Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जागरूकपणे मतदान करा !

 

सुमारे १०१ कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय भारत देशात पंधराव्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. घोषणा आणि आश्वासनांचा भडीमार केला जात आहे. विकासाच्या विविध भूलथापा दिल्या जात आहेत. देशाचे आम्हीच हितकर्ते आहोत असे सर्वच प्रचार सभांमधून आवर्जून सांगितले जात आहे. मतदारांना निरनिराळ्या प्रलोभनांतून आकर्षित करण्याची अहमहमिका लागली आहे. मतदारांना नमस्कार करून तू आम्हाला पाव अशा प्रार्थना उमेदवार करीत आहेत. एकूणच प्रचार आरोप-प्रत्यारोपांनी रंगात आला आहे.

देशांत प्रांतवाद, आतंकवाद, जातीयवाद सुरू असतानाच आर्थिक मंदी, महागाई, बेरोजगारी, गरिबी वाढत आहे. त्यातच भ्रष्टाचार, अन्याय-अत्याचार, अपघात, घातपात, आत्महत्या वाढत आहेत. पुढील काळात पाणी, वीज व पेट्रोल टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भविष्यात विकास योजना राबविण्यासाठी देशाच्या तिजोरीत पैसा कोठून आणावयाचा अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभ्यासातील निरीक्षणातून असे निदर्शनास येते की, समस्या, संकट, संघर्ष हातात हात घालून वाटचाल करतील.
त्यामुळे अस्थिरता वाढू शकते. तेव्हा मतदारांवर जागरूक राहून मतदान करण्याची आणि लोकनियंत्रित लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे.
स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी त्याग करण्यासाठी चढाओढ होती. आज देशात वेगळीच स्पर्धा सुरू आहे. पूर्वीचे साधूत्व जाऊन आज संधी साधूपणाला महत्व आले आहे. शिस्तभंगाचा गाजावाजा होतो, पण शीलभंगाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. पूर्वी त्यागी व चारित्र्यसंपन्न असणाऱ्यांचा मान-सन्मान होता. आज भ्रष्टाचारी, भोगवादी, गुंडगिरी करणाऱ्यांचे सत्कार केले जातात. सेवेचा सुगंध लोप पावला असून भ्रष्टाचाराची दरुगधी सर्व स्तरावर पसरत आहे. आजच्या राजकारणाला आचार विचारांचा आदर्शवादच प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाऊ शकेल. ‘बोले तैसा चाले’ हा दिवा जळू लागली की अंधार दूर होईल.
असंख्य ताऱ्यांच्या रुपाने आकाशात मशाली जळत असताना दिसतात. पण आज रस्त्यारस्त्यावर धर्माच्या, पंथांच्या, जातीय व प्रादेशिक वादाच्या मशाली जळत आहेत. या सर्वाचा दावा आहे की, त्यांच्या प्रकाशाखेरीज अन्य कोणताही प्रकाश अस्तित्वात नाही. मनुष्याच्या डोळ्यांना मानवतेचा सूर्यच दिसेनासा झाला आहे. सूर्याचे दर्शन हवे असेल तर सर्व मशालींची दिशा बदलली पाहिजे. भारतीय संस्कृती वेगळी आहे.
अध्यात्मिक मूल्य जपायची आहे. स्वातंत्र्य रक्षणासाठी कटिबद्ध व्हावयाचे आहे, ‘जगा आणि जगू द्या’ ही भूमिका कृतीत आणावयाची आहे. सुराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भ्रष्टाचार, अन्याय-अत्याचार थांबविले पाहिजेत. सर्वच पक्ष नेत्यांनी आणि भावी खासदारांनी आदर्शाचा प्रारंभ स्वत:पासून केला पाहिजे.
आजची सत्यता-वास्तवता विचारांच्या पातळीवर तपासून केंद्रात स्थिर सरकार येण्यासाठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करण्याची कधी नव्हती एवढी आज आवश्यकता आहे.
देशातील कायदा-सुव्यवस्था सुरक्षित ठेऊन दहशतवादाला आळा घालणारे स्थिर सरकार हवे आहे.
पां. भा. करंजकर