Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिकमध्ये पवारांचा षटकार, मनसेचा चौकार तर..
नाशिक / प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यासाठी शरद पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार, विलासराव देशमुख, अरूण गुजराथी, नबाब मलिक यांसह इतर नेत्यांच्या सभांचे आवर्तनावर आवर्तन सुरू असताना आणि मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभांचा चौफेर धडाका उडविला असताना नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार दत्ता गायकवाड हे जाहीर सभांच्या आयोजनात पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसत आहे. विरोधी पक्षनेते रामदास कदम या एकमेव बडय़ा नेत्याची सभा युतीसाठी झाली आहे. इतर राजकीय पक्षांचे प्रमुख नाशिक मतदारसंघात सहा-सहा सभा घेत असताना विदर्भावर अधिक लक्ष देणारे शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची केवळ एकमेव सभा १७ एप्रिल रोजी होणार आहे. कार्याध्यक्षांनी नाशिकमध्ये अजून किमान एक सभा घ्यावी, असा आग्रह करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पुतण्या समीर भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा अक्षरश: पणाला लागली आहे. सर्वकाही दिमतीला असतानाही लढाई हातघाईची असल्याची जाणीव झालेल्या भुजबळांनी प्रचारात कोणतीही कसर राहू नये, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांची पलटणच्या पलटणच मैदानात उतरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्यासह बुधवारी सिन्नर येथे सभा घेणार असून पवार यांची ही या मतदारसंघातील सहावी सभा राहणार आहे. माढानंतर नाशिक या एकमेव मतदारसंघात इतक्या मोठय़ा संख्येने पवारांनी सभा घेतल्या असाव्यात. आघाडीच्या झाडून साऱ्या नेत्यांनी मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागात सभा घेतल्या आहेत. प्रचाराचे विचारपूर्वक नियोजन आघाडीकडून करण्यात आले असून जाहीर सभांच्या कचाटय़ातून मतदारसंघाचा एकही कोपरा सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. मातोरीसारख्या ठिकाणी अजित पवार यांची सभा हे त्याचे उदाहरण म्हणावे लागेल.
दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही चार सभा झाल्या असून त्यांच्या सभांना होणारी तोबा गर्दी युती आणि आघाडीच्या पोटात गोळा आणणारी ठरत आहे. पुढील आठवडय़ात त्यांच्या अजून दोन सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मनसे आणि आघाडीच्या सभांच्या धडाक्यापुढे स्थानिक मंडळींच्या मदतीने सुरू असलेला युतीचा प्रचार झाकोळला असून युतीकडून बडय़ा नेत्यांच्या सभा का नाहीत, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.