Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

गटबाजी, नाराजी हे राष्ट्रवादीसाठी वक्री ग्रह
अभिजीत कुलकर्णी

लोकसभेच्या उत्तर महाराष्ट्रातल्या एकूण सहापैकी सध्या दोन जागांवर कब्जा असणाऱ्या राष्ट्रवादीने आणखी दोन ठिकाणी आपले नशीब आजमावण्याचे ठरविले आहे. त्यानुसार नाशिक आणि जळगाव जिल्ह्य़ामध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे राष्ट्रवादीचे चार भिडू निवडणुकीच्या आखाडय़ात आहेत. गेल्या लोकसभा, विधानसभांची आकडेवारी पाहिल्यास परिस्थिती राष्ट्रवादीला अनुकूल भासत असली तरी वास्तवात मात्र गटबाजी, आपसातील हेवेदावे, नाराजी असे अनेक ग्रह वक्री झाल्याने त्यांची शांती करण्यासाठी शरद पवारांपासून या पक्षाच्या सगळ्याच बडय़ा मंडळींना सध्या उत्तर महाराष्ट्राच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत.

‘समग्र अभ्यास हवा’
माझी अपेक्षा

भारतासारख्या आकाराने व लोकसंख्येने मोठय़ा देशात लोकशाहीप्रधान राजवट अत्यंत व्यवस्थित सुरू आहे. आता पुन्हा एकदा निवडणुकीचा मोसम असल्याने वारे जोरात वाहू लागले आहेत. केंद्र सरकार व काही राज्यांतल्या विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार उभे राहणार. काही पक्षांनी एकत्र येऊन युती, काहींनी आघाडी निवडणूकी पूर्वीच केली आहे. त्या व्यतिरिक्त तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

मीडिया मॅनेजमेंटची ‘वाट’!
भाऊसाहेब : कस्काय झाला कालचा तुमचा टिवीचा कारेकरम, भावडय़ा?
भावडय़ा : एकदम झकास.
भाऊसाहेब : पन त्यो दाखवनार कवा टिवीवर?
भावडय़ा : एक-दोन दिवसात कळवणारेत ते.
भाऊराव : वाट बघा. या मीडियावाल्यांना काय, काम झालं की विषय संपला. म्हणे ते कळवणारेत..
भावडय़ा : आपल्या बाबतीत असं होऊ शकत नाय. कारण, आपल्या उमेदवाराची आख्खी ‘मीडिया मॅनेजमेंट’ आमच्या भाऊंकडे आलीये.

महामार्ग विपुल, ना धड एकही पूल!
वार्ताहर / जळगाव

अनेक राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या जळगाव जिल्ह्य़ाची वाहतूक व्यवस्था वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत सापडली असताना लोकप्रतिनिधींकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कुठे रस्त्यांची बिकट अवस्था तर कुठे पुलांचे बांधकाम रखडलेले. एवढेच नव्हे तर जुने रस्ते व पुलांच्या दुरूस्तीकडेही लक्ष दिले जात नसल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जळगाव शहरालगतच्या बांभोरी गावाजवळील गिरणा नदीवरील जुन्या पण मजबूत पुलाची अवस्था पाहिल्यास ही बाब स्पष्ट होऊ शकते. जळगाव शहरातून मुंबई-नागपूर-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो.

नंदुरबारमध्ये नरेंद्र मोदी; तर रावेरमध्ये शरद पवारांची सभा
जळगाव, नंदुरबार / वार्ताहर

काँग्रेस-राष्ट्रवादीतील वादविवादामुळे गाजत असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांच्या प्रचारार्थ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बुधवारी जाहीर सभा होत असून याच दिवशी रावेर मतदारसंघात आठवडय़ात दुसऱ्यांदा आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे.
मोदी यांची सभा सकाळी दहाला नंदुरबारमध्ये धुळे मार्ग चौफुलीजवळील सोनाबाईनगरात होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘निवडणुकीपुरतीच सेना-भाजपला राममंदिराची आठवण’
वार्ताहर / इगतपुरी

काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना व भाजपने देश व राज्याची सत्ता उपभोगून केवळ आश्वासन देण्यापलीकडे काही दिले नाही. ऐन निवडणुकीच्या काळातच राम मंदिराची आठवण होणाऱ्या शिवसेना व भाजप पक्ष इतकी वर्ष या मंदिराच्या बांधकामासाठी विटा बनवत आहेत का, असा सवाल मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी घोटी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. राज यांच्या या सभेसाठी एवढी गर्दी जमली की मैदान खचाखच भरल्यानंतर अनेकांनी महामार्गालगत ठाण मांडले.

