Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

‘देश जोडणाऱ्या प्रवृत्तींना मत द्या’
पनवेल/प्रतिनिधी -
कापाकापी करणाऱ्या प्रवृत्तींना दूर सारून देश जोडणाऱ्या प्रवृत्तींना मत द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी कळंबोली येथे मतदारांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मावळ मतदारसंघातून उभे राहिलेले आझम पानसरे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पानसरे यांना मत म्हणजे सोनिया गांधी, शरद पवार यांना मत, दिल्लीत यूपीए सरकार येण्यासाठी पानसरे यांना मत द्या, असे ते म्हणाले.

मनसे कार्यकर्ते संभ्रमात
पनवेल/प्रतिनिधी -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात ४८ पैकी १२ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, उर्वरित लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाला मतदान करायचे, यावरून मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. या ३६ मतदारसंघात मनसेने कोणत्याही पक्षाला पाठिंबा न दिल्याने कार्यकर्ते वैयक्तिक निर्णयानुसारच मतदान करतील असे दिसते; परंतु काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युती यापैकी कोणाच्या पारडय़ात दान टाकायचे, यावरून हा संभ्रम आहे.

‘दि. बा. पाटील यांच्या आशीर्वादामुळे पानसरे यांचा विजय निश्चित’
उरण/वार्ताहर -
बुजुर्ग लोकनेते दि. बा. पाटील यांचा आशीर्वाद लाभल्याने आझमभाई पानसरे यांना आता दिल्ली दूर नसल्याचा दावा काँग्रेस नेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी उरण येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी उमेदवारांच्या प्रचारासाठी १६ व १८ एप्रिल रोजी अनुक्रमे शरद पवार व अजितदादा पवार यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी-रिपाइं पदाधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नसल्याने एकत्रित पत्रकार परिषद घेणे शक्य न झाल्याचे सांगत ठाकूर यांनी दिलगिरी व्यक्त केली. उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, खालापूर मतदारसंघातून काँग्रेस- राष्ट्रवादी- रिपाइंचे उमेदवार पानसरे यांना ३० हजारांचे मतैक्य मिळेल, असा दावाही त्यांनी केला. रिपाइं आघाडीत असतानाही नेते मात्र विरोधकांच्या व्यासपीठावर बसत असल्याचे चित्र आहे. याचे खंडण करीत रिपाइं कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा वाद संपुष्टात आला आहे, असे ते म्हणाले. रामदास आठवले यांची सभा घेण्यात येणार असून जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्यासह ८० ते ८५ टक्के रिपाइं कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उमेदवारांच्या प्रचारात धर्मनिरपेक्षता, केंद्र व राज्य सरकारमार्फत झालेली विकासकामे याच मुद्दय़ांवर मते मागणार असल्याची माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी- काँग्रेस- रिपाइंचे पदाधिकारी प्रचारकार्यात जोमाने कामाला लागले असून, त्यामुळे पानसरे यांचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मावळमधील उमेदवार आमनेसामने
पनवेल/प्रतिनिधी -
मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा घाट पनवेलमधील ‘सिटिझन्स युनिटी फोरम’ या संस्थेने घातला आहे. शुक्रवारी १७ एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता खांदा कॉलनी येथील ‘श्री कृपा’ हॉलमध्ये सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ समीरण वाळवेकर या मुलाखती घेणार असून ‘चॅनल वन’ आणि ‘कर्नाळा आजतक’ या स्थानिक वाहिन्यांवरून त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. कार्यक्रमानंतर राज्यातील सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांवरूनही त्याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर असल्याने इच्छुकांनी आयोजकांकडून प्रवेशिका घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- ९३२३१५०६९७, २७४५४०९७.

