Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक’

 

इ.स. २००७ मध्ये भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात जवळजवळ सहा महिने मुक्काम ठोकून परतली. अंतराळातलं तिचं निवासाचं ठिकाण होतं- आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक. यामुळे सर्वसामान्य भारतीयांना या अवकाश स्थानकासंबंधी विशेषच कुतूहल निर्माण झालं. ‘अंतराळात’ म्हणजे नेमकं कुठे आहे हे स्थानक? तेथे किती अंतराळवीर असतात? किती मोठे आहे हे स्थानक- असे अनेक प्रश्न तेव्हापासून विचारले जात आहेत.
हे स्थानक आहे अंतराळात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर. गंमत म्हणजे या स्थानकाची ‘बांधणी’ अंतराळातच करण्यात येत असून, हे काम १९९८ साली सुरू झालं आणि २०११ मध्ये ते पूर्ण होईल अशी योजना आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रहच असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे.
हे स्थानक खऱ्या अर्थानं ‘आंतरराष्ट्रीय’ आहे. कारण या प्रकल्पात अनेक देशांचा सहभाग आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. ब्राझील आणि इटली यांनीही या प्रकल्पाशी सहकार्य करण्याचे करार केले आहेत.
हे स्थानक ‘लो अर्थ ऑरबिट’मध्ये आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६० ते २००० कि.मी. एवढय़ा उंचीवरून फिरणाऱ्या उपग्रहाला तो ‘लो अर्थ ऑरबिट’मध्ये आहे असं म्हटलं जातं. हे स्थानक प्रचंड वेगानं पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असून, हा (सरासरी) वेग आहे २७ हजार ७०० कि.मी. प्रतितास! इतक्या प्रचंड वेगानं ते फिरत असल्यानं सुमारे ९१ मिनिटांत त्याची पृथ्वीभोवती एक चक्कर पूर्ण होते आणि एका दिवसात १५.७ प्रदक्षिणा पुऱ्या होतात. स्थानकाचं वजन किती आहे हे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नक्कीच तोंडात बोट घालाल- दोन लाख २७ हजार २६७ कि.ग्रॅ.! याची लांबी आहे २४० फूट, तर रुंदी आहे ३३६ फूट. हे अंतराळ स्थानक म्हणजे पृथ्वीपासून ३५० कि.मी. उंचीवर उभारलेली एक प्रयोगशाळाच समजायला हरकत नाही. त्याच्या या अवाढव्य आकारामुळे आणि (तुलनेनं) कमी उंचीवर असल्यानं हे स्थानक आपण काही वेळा साध्या डोळ्यांनीही पाहू शकतो! या स्थानकामध्ये २६ हजार ५०० घनफूट एवढी मोठी जागा असून, सध्या तेथे सहा व्यक्ती एका वेळेस राहण्याची व्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक बैकनूर (Baikonur) येथील अंतराळ उड्डाण केंद्रातून १९९८ साली ते सोडण्यात आलं. हे केंद्र कझागिस्तानात असून, हा प्रदेश (पूर्वीच्या) सोविएत रशियामध्ये होता. हे जगातलं अशा प्रकारचं सर्वात मोठं उड्डाण केंद्र आहे. १९५० च्या दशकात सोविएत रशियानं अतिशय महत्त्वाकांक्षी असा अंतराळ कार्यक्रम आखला होता. त्यावेळेस या अंतराळतळाची निर्मिती करण्यात आली होती.
आधी सांगितल्याप्रमाणे या स्थानकाची बांधणी पृथ्वीवर नव्हे तर अंतराळात केली जात आहे. अभियांत्रिकीच्या क्षेत्रातला हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. नोव्हेंबर १९९८ मध्ये हे आव्हानात्मक आणि अभूतपूर्व असं काम सुरू झालं. त्यासाठी अनेक अवकाश मोहिमा आखण्यात आल्या. सध्या १९ वी मोहीम चालू आहे. या प्रत्येक मोहिमेत अंतराळ स्थानकाचे सुटे भाग स्पेस शटलच्या मदतीनं तेथे नेण्यात आले. स्पेस-शटलमधून तेथे गेलेल्या/ आधीच तेथे असलेल्या अंतराळवीरांनी हे सुटे भाग मुख्य स्थानकाच्या यंत्रणेला जोडले. काही अन्य यंत्रणा सुरू केल्या. आतापावेतो या स्थानकाची ८१ टक्के उभारणी पूर्ण झाली. २०११ मध्ये हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
आतापर्यंत या प्रकल्पाचा प्रवास अगदी सुखाचा झाला असं म्हणता येणार नाही. २००३ साली झालेल्या कोलंबियाच्या अपघातामुळे एकूणच अंतराळ-कार्यक्रमांना विरोध होऊ लागला. पण कालांतरानं हा विरोध मावळला आणि २००५ मध्ये डिस्कव्हरी नावाच्या स्पेस-शटलनं स्थानकाच्या दिशेने झेप घेतली. त्यानंतर अटलांटिस आणि इतरही काही स्पेस शटल्स स्थानकाला भेट देऊन आली. सध्याची मोहीम १९ वी असून, आणखी दहा मोहिमांचं नियोजन करण्यात आलं आहे.
