रज्ञान म्हणजे शुद्ध जाणीव. हेच आत्म्याचे खरे रूप आहे. विश्वातली जाणीव ओळखायला हवी. आपल्या जाणिवा देहापुरत्या चिपकलेल्या असतात. ‘मी.. मी.. मीच’ बस्! एवढय़ाच! यातून फक्त विकार वाढतात, नि ते आपली मने व नाती गढूळ करतात. यात वासना, राग, पैशाची हाव, द्वेष हे असतात. या साऱ्यांना ठेचायचे असेल आणि शुद्ध जाणिवेतले विश्व अनुभवायचे असेल तर ईश्वरोपासना नक्कीच करायला हवी. दृष्टी सतत तपासावी. ज्या विचारांनी आपण वाटचाल करतो आहोत त्याची सत्यासत्यता पारखायला हवी. संत ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात म्हणतात,
मग तिहीं जें जें करावें। ते मजचि पडिलें आघवें।
जैशी अजात पक्षांचेनि जीवें। पक्षिणी जिये।।
आपुली तहानभूक नेणें। तान्हया निकें तें माऊलीसीचि करणें।
तैसें अनुसरले जे मज प्राणें। तयांचेन काइसेनिहि न लजें मी।।
यशवंत पाठक

कु तू ह ल
विध्वंसक अशनी
मोठा विध्वंस घडवून आणणारे अशनी पृथ्वीवर केव्हा आदळले आहेत?
अलीकडच्या काळात अशनीमुळे घडलेली मोठी विध्वंसक घटना ही शंभर वर्षांपूर्वीची आहे. दिनांक ३० जून १९०८ रोजी रशियातल्या टुंगुस्का नदीजवळ लागलेल्या प्रचंड आगीस तीस मीटर आकाराचा अशनी कारणीभूत ठरला. हा अशनी जमिनीपासून ५ ते १० किलोमीटर उंचीवर असतानाच स्फोट होऊन फुटला असावा. या वेळी लागलेल्या आगीत सुमारे दोन हजार चौरस किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला. महाराष्ट्रातलं लोणार इथलं पावणेदोन किलोमीटर व्यासाचं विवर, तसंच अमेरिकेतल्या अ‍ॅरिझोनामधील सव्वा किलोमीटर व्यासाचं बॅरिंजर विवर ही दोन्ही विवरंसुद्धा चाळीस ते पन्नास मीटर आकाराच्या अशनींच्या आघातातून निर्माण झाली आहेत. हे दोन्ही आघात सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी घडले असावेत.
या सगळय़ा घटना क्षुल्लक ठरतील अशी घटना साडेसहा कोटी वर्षांपूर्वी घडली. या वेळी पंधरा किलोमीटर व्यासाच्या एका अशनीने पृथ्वीला धडक दिली. या आघातात उफाळलेली ऊर्जा ही दहा अब्ज अणुबॉम्बच्या एकत्रित ऊर्जेइतकी प्रचंड होती. या आघातामुळे मध्य अमेरिकेच्या चिक्शुलूब परिसरात निर्माण झालेल्या विवराचा व्यास १८० किलोमीटर इतका मोठा आहे. या घटनेत सर्वत्र मुक्तपणे वावरणाऱ्या डायनोसॉर्ससह पृथ्वीवरील ७५ टक्क्यांहून अधिक जीवसृष्टी नष्ट झाली. या अगोदर दोन अब्ज वर्षांपूर्वीही सुमारे दहा किलोमीटर व्यासाचा एक अशनी पृथ्वीवर धडकला होता. बहुपेशीय जीवसृष्टी अस्तित्वात येत असलेल्या काळात झालेल्या या आघाताची साक्ष आजच्या दक्षिण आफ्रिकेतील व्रेडफोर्ट इथल्या तीनशे किलोमीटर व्यासाच्या विवराकडून मिळते. अंटाक्र्टिकावरील विल्क्स् लँड येथील बर्फाखाली गाडला गेलेला पाचशे किलोमीटर व्यासाचा विवरसदृश भूभाग हासुद्धा पंचवीस कोटी वर्षांपूर्वी कोसळलेल्या पन्नास किलोमीटर आकाराच्या अतिप्रचंड अशनीच्या आदळण्यातून निर्माण झाला असावा.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
मोरोपंत
मराठी साहित्यविश्वातील काव्यदालन समृद्ध करणाऱ्या मोरोपंतांचे निधन १५ एप्रिल १७९४ रोजी झाले. सन १७२९ च्या सुमारास मोरोपंतांचा जन्म झाला. पेशव्यांच्या मराठी राज्यात उत्सव समारंभात त्यांची कीर्तने होत असल्यामुळे त्यांची कविता सर्वत्र पसरली. पंतांनी पाऊण लाखाच्यावर कविता लिहिल्या. त्यातील निम्म्या आर्यावृत्तात आहेत. अलंकारयुक्त रसाळ वर्णनशैली, स्वभावचित्रे, भाषाप्रभुत्व, निर्दोष वृत्तरचना, उत्कट भक्तिभावाचा रसाविष्कार, संघर्षमय संवाद हे त्यांच्या काव्याचे वैशिष्टय़. मोरोपंतांचे पूर्वज कोकणातून घाटावर आले. मोरोपंत बाबुजी नाईक निंबाळकर यांच्या पदरी पुराणिक होते. पुराण सांगता सांगता ते काव्यरचना करू लागले. लेखनाची सुरुवात ‘कुशल व्याख्यान’ या काव्यापासून झाली. याशिवाय ‘हरिश्चंद्राख्यान’, ‘प्रल्हाद विजय’, ‘सीतागीत’, ‘रुक्मिणीगीत’, देवी महात्म्य ही त्यांची स्फुटरचना. ‘कृष्णविजय’, ‘मंत्रभागवत’, ‘हरिवंश’ ही त्यांची मोठी काव्यरचना आहे. ‘आर्यभारत’ या ग्रंथामुळे ‘आर्यापदी’ ही पदवी त्यांना मिळाली. संपूर्ण महाभारत १७ हजार आर्यामध्ये गुंफून ‘आर्यभारत’ हा ग्रंथ पंतांनी निर्माण केला. मराठी भाषा समृद्ध करणारा कवी अशा लौकिकास पात्र असणारी मोरोपंतांची ही आर्या १५ एप्रिल १७९४ रोजी महाराष्ट्राला पोरकी झाली. याच दिवशी ज्वराच्या आजाराने त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