‘उरणकरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार’
उरण/वार्ताहर -
मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे यांनी उरणकरांच्या समस्या या आपल्याच समजून सोडविण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
उरण परिसरात राष्ट्रवादीचे पानसरे यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. शहराच्या कोटनाका वेशीवरून सुरू झालेला प्रचार दौरा गावोगावी भेटी दिल्यानंतर संपला. दिवसभरातील या प्रचार दौऱ्यात काँग्रेसचे रामशेठ ठाकूर, श्याम म्हात्रे, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष वसंत ओसवाल आदी सहभागी झाले होते. प्रचार दौऱ्यानंतर जासई येथे जाहीर सभाही घेण्यात आली.
या सभेत पानसरे यांनी उरणकरांना भेडसाविणाऱ्या समस्यांचा ऊहापोह करून त्यांच्या समस्या आपल्याच समजून सोडविण्याला अधिक प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. मतदारांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी रामशेठ ठाकूर यांचेही भाषण झाले. त्यांनी शेकापवर टीका करताना शेकापची अवस्था आता ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली असल्याचे सांगितले. उरणच्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाइं आघाडीचे उमेदवार पानसरे यांनाच निवडून देण्याचे आवाहन रामशेठ यांनी यावेळी केले.

बाबर यांचा सेझवर हल्लाबोल
उरण/वार्ताहर -
शेतकऱ्यांवर येऊ घातलेल्या सेझचे संकट दूर करण्यासाठी सेना-भाजप-शेकाप-पीआरपी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील सेना उमेदवार गजानन बाबर यांनी उरण-चिरनेर येथील जाहीर प्रचार सभेतून केले. उरण तालुक्यातील चिरनेर व नवीन शेवा येथे बाबर यांच्या प्रचारार्थ प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बबन पाटील, नरेश रहाळकर, दिनेश पाटील, शेकाप आमदार विवेक पाटील, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनोहर भोईर, नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, भाजप जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील व युतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बाबर यांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या सेझच्या पाठी शरद पवारच असल्याचा आरोप केला. उरण-पनवेलच्या शेतकऱ्यांचे याआधी सिडकोने वाटोळे केले आहे. त्यात आता सेझची भर पडू लागली आहे. शेतकऱ्यांवरील हे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही बाबर यांनी यावेळी दिले. यावेळी विवेक पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसला गाडण्याचे आवाहन करून बाबर यांनाच विजयी करा, असे ते म्हणाले. बाबर हे सेनेचे नसून शेकापचेच उमेदवार आहेत. म्हणून शेकापने पुढाकार घेऊन त्यांना निवडून आणावे, असे आवाहन बबन पाटील यांनी केले. यावेळी पीआरपीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनोहर भोईर यांनीही बाबर यांना निवडून देण्यासाठी आवाहन केले.

खारघरमधील युको बँकेवर दरोडा
१.९० लाख रु. लंपास

पनवेल/प्रतिनिधी - खारघरच्या सेक्टर-२१ मधील युको बँकेवर सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून एक लाख ९० हजार रुपयांची रोख लंपास केली. या दरोडेखोरांनी ग्राहकांचे पाच मोबाईल फोनही चोरून नेले. दोन चॉपर आणि दोन रिव्हॉल्व्हरसह बँकेत घुसलेल्या पाच तरुणांनी शाखा व्यवस्थापक मांगले यांच्याकडे तिजोरीच्या किल्ल्यांची मागणी केली. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र डांबून या चोरटय़ांनी रोखपालाकडील एक लाख ७२ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली, तसेच फ्रान्सिस अँथनी या ग्राहकाचे १८ हजार रुपये आणि मोबाईल फोनही हिसकावून घेतला. यावेळी बँकेत चार-पाच ग्राहक होते. या दरोडेखोरांनी अन्य ग्राहकांचे चार मोबाईल फोनही घेतले आणि रोकड रकमेसह पोबारा केला. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे पाच दरोडेखोर ३० ते ३५ वर्षे वयोगटातील होते, अशी माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली. परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोलनकर आणि पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गरड यांनी घटनास्थळी भेट दिली. दरोडय़ाच्या वेळी बँकेत सुरक्षारक्षक नसल्याचे समजते.