Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. आंबेडकरांच्या मते संसदीय शासन पध्दती सर्वोत्कृष्ट

 

देशात लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार कसे होते, हे या लेखमालिकेतून मांडत आहोत. आज दुसरा भाग.
१९२९ च्या मे महिन्यात सायमन कमिशनने त्यांच्या अहवालात मुंबई प्रांतापासून कर्नाटक प्रांत वेगळा काढावा, अशी सूचना केली होती. ब्रिटीश सरकारच्या हेतूबद्दल शंका घेवून डॉ. आंबेडकरांनी या कारस्थानास विरोध केला. त्यांनी एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेला आपल्या देशात एकात्मतेच्या दृष्टीने किती महत्व दिले होते, हे त्यांच्या पुढील विधानांवरून स्पष्ट होते. ‘आज जर राष्ट्राला कोणत्या गोष्टीची जरूरी असेल तर ती जनतेच्या मनात एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची होय. आपण प्रथम भारतीय आहोत, नंतर हिंदू, मुसलमान, सिंधी वा कानडी, अशा अलगपणाच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय व नंतरही भारतीयच आहोत, ही भावना निर्माण केली पाहिजे. ज्यामुळे संकुचित प्रांताभिमानाची व पक्षाभिमानाची वाढ होईल अशा सर्व गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे’ (१७ मे १९२९)
प्रांतवादाबरोबरच बाबासाहेब जातीयतेविरूध्द होते. त्यांच्यामते जातीयवाद राष्ट्रवाद विरोधी असतो. सार्वजनिक जीवनाची दृष्टी जातीयवादाने मारली आहे. जातीयवादामुळे सार्वजनिक परोपकार बुध्दीही मारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकारणाच्या व समाजकारणाच्या आखाडय़ात अखिल भारतीय अस्पृश्य वर्गाचा विकास व उध्दार करण्याच्या ध्येय-उद्देशाने उतरले होते. त्यावेळी अस्पृश्य मानलेल्या समाजात ४२९ जाती होत्या. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजातील एका जातीजमातीकरीता कार्य करावयाचे अशी भूमिका कधीच घेतली नाही. तसा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. जे काही करावयाचे , हक्क मागण्या मागावयाच्या त्या अखिल भारतीय अस्पृश्य वर्गाच्या विकास व उध्दारासाठी करावयाचे अशीच त्यांची ठाम भूमिका होती. त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक जीवनात जे काय केले ते सर्व अस्पृश्य समाजाच्या उध्दार-उत्कर्षांसाठी केले.
भाषावाद संदर्भात बाबासाहेबांच्या मते भारतीयांची व्यापक मनोभूमिका तयार झाली पाहिजे. कारण भारत हे एक बहुभाषिक राष्ट्र असून त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न साकार होण्यास अडचण निर्माण होते. याची जाणीव त्यांना होती. तरीपण भारताच्या सांस्कृतिक ऐक्यावर त्यांची अढळ श्रध्दा होती. भाषिक विविधता राष्ट्रवादाचा विकास अडवून ठेवू शकत नाही. हे गृहित धरूनही आंबेडकरांना असे मात्र वाटते की, एक समान भाषा असणे राष्ट्र निर्मितीस उपकारक ठरत असते. म्हणूनच सर्व भारतीयांना जर एकत्रित होवून एक समान संस्कृती उभारायची असेल तर त्यांना हिंदी ही आपली भाषा म्हणून अंगिकारणे हे त्यांचे कर्तव्य आहे. वरील सर्व प्रश्नांच्या बाबतीत डॉ. बाबासाहेबांची विशाल भूमिका होती. परंतु भारतीय राजकारणात व राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील आजही ते प्रमुख अडसर बनून राहिले आहेत. सत्ताधीश व राजकारणी त्या सर्व प्रश्नांचा भांडवल म्हणून उपयोग करतात. डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा अत्यंत धर्मनिरपेक्ष, पुरोगामी व बुध्दी प्रामाण्यवादी होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडर लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते. त्यांच्या राजकीय चिंतनातील लोकशाही विचार हा केवळ आदर्शाच्या स्वप्न रंजनातून उपजलेला नव्हता, तर सभोवतालच्या सामाजिक, राजकीय वास्तवाच्या मुशीतून तो तावून सुलाखून निघाला होता. उच्चशिक्षण घेण्याच्या उद्देशाने त्यांचे वास्तव्य इंग्लंड, अमेरिकेत गेल्याने तेथील लोकशाही व्यवस्था त्यांनी जवळून पाहिली. बाबासाहेबांचे राजकीय ध्येय केवळ भारतातच लोकशाहीची उभारणी करणे