Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
राज्य

देशाची प्रगती शेतकऱ्यांच्या भरवशावर -शरद पवार
उमरखेड, १४ एप्रिल / वार्ताहर

शेतकऱ्याला शंभर टक्के सिंचन व्यवस्था, विजेची व्यवस्था व पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिल्यास शेतकरी कधीही कर्ज मागणार नाही. या शेतकऱ्याच्या भरवशावरच देशाची आर्थिकस्थिती व प्रगती अवलंबून असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. हिंगोली मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार सूर्यकांता पाटील यांच्या प्रचार सभेत केंद्रीय कृषिमंत्री पवार बोलत होते.

गुजरातच्या दंगलीचा आदर्श घ्यायचा नाही -नारायण राणे
आर्वी, १४ एप्रिल / वार्ताहर

महाराष्ट्रात भाजपचा एकही प्रभावी नेता नाही. परिणामी राज्यात प्रचाराकरिता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आणावे लागत आहे. मोदी म्हणतात महाराष्ट्राचा गुजरात करू परंतु, आम्हाला गुजरातच्या दंगलीचा आदर्श घ्यावयाचा नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले.शेतकऱ्यांची ७१ हजार रुपयाची कर्जमाफी करणाऱ्या ‘लोकशाही आघाडी’ सरकारच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन त्यांनी सोमवारी येथील जाहीर सभेतून केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइंचे उमेदवार दत्ता मेघे यांच्या आर्वी येथील प्रचारसभेत राणे बोलत होते.

निवडणूक : अजूनही अंदाज पंचे..
जयप्रकाश पवार
नाशिक, १४ एप्रिल

पंधराव्या लोकसभेच्या मतदानाचा मुहूर्त आठवडाभरावर आल्यामुळे आता निवडणूक आखाडय़ात आवाज घुमू लागले आहेत. दैनंदिन प्रचार कार्यात कोणत्या उमेदवाराचे पारडे जड वा हलके आहे याच्या अंदाजासाठी हमखास वापरल्या जाणाऱ्या बेटींग तंत्राचीही जोरदार चर्चा असताना पंधरवडा होत आला तरी थांगपत्ता लागणे अशक्य. तथापि, प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा, त्यांची रणरणत्या उन्हात तावातावाने भाषण देण्याची उर्मी तसेच सवाल-प्रतिसवालांचा सिलसिला सुरु झाल्यामुळे आता खऱ्याअर्थी निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.

औष्णिक वीज, मायनिंग प्रकल्प आदी मुद्दय़ांचा लक्षणीय प्रभाव
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, १४ एप्रिल

औष्णिक वीज आणि मायनिंग प्रकल्प यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत आघाडीवर आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश राणे, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश प्रभू, बसपाचे उमेदवार डॉ. जयेंद्र परुळेकर, क्रांतीसेना उमेदवार अजय जाधव व अध्यक्ष उमेदवार सुरेंद्र बोरकर हे सिंधुदुर्गचे आहेत.

शेतकरीविरोधी सरकारची हकालपट्टी करा -स्मृती इराणी
चंद्रपूर, १४ एप्रिल/ प्रतिनिधी

नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना काँग्रेस ‘जय हो’चा नारा देऊन शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. अशा शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात मतदारांनी भूमिका घ्यावी, असे आवाहन भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केले. येथील गांधी चौकात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळू धानोरकर, सतीश भिवगडे, वनिता कानडे आदी उपस्थित होते. देशात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. शासनाच्या पॅकेजनंतरही मृतांची संख्या थांबली नाही हे सत्य असताना काँग्रेसवाले ‘जय हो’ होच्या तालावर नाचत असल्याची टीका त्यांनी केली. काँंग्रेसच्या सत्तेत देशात भारनियमन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पाच वर्षांच्या काळात देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली असून लोकांच्या विकासाऐवजी स्वत:चेच खिसे भरण्याचे काम केले. अशा सरकारला खुर्चीवरून खाली खेचा, असे आवाहन इराणी यांनी केले. याप्रसंगी हंसराज अहीर यांचेही भाषण झाले. यावेळी त्यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामाचा पाढा वाचला. रेल्वेतील प्रश्न, वेकोलि कामगार आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रश्नांवर त्यांनी मांडलेल्या मुद्यांची माहिती दिली. लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा संधी देण्याची विनंती त्यांनी नागरिकांना केली. यावेळी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

डॉक्टरांच्या संपामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडली
चंद्रपूर, १४ एप्रिल / प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणारे लोटी पटेल यांना अटक होत नाही तोवर संप सुरूच राहील, असा इशारा संपात सहभागी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. दरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, अशी विनंती आपण केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता हजारे यांनी दिली.
येथील जिल्हा रुग्णालयात ७ एप्रिल रोजी जिवती तालुक्यातील चिखली येथील तिरूपती बुटे याला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणात उपचार सुरू असताना लोटी पटेल यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. भेदे यांना मारहाण केली. या घटनेनंतर डॉ. भेदे यांनी शहर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर शहर पोलिसांनी पटेल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. मात्र, पटेल यांच्यावर अटकेची कारवाई केली नाही. पटेल यांच्यावर कारवाई केली का, अशी विचारणा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली असता पोलीस प्रशासनाच्यावतीने टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली, असा आरोप आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर रविवारी सकाळपासून बेमुदत संपावर गेले.

सिन्नरजवळील अपघातात तीन ठार
नाशिक, १४ एप्रिल / प्रतिनिधी

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर मोटारसायकल आणि टेम्पोची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तीन युवक ठार झाले. हे सर्व जण मूळचे हैद्राबाद येथील असून सध्या ते व्यवसायानिमित्त सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे वास्तव्यास होते. आज दुपारी हा अपघात झाला. त्यात मोटारसायकलवरील रमेश भिक्षापती कामोनी (३०), संवेदरामस्वामी व्हिएनवार (२८) व राजू नारायण अबिडोलू (२८) हे तिघे ठार झाले. अपघातानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेवून सर्वाना तातडीने रुग्णालयात हलविले. तथापि, तत्पुर्वीच या तरूणांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पारोळा स्फोटातील तिघांची ओळख पटली
धुळे, १४ एप्रिल / वार्ताहर

पारोळ्यातील सावित्री फायर वर्क्‍समध्ये झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांची आज ओळखपटली. या तिघांचेही मृतदेह अंत्यसंस्कारसाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पारोळा-अमळनेर रस्त्यावरील सावित्री फायर वर्क्‍समध्ये स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत २२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन धुळे जिल्हा रुग्णालयात झाले. आज आर. कालीराज रामचंद्र (३२), के. राजू. कण्णायन (४०) व ज्ञानेश वेडू पाटील (३२) या तिघांच्या मृतदेहांची ओळख पटली. या तिघांचीही ओळख अनुक्रमे बालसुब्रमण्यम रामैया, भेधर मुथा, आणि वीरभवान वेडू पाटील यांनी पटविली. मृतांपैकी आर. कालीराज व के. राजू हे तामिळनाडू येथील रहिवासी आहेत.