Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

नमन पहिले तुला..!
अभिव्यक्ती आणि समान मताचा अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने या चिमुकल्यांनीसुद्धा हात जोडून त्यांना अभिवादन केले.

कचरा आजपासून उचलणार
पुणे, १४ एप्रिल/ प्रतिनिधी

उरळी कचरा डेपोच्या विरोधात सुरू झालेले आंदोलन आज स्थगित करण्यात आल्यानंतर पुण्यातील कचरा उरळी येथे टाकण्याच्या कामाला दुपारनंतर सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहरातील कचरा उचलण्याचे काम पूर्ण व्हायला दोन दिवस लागणार आहेत. उरळी कचरा डेपो हटाव कृती समितीतर्फे गेले पाच दिवस चक्रीउपोषण, तसेच कचरा गाडय़ा परत पाठविण्याचे आंदोलन सुरू होते. त्यामुळे शहरात सुमारे पाच ते साडेपाच हजार टन कचरा साठला असून शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत.

पाच वर्षांनी ‘पोळा’
लोकसभेच्या निवडणुका म्हणजे पाच वर्षांनी येणारा बैलपोळा असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काल मोठय़ा खुमासदार शैलीत सांगितले. गावोगाव प्रचार करताना अनेक गमतीशीर अनुभव कसे येतात त्याचा दाखलाच पवार यांनी दिला. ते म्हणाले, यवतमाळ जिल्ह्य़ातील प्रचारसभेनंतर एका शेतक ऱ्याने वैतागून विचारले, ‘तुमचे म्हणणे तरी काय? तुम्हाला आमच्याकडून नेमके काय हवे आहे.’ तेव्हा त्याला उत्तर देताना मी विचारले, ‘शेतीसाठी तुमच्याकडे बैल तर असतीलच, मग बैलपोळ्याच्या दिवशी तुम्ही काय करता?’ त्यावर तो म्हणाला, ‘पोळ्याला बैलाला सजवतो. त्याला कामाला जुंपत नाही.

संशयितांची चौकशी सुरू ;तपास अंतिम टप्प्यात
चितळे बंधूंच्या वितरकांकडील १२ लाखांची लूट

पुणे, १४ एप्रिल / प्रतिनिधी

डेक्कन व कोथरूडमध्ये चितळे बंधूंच्या वितरकांकडील कर्मचाऱ्यांना बारा लाख रुपयांना लुटण्याचा गुन्हा उघडकीस आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी तीन-चार संशयितांची चौकशी सुरू असून तपास अंतिम टप्प्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. चितळे बंधू यांच्या वितरकांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काहीजण या गुन्हय़ांमध्ये सामील असल्याचे सांगण्यात येते. प्रसिद्ध मिठाई व्यावसायिक चितळे बंधू यांच्या गोकुळ डेअरीतील कर्मचाऱ्यांवर कोयत्याने वार करून दूधविक्रीतून जमा झालेली सहा लाख तीस हजारांची रोकड तिघा चोरटय़ांनी १२ फेब्रुवारी रोजी एरंडवणे येथे पौड फाटय़ाजवळ लुटली.

कर्करुग्णांसाठी शासकीय रुग्णालयाचा प्रस्ताव
मुस्तफा आतार, पुणे, १४ एप्रिल

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांतून कर्करुग्णांची फारशी काळजी घेतली जात नसल्याने आता पुण्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कर्करुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा आरोग्य खात्याकडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये तसेच शासकीय रुग्णालयांतून कर्करुग्णांची चांगली सुश्रृषा केली जात नाही. यामुळे सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फतच रुग्णांसाठी कर्करुग्णालय उभारावे असा विचार आरोग्य खात्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चर्चेला आणला.