एवढय़ापुरतेच मर्यादित नव्हते तर जगात जिथे-जिथे लोकशाही असेल त्या सर्वच राष्ट्रांशी सहकार्य करून भारताने लोकशाही मूल्यांचे संरक्षण करावे अशी त्यांची इच्छा होती. डॉ. आंबेडकरांनी फॅसिझम आणि नाझीझमला विरोध केला होता. तसेच साम्यवादी आणि भांडवलशाहीस विरोध करून लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. जुलूम, जातीयता व गुलामगिरीतून सामान्य माणसाला मुक्त करणारी व्यवस्था कशी असावी, हाच ध्यास आंबेडकरांनी आमरण चालविला. ‘लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतीकारक बदल रक्तविरहीत मार्गानी घडवून आणणारी शासनपध्दती म्हणजे लोकशाही होय’ अशी त्यांची लोकशाहीची व्याख्या होती.
मानवी स्वातंत्र्य आणि समता या तत्वांची प्रतिष्ठापना करणे हे बाबासाहेबांचे ध्येय असले तरी जोपर्यंत दारिद्र्य, निरक्षरता व जातीय पृथगात्मता यांचे निर्मूलन होत नाही तोपर्यंत भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होणार नाही. बाबासाहेबांच्या मते लोकशाहीतील स्वातंत्र्य ही मूठभरांची मिरासदारी न ठरता त्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजे. त्याशिवाय व्यक्तीच्या ठिकाणी आत्मसन्मानाची भावना निर्माण होऊ शकणार नाही. गेल्या ५८ वर्षांत म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात हे तिन्ही प्रश्न टिकून आहेत. डॉ. आंबेडकरांच्या मताप्रमाणे आजही या देशाची पारंपरिक समाजरचना लोकशाहीस मुळीच पोषक नाही. कारण तिच्यातून श्रीमंत-गरीब, उच्च-नीच्च, मालक-मजूर असे स्थायी स्वरूपाचे वर्ग निर्माण होवून ते टिकून राहतात. त्यामुळे आधी या सामाजिक रचनेत मौलिक फेरफार केल्या खेरीज लोकशाहीचे इमले उभारल्यास भरभक्कम पाया नसलेल्या इमारतीप्रमाणे ते कोसळून पडतील, याबद्दल बाबासाहेबांच्या मनात यत्किंचतही संशय नव्हता.
‘एक व्यक्ती-एक मत’ यापेक्षा आंबेडकरांना ‘एक व्यक्ती-एक मूल्य’ हे तत्व अधिक स्वीकारणीय वाटते. आंबेडकरांच्या लोकशाही विचारात मानवी हक्कांना आणि त्यांच्या संरक्षणांनाही महत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला राजकीय, सामाजिक व आर्थिक अधिकार लोकशाहीतच मिळावा. अधिकार सत्तावाद, र्सवकष सत्तावाद, फॅसिस्टवाद अथवा अराज्यवाद इत्यादिंना त्यांचा कसून विरोध होता. बाबासाहेबांच्या मते अधिकारांचा लाभ जास्तीजास्त लोकांना व्हावा, तोच लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ निकष आहे.
आंबेडकरांचा संसदीय लोकशाहीवर विशेष भर होता. कारण संसदीय शासन पध्दतीमुळेच प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आत्मनिर्भरता, उपक्रमशीलता व जबाबदारीची जाणीव निर्माण होऊ शकते. तसेच विवाद्य मुद्यासंबंधीचे निर्णय मनमोकळ्या चर्चेअंती व सर्वाच्या संमतीने घेण्याची तरतूद केवळ या संसदीय पध्दतीतच असते. अहिंसक, घटनात्मक व शांततापूर्ण विचारविनिमयाला या पध्दतीत वाव असतो. तसेच विरोधी पक्ष, वृत्तपत्रे, मुक्त व न्याय निवडणुका इत्यादी आंबेडकरांच्या दृष्टीने या पध्दतीची गुणवैशिष्ठे आहेत. परंतु या पध्दतीत उणिवा, दोष नाहीत असे नव्हे. ते टाळल्यास संसदीय शासन पध्दतीत केवळ विरोधासाठी विरोध किंवा विरोधाच्या नावाखाली विध्वंसक व अराजकतेला स्थान असू नये. सतत संघर्ष, सारखे स्थगन प्रस्ताव, प्रक्षोभक भाषणे व सभात्याग इत्यादी विरोधी पक्षांचे मार्ग लोकशाहीला घातक ठरू शकतात, असा इशारा आंबेडकरांनी आधीच दिला आहे. आज आपण जणू काही संसदेचा आखाडा होतो की काय, हे पाहत असतो, यामध्ये परिवर्तन करावयाचे असेल तर पुन्हा डॉ. आंबेडकरांचा लोकशाही विषयक दृष्टीकोन समजावून घेणे आवश्यक आहे. १९३७ मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष व १९४२ मध्ये अखिल भारतीय शेडय़ुल्ड कास्टस् फेडरेशन आणि त्यांच्या मृत्यूनंतर १९५७ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची निर्मिती डॉ. बाबासाहेबांच्या लोकशाहीवरील श्रध्देमुळेच झाली आहे.
(क्रमश:)
प्रा. संजय आहिरे

एच.पी.टी आर्टस् अ‍ॅण्ड आर.वाय.के.
सायन्स कॉलेज, नाशिक.