मनमाडच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला क्रीडा स्पर्धेत विजेतेपद
मनमाड / वार्ताहर

नाशिक जिल्हा अध्यापक विद्यालयांतर्गत (डी. एड) आयोजित क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेमध्ये मनमाड येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी सर्वसामान्य विजेतेपदाचा बहुमान पटकावला. स्पर्धामध्ये जिल्ह्य़ातील एकूण ४२ डी. एड. विद्यालयांचा सहभाग होता. त्यात मुला-मुलींसाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, धावणे, उंच व लांब उडी, थाळी व गोळाफेक, रिले आदी सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धाचा तसेच प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, समूहगीत, एकपात्री अभिनय, समूहनृत्य आदी बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धाचा समावेश होता.
मनमाडच्या जिल्हा व प्रशिक्षण संस्थेच्या खेळाडूंनी सांघिक स्पर्धेत कबड्डी (मुली) व खो-खो (मुले-मुली) या खेळात विजेतेपद मिळविले. व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतेपद प्राप्त केले. वैयक्तिक स्पर्धेत रिले (मुले) प्रथम, ४०० मीटर धावणे (मुली) प्रथम, लांब उडी (मुली) प्रथम, थाळी व गोळा फेक (मुली) द्वितीय तसेच वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून सलग दुसऱ्यावर्षी सर्वसामान्य विजेतेपदाचा बहुमान पटकावला. स्पर्धेत छात्रशिक्षक रुपाली झगडे, सुनिता जाधव, योगिता सुरूडे, वैशाली काळे, लीनी फेगडे, अमृता भालेराव, प्रिया परदेशी, भारती जोशी, नंदकिशोर गवळी, संदीप सादे बाबुलाल नागरगोजे, संतोष साबळे, निवृत्ती डुकरे, विठ्ठल लांडे, वैभव येवला, हेमंत माळी, गणेश निकम, हणमंत सुरनर, राहूल सूर्यवंशी, किरण वेलजाळी या खेळाडूंनी विशेष कामगिरी केली.

‘प्राचार्य बागूलांचे कार्य गौरवास्पद’
मालेगाव / वार्ताहर

तालुक्यातील दाभाडी येथील टी. आर. हायस्कूलचे प्राचार्य भगवान बागूल यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीबरोबरच आदर्श व सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी राबविलेले उपक्रम तसेच घेतलेले कष्ट निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमाकांत वालवडकर यांनी बागूल यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभात केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अॅड. उमेश निकम हे अध्यक्षस्थानी होते. जेथे ज्ञान वाढावे अशी अपेक्षा असते त्या शिक्षण क्षेत्रात वाईट प्रवृत्तींचा होत असलेला शिरकाव चिंताजनक असल्याचे नमूद करून परीक्षा केंद्रांवरच दिसणारे कॉपीचे ढिग, विध्वंसक मार्ग अवलंबण्याची युवकांमध्ये वाढत असलेली हिंमत, विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारी बेफिकीरी या साऱ्या गोष्टींमुळे मन विषण्ण होते. अशा या काळात समर्पित भावनेने अध्यापन करून समाज घडविण्याचे कार्य करणारे शिक्षक समाजात आदराचे विषय ठरतात असेही प्रा. वालवडकर यांनी सांगितले. यावेळी क. भा. हिरे शिक्षण संस्था, टी. आर. हायस्कूल, साने गुरूजी पतसंस्था व दाभाडी ग्रामस्थांच्या वतीने प्राचार्य बागूल यांचा नागरी सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षक अशोक सोयगावकर हेही निवृत्त झाल्याने त्यांना याप्रसंगी गौरविण्यात आले.

मालेगाव तालुक्यातील सहा निवडणूक कर्मचाऱ्यांवर कारवाई
मालेगाव / वार्ताहर
प्रशिक्षणास गैरहजर राहून निवडणूक कामात कुचराई केल्या प्रकरणी तालुक्यातील सहा कर्मचाऱ्यांवर धुळे लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी अजय मोरे यांनी सक्त कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे. मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य़ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी अनुक्रमे ११४८ व ११५० अशा एकूण २२९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वाचे येथे गेल्या ११ व १२ एप्रिल रोजी प्रशिक्षण घेण्यात आले. मात्र यावेळी सहा कर्मचारी कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहिले होते. या सहा जणांना मोरे यांनी गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस देऊन २४ तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. यात कुचराई झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये पोलिसात एफ. आय. आर. दाखल करण्याची तंबीही कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.