राया, नन्नी आणि चिक्का
राया शेरडे घेऊन दिवसभर रानात जायचा. कर्नाटकातल्या कतलन-कैरी नावाच्या छोटय़ाशा गावात तो आपल्या म्हाताऱ्या आईबरोबर राहायचा. समोरच्या घरात असणारा नन्नी, आजूबाजूच्या गल्ल्यांतले मित्र सगळे दिवसभर कुठे ना कुठे रानावनात, ओढय़ाकाठी भटकायचे. वनौषधी गोळा करायचे. कुणी गुरं राखायचे, कुणी शेरडं. रायाला रानात झाडाखाली छोटासा पक्षी दिसला. त्याने जवळ जाऊन पाहिले तर ते काकाकुवाचे पिल्लू होते. घरटय़ातून पडून उडत, धडपडत झाडाखाली आले होते. रायाला वाईट वाटले. त्याने पिलाला उचलून घरी आणले. ‘तुझे नाव चिक्का’ राया म्हणाला. पिलू मोठे होऊ लागले. रायाचा खांदाच चिक्काचे घर होते. दोघे कायम बरोबर असायचे. साऱ्या गावात ही जोडी कौतुकाचा विषय होती. राया म्हणे, ‘माझा चिक्का किती छान बोलतो बघा’! मित्र कौतुक करायचे, फक्त नन्नीच्या कपाळावर आठी उमटायची. त्याला रायाचा हेवा वाटायचा. आपल्याजवळ का नाही बोलणारा पक्षी असे वाटायचे. नन्नी रायाला चिक्कावरून घालूनपाडून बोलायचा. एकदा म्हणाला, ‘हा राया मूर्ख आहे. एवढा गुबगुबीत पक्षी शिजवून खायचा तर हा त्याच्या बोलण्याचे गोडवे गात त्याला खांद्यावर घेऊन फिरतो.’ राया चिडून नन्नीवर धावून गेला. दोघांची जुंपली. त्या भांडणानंतर राया कितीतरी वेळ धुमसत होता. त्याने मायेने चिक्काला गोंजारले. बदामाच्या झाडावरचे बदाम काढून दिले. चिक्का ते फोडून बी मटकावताना पाहताना तो हळूहळू आपला राग विसरून गेला. एके दिवशी सगळी मुले दिवसभराचे उद्योग करून घरी परतली. पण नन्नीचा पत्ता नव्हता. सारा गाव काळजीत पडला. नन्नी गेला कुठे? राया विचार करत होता. थोडय़ा वेळात काळोख गडद होईल. त्याला परतीची वाट दिसणार नाही. तरस किंवा लांडगा त्याला गाठेल. कल्पनेने तो शहारला. मित्रांना आणि चिक्काला तो म्हणाला, ‘नन्नीला शोधायला हवं’. जणू चिक्काला त्याचं बोलणं कळलं. त्यानं मोठय़ांदा आवाज केला. पंख फडफडवले आणि रानाच्या दिशेने झेप घेतली. सगळी पोरेही नन्नीला हाका घालत निघाली. अचानक चिक्काच्या ओरडण्याचा आवाज आला, ‘इदु ए नू..?’ (हे काय केलेस?) सगळे आवाजाच्या दिशेने धावले. अस्पष्ट आवाज आला, ‘मी इथे आहे. मला वर काढा.’ चिक्का सतत ओरडतच होता. एका लहान खड्डय़ात पडून नन्नीचा पाय मुरगळला होता. त्याला खड्डय़ातून वर येता येत नव्हते. बराच वेळ रडत बिचारा पडून होता. पाय सुजून भप्प झाला होता. अंग खरचटले होते. साऱ्यांनी मिळून त्याला वर आणले. थोराड अंगाच्या मतलनने त्याला पाठुंगळी घेतले. मतलन म्हणाला, ‘रायाचा चिक्का होता म्हणून सापडलास. नाहीतर रात्री काय झालं असतं तुझं?’ खजील चेहऱ्याने नन्नी म्हणाला, ‘चुकलं माझं राया.’ राया चिक्काला कुरवाळत हसला. चिक्का रायाच्या खांद्यावरून उडून नन्नीच्या थेट डोक्यावर जाऊन बसला आणि म्हणाला ‘इदू एनू..’ सगळेच हसायला लागले. मित्र तुमच्याशी दुष्टपणे वागतो किंवा तुमचा विश्वासघात करतो तेव्हा तुम्हालाही त्याच्याशी वाईट वागावेसे वाटते. पण त्याचा उपयोग होतो का? उलट मैत्री तुटते. त्याऐवजी शांत राहा. तुमची मैत्री तुटू देऊ नका. मित्र म्हणून त्याला अडचणीत, संकटात मदत करा. त्याची चूक त्याला कळेल. आजचा संकल्प- टोल्याला प्रतिटोला लगावण्याच्या इच्छेला मी दूर सारेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com