Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रेणके आयोगाची राजकीय पक्षांकडून उपेक्षा
भटके-विमुक्त साहित्य संमेलनात मान्यवरांचे मत
नाशिक / प्रतिनिधी

 

भटक्या-विमुक्तांच्या कल्याणासाठी शिफारशी करणारा रेणके आयोग सर्व राजकीय पक्षांकडून उपेक्षित आहे, अशी खंत येथे आयोजित भटके-विमुक्त राज्यस्तरीय साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली. याप्रसंगी स्वागताध्यक्ष सुरेश मेणे, सहस्वागताध्यक्ष निर्मला गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्र शासनाने अनुसूचित जाती-जमाती आयोगाप्रमाणेच रेणके आयोगाला अधिकार द्यावेत आणि त्यांच्या शिफारशी त्वरीत अमलात आणाव्यात यासह पाच ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर पोटनियमाप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातीचा एक प्रतिनिधी कायम नियुक्त करावा, सर्व विभागीय जात पडताळणीच्या समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून भटके-विमुक्त जाती जमातीचा प्रतिनिधी नियुक्त असावा, अर्थसंकल्पात ११ टक्के रकमेची तरतूद भटक्या विमुक्तांसाठी करावी, याशिवाय भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती व फ्रिशीपची रक्कम शासनाने जून २००९ पर्यंत संबधित जिल्हा विशेष समाजधिकाऱ्यांमार्फत सुपूर्द करावी, वसंतराव नाईक भटके-विमुक्त आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल ५० कोटीवरून १०० कोटीपर्यंत करावे, हे ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले.
‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी रेणके आयोग लागु व्हावा म्हणून कोणत्याही पक्षाच्या नेत्याने नीटपणे पाठपुरावा केला नसल्याचा आरोप केला. निवडणूक जाहीरनाम्यातही देशातील १५ कोटी भटके-विमुक्तांना आधार देण्याचे किंवा शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याचे एक वाक्यही लिहिण्यात आलेले नाही. यावरून राजकीय पक्षांचे नेते किती ढोंगी आहेत याची जाणीव होते. ते केवळ धनदांडग्यांचे रक्षणकर्ते आणि गरिबांचे भक्षणकर्तेच आहेत. साहित्याच्या माध्यमातून सर्व समाजाने भेदभाव विसरून बंधूभाव वाढविण्याचे काम यापुढे करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कवी उत्तम कोळगांवकर यांच्या हस्ते काव्य संमेलनाचे उद्घाटन झाले. एन. एम. आव्हाड संमेलनाचे अध्यक्ष होते. यानिमित्ताने झालेल्या काव्य स्पर्धेत पंडित गायकवाड यांच्या ‘नव्या युगाचं वारं’, गौरवकुमार आठवले ‘प्रश्न’, माणिक गोयडे ‘आधार’ यांना पुरस्कार देण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विश्वास ठाकूर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या सत्रात राजेंद्र संगमनेरकर, सुधाकर गवळी, दिगंबर शेळके, बापू बैरागी, ए. के. भोई , प्रा. देविदास गिरी, नेताजी भोईर, प्राचार्य डी.के.गोसावी यांना ‘भटके-विमुक्त भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात ‘आरक्षणाचा भूलभुलय्या’ परिसंवादात अर्थमंत्रालयाचे उपसचिव तथा साहित्यिक राजाराम जाधव, प्रा. भास्कर गिरीधारी, प्रा. प्राजक्ता शिंत्रे, इक्बाल पेंटर यांनी सहभाग घेतला. नोकरी पदोन्नतीविषयी दिशाभूल करणाऱ्या आरक्षणविषयी बैरागी यांनी विवेचन केले. यावेळी ‘स्पंदन-०९’ या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. निलिमा साठे यांनी ‘स्त्री’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. डॉ. भास्कर म्हरसाळे, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या पत्नी लता कांबळे यांनी ‘मी सावित्री बोलते’ या विषयावर कथा सादर केल्या.