आता साहजिकपणे प्रश्न निर्माण होतो की, पृथ्वीवर अनेक अद्ययावत प्रयोगशाळा असताना अंतराळात हे स्थानक उभारण्याचा अट्टहास कशासाठी? या अतिशय खर्चिक अशा प्रकल्पाचा सामान्य माणसाला काय उपयोग?
या स्थानकात केले जाणारे प्रयोग जीवशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्राशी संबंधित असतील. मानव दीर्घकाळ अंतराळात राहिला तर त्याच्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होऊ शकतात याचा शोध काही प्रयोगांद्वारे घेतला जाईल. भविष्यकाळात मानवाला एखाद्या दूरच्या ग्रहावर पाठवायचं ठरलं तर या अभ्यासाचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग होईल. या स्थानकात गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव फारच कमी आहे. म्हणजे तेथे ‘मायक्रोग्रॅव्हिटी’ अस्तित्वात आहे. या मायक्रोग्रॅव्हिटीचा वनस्पती, प्राणी, काही विशिष्ट प्रकारचे स्फटिक यांच्या वाढीवर काय परिणाम होतो हेही तपासले जाईल. दूर अंतराळात जेथे गुरुत्वाकर्षण नाही/ कमी आहे तेथे जिवाणूंची उत्पत्ती आणि उत्क्रांती होऊ शकते का, याचा अंदाज या संशोधनावरून येऊ शकेल.
अंतराळातलं तापमान अतिशय कमी असतं. पृथ्वीवर कमी तापमानाला द्रव्याची पाचवी स्थिती (State) निर्माण करता येते हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. (द्रव्याच्या चार स्थिती आपल्या परिचयाच्या आहेतच- घन, द्रव, वायू आणि प्लाझ्मा) या पाचव्या स्थितीचं महत्त्व असं की, या तापमानाला द्रव्याचे गुणधर्म बदलतात आणि ते अतिवाहक म्हणजे ‘सुपरकंडक्टर’ बनतं. अतिवाहक पदार्थामुळे ऊर्जेची मोठय़ा प्रमाणावर बचत होते.
मायक्रोग्रॅव्हिटीचा पदार्थाच्या ज्वलनावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास अंतराळ स्थानकात केला जाणार आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा पर्यावरणाच्या रक्षणासाठी होऊ शकतो. पृथ्वीच्या वातावरणाचा तपशीलवार अभ्यास या स्थानकात बसून करता येईल. त्सुनामी, भूकंप, वादळं यांची पूर्वसूचना मिळू शकेल आणि हजारो नागरिकांचे प्राण वाचू शकतील. विश्वकिरणं (cosmic rays), प्रतिद्रव्य (antimatter) आणि कृष्णद्रव्य dark matter) यासारख्या खगोलशास्त्रीय संकल्पनांची अधिक माहिती या स्थानकातल्या प्रयोगांवरून मिळेल असंही वैज्ञानिकांना वाटते.
या प्रयोगांपैकी काही प्रयोग याआधीच करण्यात आले असून, त्यांचे निष्कर्ष वैज्ञानिक नियतकालिकांमधून प्रसिद्ध केले जात आहेत. या सर्व प्रकल्पांत सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या स्त्री-वैज्ञानिकाचा प्रत्यक्ष सहभाग आहे ही गोष्ट आपल्याला निश्चितच सुखावणारी आहे. अमेरिकन नौदलात अधिकारी असलेली सुनीता डिस्कव्हरी शटलमध्ये बसून या स्थानकापर्यंत गेली. जाताना तिनं आपल्याबरोबर भगवद्गीता आणि गणपतीची मूर्ती नेली होती. (..आणि समोसेसुद्धा!) ती एकंदर १९५ दिवस अंतराळात होती. या काळात ती अंतराळात तीन वेळा चक्क ‘चालली!’ अंतराळात इतकं दीर्घकाळ वास्तव्य दुसऱ्या कोणत्याही महिलेनं केलेलं नाही!
हा सगळा थरार आपण प्रत्यक्ष अनुभवायला हवा असं वाटतंय? ही गोष्ट अवघड आहे, पण अशक्य मात्र नाही. आता चक्क अंतराळ पर्यटनाला सुरुवात झाली आहे! २००८ सालापर्यंत सहा पर्यटकांनी अवकाश स्थानकाला भेट दिली आहे! त्यासाठी त्यांना प्रत्येकी (फक्त!) अडीच कोटी डॉलर भरावे लागले आहेत. चला तर मग, लागा तयारीला अंतराळ-पर्यटनाच्या!
अधिक माहितीसाठी- www.nasa.gov/mission_pages/station/main/
गिरीश पिंपळे
gpimpale@gmail.com