Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पायाभूत सुविधांमध्ये वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य
प्रश्न जिव्हाळ्याचे; दृष्टी उमेदवारांची

 

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून केंद्र सरकारशी संबंधित स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित प्रश्नांकडे ‘प्रश्न जिव्हाळ्याचे’ या मालिकेतून लक्ष वेधण्यात आले. पण, केवळ प्रश्न मांडून उपयोग नाही, स्थानिक खासदारांकडून याबाबत पाठपुरावा झाला तरच नाशिकच्या विकासाला नवा आयाम मिळू शकतो. हे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रस्तुत प्रश्नांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा आहे, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या काही योजना आहेत का, या विषयी जाणून घेतलेली त्यांची मते, त्यांच्याच शब्दात..

‘कनेक्टिविटी’ महत्त्वाची
समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
नाशिक-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. कोणत्याही शहराच्या विकासात रस्ते, एअर कनेक्टीव्हीटी असे घटक महत्वाचे असतात. त्या दृष्टीकोनातून या प्रश्नाचा मी सखोल अभ्यास केला आहे. नाशिक-पुण्यासह जिल्ह्य़ातून जाणाऱ्या इतरही महामार्गाच्या चौपदरीकरणाविषयी पाठपुरावा केला जाईल. सद्यस्थितीत नाशिक-मुंबई विमानसेवेसाठी एचएलएलच्या विमानतळाचा वापर करावा लागतो. पण, या सेवेसाठी शहरालगत एका स्वतंत्र विमानतळाची असणारी गरज पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील. कृषी माल निर्यातीसाठी जानोरी येथे साकारलेल्या हॅलकॉन प्रकल्पात ‘कोल्ड स्टोअरेज’ची आवश्यकता आहे. माल वाहतुकीसाठी विमान येथे दररोज येईलच असे नाही. त्यामुळे कृषीमालाची योग्य प्रकारे साठवणूक करता यावी म्हणून सुसज्ज ‘कोल्ड स्टोअरेज’ हवेच. केंद्राच्या ‘जेएनएनयुआरएम’ योजनेंतर्गत महापालिकेने मूलभूत सोयी व सुविधांचे नियोजन, शहर वाहतूक सुविधांची सुधारणा, बहुमजली वाहनतळांचे विकसन असे अनेक प्रस्ताव मांडले आहेत. त्याची अमलबजावणी योग्य पद्धतीने होते किंवा नाही यावर बारकाईने लक्ष दिले जाईल.

जाब विचारणार
दत्ता गायकवाड (शिवसेना)
काही वर्षांपूर्वीचे शहर आणि आजचे शहर यांचा विचार केल्यास नाशिकचा विकास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात येते. दोन-चार गोष्टींचा अपवाद वगळता एक चांगले शहर म्हणून नाशिक नावारूपास येत आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे तयार झाल्यानंतर पुण्याची प्रचंड वेगाने प्रगती झाली. तशीच क्षमता नाशिकची आहे. मात्र, मुंबई, पुणे व इतर शहरांशी जोपर्यंत रस्ते व हवाई मार्गाने नाशिक सक्षमपणे जोडले जाणार नाही तो पर्यंत विकास प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अशा प्रश्नांचा पाठपुरावा करणे आपले काम राहील. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत रस्ते, भुयारी गटार योजना, सुशोभीकरण आदी काम योग्य पद्धतीने केले जात आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर शहरातील पाथर्डी फाटा ते आडगाव नाका या उड्डाणपुलाविषयी आपण बरेच वर्षांपासून ऐकत आहोत, पण तो प्रत्यक्षात आलेला नाही. या पुलाच्या बांधणीसाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले? एवढेच नाही तर द्राक्ष व डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन नाशिक जिल्ह्य़ात होते. तरी देखील द्राक्ष प्रक्रिया उद्योग व डाळींब संशोधन केंद्र बारामतीकडे का नेण्यात आले? स्थानिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या या प्रश्नांवर आपण जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

नवी मुंबईच्या धर्तीवर आखणी
हेमंत गोडसे (मनसे)
नवी मुंबईच्या धर्तीवर, किंबहुना त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने मांडणी करून नाशिक शहरासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचा आपला मानस आहे. वाहतुकीचा विचार करून आवश्यक तिथे उड्डाणपुलांची बांधणी करता येवू शकेल. शहरात सर्वांना परवडतील अशा दरात घरांची उपलब्धी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईत जसा २.५ एवढा चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यात येतो, तसाच तो नाशिकला मिळावा असा आपला प्रयत्न राहील. अशी परवानगी मिळाल्यास झोपडपट्टी मुक्त नाशिक ही संकल्पना प्रत्यक्षात आणता येईल. मुंबई-नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याला समांतर असे रस्ते शहरवासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करू. स्वतंत्र विमानतळ ही देखील शहराची गरज आहे. जेएनएनयुआरएम योजनेत शहरातील विकासकामांसाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध झाला. स्कायबससारखे प्रकल्प त्या माध्यमातून पुढे आले. पण त्याची आज गरज नाही. नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचा विचार झाला पाहिजे. या स्वरूपाच्या योजनेची मांडणी करून केंद्राकडून विकास कामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहील.

सांस्कृतिक चेहरा जपला जावा
महंत सुधीर पुजारी (बसपा)
पायाभूत सुविधेचा विचार करता शहर व औद्योगिक असे दोन विभाग पडतात. औद्योगिक विभागात सातपूर व अंबड वसाहतींसाठी स्वतंत्र वीज केंद्र उपलब्ध केले नाही तर उद्योग बंद पडू शकतील. पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, सिन्नरला सेझचा दर्जा केवळ पायाभूत सुविधा नसल्याने फसल्या. या प्रक्रियेत जमिनी गेल्याने शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले. शहरात व गोदावरीच्या काठावर नव्या योजना आणि बांधकाम प्रकल्प राबविताना त्या-त्या परिसराचा सांस्कृतिक चेहरा जपला गेला पाहिजे. मुंबई-नाशिक चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी भविष्याचा विचार करता तो सहापदरी होणे आवश्यक आहे. या शिवाय, महामार्गावर अवजड वाहनांसाठी वेगळी व्यवस्था करणे महत्वाचे आहे. या मार्गावरून पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. आधीच येथे वाहतुकीचा ताण असल्याने हा निर्णय मागे घेतला जावा यासाठी प्रयत्न केले जातील. गोंदे येथून रिंगरोड काढून शहराशी संबंधित नसणारी वाहतूक बाहेरून गेली पाहिजे.