‘निळाई’ने केली मतदारांशी सलगी !
उमेदवाराबरोबर एक दिवस

विजय चव्हाण/मुकुल पोतदार

स्थळ होते महात्मा फुले वाडय़ाचे. सकाळी आठला उमेदवार येणार म्हणून पक्षाचे कार्यकर्ते गोळा झाले होते. मात्र आठचे नऊ झाले तरी उमेदवार आले नाहीत, म्हणून चुळबूळ सुरू झाली. तेवढय़ात ‘उमेदवार आले’ असा गलका सुरू झाला आणि आलिशान गाडी तेथे येऊन थांबली. फुले वाडय़ाचा परिसर निळाईने फुलून गेला होता. उमेदवारांना पाहून घोषणा सुरू झाल्या. उमेदवारांच्या गळ्यात निळा आणि भगवा पंचा होता. उमेदवार उतरले आणि थेट फुलेवाडय़ात गेले. त्यांनी महात्मा फुल्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनोभावे नमस्कार केला.

‘टॅली इ.आर.पी.’ची नवी प्रणाली उपलब्ध
पुणे, १४ एप्रिल/ प्रतिनिधी

टॅली ग्राहकांसाठी ‘टॅली इ.आर.पी.’ नावाची नवीन संगणकप्रणाली टॅली सॉफ्टवेअरने नुकतीच सर्वसामान्य भारतीय उद्योजकाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून दिली आहे, अशा माहिती प्रीझम आय.टी. सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक पराग आपटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. टॅली इ.आर.पी. संगणक प्रणालीचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्या ऑफिसमधील माहिती व्यक्तींना जगभरात कोठेही व केव्हाही इंटरनेटद्वारे पाहता येते. तसेच इ.आर.पी. वर्गातील प्रणाली साधारणपणे पाच लाख रुपयांपासून काही कोटी किमतीच्या असून, टॅलीने मात्र १३ हजार ५०० रुपयांपासून टॅली इ.आर.पी. उपलब्ध करून दिली आहे.

‘कलमाडी यांचा जाहीरनामा हा नाकर्तेपणाचाच कबुलीनामा ’
पुणे, १४ एप्रिल/ विशेष प्रतिनिधी

काँग्रेसचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांचा जाहीरनामा हा त्यांच्या नाकर्तेपणाचाच कबुलीनामा असल्याची टीका करून गेल्या सतरा वर्षांत केलेले एक तरी विकासकाम त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हानही बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांनी दिले आहे. कलमाडी यांचा २००४ व २००९ चा निवडणूक जाहीरनामा लोकसत्तामध्ये आज प्रसिद्ध झाला. त्या नुसार २००४ च्या जाहीरनाम्यातील मुद्देच आताच्या जाहीरनाम्यात प्रामुख्याने मांडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या आधारेच कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत आज कलमाडींवर तोफ डागली. कलमाडी यांचा जाहीरनामा अस्वस्थ करणारा असून खोटं सहन होत नसल्याने आपण आज हे बोलत आहोत. २००४ च्या जाहीरनाम्यात कलमाडी यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत. याची खातरजमा करूनच आपण हे बोलतो आहोत, असेही ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी नागपूरला आदर्श शहर बनविले आहे. कलमाडी यांनी पुण्यासाठी काय केले, हे दाखवून द्यावे. मुळामुठा नदीचे वाटोळे झाले तरी त्यांना त्याची फिकीर नाही. पुण्यातील समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा मंत्रालयात चार वर्षे भिजत पडला पण त्याबाबत ते काही बोलत नाहीत. आधीचीच स्वप्न ते जनतेला पुन्हा दाखवित आहेत, असेही ते म्हणाले.

वेश्या व्यवसायातील पाच मुलींची सुटका
पुणे, १४ एप्रिल / प्रतिनिधी

सातारा रस्त्यावर बालाजीनगर येथील यश पॅलेस लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन अल्पवयीन व तीन सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी लॉजचा मालक व व्यवस्थापकासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राम पठारे, सहायक फौजदार गौतम मोरे, राजेंद्र सुर्वे, विलास शेडगे, तुकाराम माने, तानाजी निकम, पोलीस शिपाई धनश्री मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. लॉजचा व्यवस्थापक राम किसन निकम (रा. यश पॅलेस लॉज), गिऱ्हाईक संजीवकुमार विजयकुमार प्रसादसिंह व लॉजमालक कुमार (रा. येरवडा) या तिघांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तरुणाच्या खुनाबद्दल दोघांना अटक
पुणे, १४ एप्रिल / प्रतिनिधी

बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर गंगाधाम सोसायटीजवळील टेकडीवर तरुणाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. किरकोळ कारणावरून लातूरच्या निलंगा तालुक्यातील शिवनी गावाच्या धनराज प्रभाकर बिराजदार (वय २२) या तरुणाचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. गणेश भीमराव धोत्रे (वय १९, रा. बिबवेवाडी ओटा, मूळ रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) आणि संजय अशोक दरेकर (वय १९, रा. नवलाख उंबरा, तळेगाव दाभाडे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. लिंबू सरबताच्या गाडीवरचा गल्ला घेऊन पळून जाणे, तसेच लिंबू सरबताचे पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून बिराजदार याचा खून केल्याची माहिती धोत्रे व दरेकर या दोघांनी पोलिसांना दिली. अज्ञात मारेकऱ्यांनी एका २२ वर्षांच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. बिबवेवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र तरुणाची ओळख पटली नाही. त्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.दोघांनी बिराजदार याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

दहा रुपयाच्या नाण्याने भावना दुखावल्याचा दावा
पुणे, १४ एप्रिल/ प्रतिनिधी

केंद्र सरकारने नव्याने काढलेल्या दहा रुपये नाण्याच्या एका बाजूला अशोक चिन्ह व दहा रुपयाचा आकडा तर दुसऱ्या बाजूला दुहेरी रेषांचा क्रॉस छापला असल्यामुळे देशातील हिंदू-मुस्लीम-जैन आदी बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा आरोप हिमानी सावरकर आणि सहकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या मागे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा स्वार्थ असून, ख्रिश्चन मतदारांना खूष करण्यासाठी भारतीय चलनावर येशूचा क्रॉस छापून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सरकारने हे चलनी नाणे रद्द करावे. तसेच निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होत असून, निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी सावरकर यांनी केली .

‘आपले छंद ’ ला दीनानाथ दलाल पुरस्कार
पुणे, १४ एप्रिल/प्रतिनिधी

मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंकाचा दिनानाथ दलाल स्मृतिचिन्ह पुरस्कार २००८ आपले छंद या दिवाळी अंकास पंकज कुरुलकर यांच्या हस्ते मुंबई पत्रकार भवन येथे प्रदान करण्यात आला.गेल्या दहा वर्षांत आपले छंदला मिळालेला २१ वा पुरस्कार आहे. यापैकी ११ राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. या वेळी कुरुलकर म्हणाले की, आपले छंदसारखे दिवाळी अंकांनी आपले काम असेच केले तर मराठी भाषेला मरण नाही या वेळी शिलेदार म्हणाले की, शक्य झाल्यास २००९ चा अंक एकाच वेळी मराठी व गुजराती भाषेत प्रकाशित करण्याचा आपला विचार आहे. तसेच राज्यात ४५० दिवाळी अंक प्रकाशित होतात .आपले छंद हा अंक नेहमीच संग्राह्य़ दिवाळी अंक म्हणून गणला गेला आहे आणि म्हणूनच २००८ चा अंक अनेकांनी बक्षीस म्हणून वाटला होता. त्यांचीच पुनरावृत्ती या वेळी देखील व्हावी.

पवार यांची उद्या सासवडला सभा
सासवड, १४ एप्रिल/वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सासवड येथील पालखीतळ मैदानावर गुरुवार, १६ एप्रिल रोजी दु. ३.३० वाजता जाहीर प्रचार सभा होणार असल्याचे पुरंदरचे प्रचारप्रमुख सुदाम इंगळे यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी, ज.द. तसेच रिपाइं पुरस्कृत उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वरमहाराज पालखीतळावर शरद पवार यांची जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्धिप्रमुख नंदुकाका जगताप यांनी कळविले आहे. उद्धव ठाकरे यांची सासवडला २२ डिसेंबर २००८ रोजी झालेल्या सायंकाळच्या सभेने गर्दीचा विक्रम प्रस्थापित करून शिवसेना प्रवेशाचा बार विजय शिवतारे यांनी उडवून दिल्याने तो सर्वच पक्षांचा चिंतेचा विषय ठरला होता. तेव्हापासून सतत पाच महिने पवारविरोधात वातावरण तापवून १४० सभा व गावोगाव, वाडीवस्तीवर शिवसेनेच्या संपर्क शाखा सुरू करून तरुणांना संघटित करण्याचे काम शिवतारे यांनी केले असल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्या १६ एप्रिलच्या सभेकडे मतदार व कार्यकर्ते वेगळय़ा दृष्टीने पाहात आहेत.

उद्धव ठाकरे यांची उद्या चाकणला सभा
चाकण, १४ एप्रिल/वार्ताहर

शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा युतीचे आघाडीचे उमेदवार खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ ‘चाकण येथे गुरुवार १६ एप्रिल ०९ रोजी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचंी जाहीर सभा ’ आयोजित केली असल्याची माहिती शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख रामशेठ गावडे व भाजपाचे तालुकाध्यक्ष अमृत शेवकरी यांनी दिली. दरम्यान, मावळ लोकसभा मतदार संघातील भाजप सेना युतीचे उमेदवार गजानन बाबर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीरसभा गुरुवार १६ एप्रिल २००९ रोजी सायंकाळी ६ (सहा) वाजता तळेगावी समाजसेवक नथुभाऊ भेगडे प्राथमिक शाळेच्या प्रांगणात होणार आहे. अशी माहिती मावळ तालुका प्रचार प्रमुख व पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस अविनाश नवरे व जिल्हा शिवसेना अध्यक्ष मच्छिंद्र खराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठाकरे यांचे समवेत खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.

मोटारीतील ऐवज चोरणाऱ्या तिघांना अटक
पुणे, १४ एप्रिल/प्रतिनिधी

चालकाचे लक्ष विचलित करून मोटारीतील बॅग व लॅपटॉप चोरून नेणाऱ्या तिघांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पुणे एसटी स्थानकावर पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली.
मोहसीन अमरूद्दीन अन्सारी, पॉल डॅनियल डिसोझा व महेपालसिंग रामगोपाल सिंग (सर्व मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. इम्रान हारून शेख यांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली. लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अशोक गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, कॉन्स्टेबल अर्जुन कांबळे, नाना भांदुर्गे, युसूफ पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. इम्रान शेख हे आंबेडकर रस्त्यावर त्यांच्या मोटारीत बसले असताना, एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मोटारीच्या मागील बाजूस पैसे पडल्याचे सांगितले. शेख यांचे लक्ष विचलित होताच त्या चोरटय़ाने मोटारीतील बॅग चोरून नेली. याबाबत शेख बंडगार्डन पोलिसांकडे गेले. नजीकच्या एसटी स्थानकावर पोलिसांनी शोधाशोध केली असता, मुंबईला जाणाऱ्या एका बसमध्ये चोरटा बसलेला असल्याचे शेख यांच्या निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने स्वत:सह तिघांची नावे सांगितली. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.

अडवाणी यांची शुक्रवारी दौंडला जाहीर सभा
दौंड, १४ एप्रिल/ वार्ताहर

बारामती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या उमेदवार सौ. कांता नलावडे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांची जाहीर सभा शुक्रवारी (१७ एप्रिल) दुपारी एक वाजता दौंड शहरात होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली. त्याचप्रमाणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अ‍ॅड. रामभाऊ एल. सोनवणे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार कांता नलावडे यांना पािठबा दिल्याची माहिती परदेशी यांनी दिली.