Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
  पर्याय अनेक, निर्णय मात्र एक!
  प्राध्यापकापेक्षा प्राथमिक शिक्षक होणे अवघड
  भूगोलाची व्याप्ती अमर्याद
  डीलिंग रूम ऑपरेटर
  बी एम्पॉवरमेंट!
  संशोधन अभिकल्पातील पूर्वग्रह
  ब्युटी इंडस्ट्रीतील व्यवसायाची संधी..
  एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
  एच. आर. मनुष्यबळ क्षेत्रातील उत्तुंग करिअर
  उद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनातील दरी

 

प्रश्न : मी १० वीची परीक्षा दिली असून, मला भूगोल विषय आवडतो. ‘भूगोल’ या विषयामध्ये करिअर कसे करता येईल याची माहिती द्यावी
-उपेंद्र जाधव

- भूगोलाची व्याप्ती अमर्याद आहे. अगदी प्राचीन काळापासून भूगोलाचा अभ्यास सुरू झाला. नकाशे तयार करून भोवतालचं जग जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. मध्ययुगात धाडसी युरोपीय दर्यावर्दीनी भूगोलाच्या मदतीनेच नवीन जग, सागरी मार्ग शोधण्यासाठी शिडे हाकारली आणि या पृथ्वीचा विस्तार माणसाला कळत गेला. भूगोल म्हणजे नद्या, डोंगर, जंगलं, जमिनी, हवामान, तापमान या नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणं, एवढंच त्याचं मर्यादित स्वरूप एकेकाळी होतं. मात्र विसाव्या शतकात भूगोलाचं स्वरूप अधिक व्यापक बनलं. केवळ नैसर्गिक भूगोलाचा अभ्यास न राहता आर्थिक व नागरी भूगोलाला महत्त्व प्राप्त झालं. म्हणजेच प्राकृतिक भूगोलाबरोबर मानवी भूगोल ही नवीन शाखा अस्तित्वात आली. या शाखेत मानवी व्यवहार, संस्कृती, भाषा, धर्म यांचा
 

अभ्यास. मानवाचा पर्यावरणाशी असलेला परस्पर संबंध, लोकसंख्या, शहरं, व्यवसाय, राजसंस्था इत्यादींचा अभ्यास होऊ लागला. पर्यायाने राज्यशास्त्र, समाजशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा अनेक विद्या शाखांशी संबंध येऊन भूगोल आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा बनली.
अलीकडच्या दोन-तीन दशकांतील संगणक व अवकाश क्रांतीने भूगोलाला अजूनच झळाळी प्राप्त झाली आहे. संगणकीय नकाशाशास्त्र, सुदूर संवेदन (Remotesensing) भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांसारख्या नवीन तंत्रांची भर भूगोलाच्या अभ्यासात पडली आहे. भूगोलात करिअर करण्याच्या दृष्टीने अनेक उपशाखा आहेत.
* भूगर्भशास्त्र (जिओलॉजी) :-
पृथ्वीच्या बाह्णा स्वरूपाप्रमाणेच तिचे अंतरंगही अभ्यासाचा विषय आहे. भूगर्भातल्या हालचाली, त्यातून उद्भवणारे भूकंप, ज्वालामुखी, जमीन/ समुद्रांची निर्मिती वा स्खलन, विविध रंगांच्या व आकारांच्या खडक व रत्नांची निर्मिती या सर्वामागे भूगर्भातील कोणत्या नैसर्गिक प्रक्रिया जबाबदार आहेत, याचा अभ्यास भूगर्भशास्त्रात केला जातो. अर्थात, भूगोलाबरोबरच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या मूलभूत विज्ञानांचाही अभ्यास भूगर्भशास्त्रात आवश्यक ठरतो.
भूगर्भशास्त्राच्या अभ्यासाचा उपयोग मानवी तसंच एकूण सजीव सृष्टीची उत्पत्ती व उत्क्रांती समजण्यासाठी उपयुक्त ठरतो. देशाच्या आर्थिक विकासात खनिजांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. भूगर्भातील खनिजांचा शोध लावण्यासाठीही भूगर्भशास्त्र मदत करतं. आजकाल दुर्मीळ होत चाललेल्या पाण्याच्या साठय़ांच्या पाश्र्वभूमीवर भूजलाचा शोध घेण्यासाठीही हे शास्त्र उपयोगी पडतं. अणुऊर्जानिर्मितीसाठी आवश्यक खनिज साठय़ांचा शोध, समुद्री तेलाचा शोध, हिरे व मौल्यवान रत्नांचा शोध या सर्वात भूगर्भशास्त्र मदत करत. भूगर्भशास्त्रज्ञांना अनेक क्षेत्रांतून मागणी आहे. संरक्षण दलात तसंच जिल्हास्तरीय सहकारी वा नाबार्डसारख्या बँकांमध्ये मोठमोठय़ा तेल कंपन्या, सरकारी भूविज्ञान विभाग अशा कित्येक ठिकाणी त्यांना संधी मिळू शकते. अर्थात, त्यासाठी भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण ही किमान आवश्यकता असते. भूगर्भशास्त्रातील अभ्यासक्रम शिकवणाऱ्या काही संस्था.
सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई.
भवन्स महाविद्यालय, गिरगाव.
सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार.
मुंबई विद्यापीठ, कालिना.
फग्र्युसन महाविद्यालय, पुणे.
अमरावती विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ
नागपूर विद्यापीठ
याशिवाय आय.आय.टी., मुंबई, खरगपूर व रुरकी इथे भूगर्भशास्त्रात एम.एस्सी., एम.टेक व पीएच.डी. अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
एम.एस्सी.साठी जॅम ही प्रवेश परीक्षा, तर एम.टेक्साठी गेट (GATE) ही परीक्षा घेतली जाते.
आय.आय.टी.व्यतिरिक्त मुंबई विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, गोवा विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, सेंट झेविअर्स महाविद्यालय येथेही पीएच.डी. करता येते.
* पर्यावरणशास्त्र :
ग्लोबल वॉर्मिग, ओझोन स्तर छिद्र आदी जागतिक पर्यावरण समस्यांची जाणीव भूगोलतज्ज्ञांनीच जगाला करून दिली. पर्यावरणशास्त्रज्ञांना सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांच्या तसंच शासकीय पर्यावरणविषयक प्रकल्पांवर काम करता येतं. स्वत:ची पर्यावरणविषयक कन्सल्टन्सीही काढता येते.
अभ्यासक्रम: एम.एस्सी. (पर्यावरणशास्त्र) हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ व भारती विद्यापीठ, पुणे येथे उपलब्ध आहे. त्यासाठी बी.एस्सी. (भूगोल) ही पदवी आवश्यक आहे. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ही पदवी घेता येते.
* जी.आय.एस. अ‍ॅण्ड रिमोट सेन्सिंग :-
नकाशे तयार करणं (काटरेग्राफी) हे भूगोलतज्ज्ञांचं स्वाभाविक काम आहे. आज संगणकाच्या मदतीने त्यात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश झाला आहे. जी.आय.एस. म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे संगणकाच्या मदतीने नकाशा तयार करण्याचं तंत्र. या तंत्राच्या सहाय्याने भूमीउपयोजन, नगरनियोजन, संपदा व्यवस्थापन इत्यादींसाठी उपयुक्त नकाशे वापरून उपाययोजना केली जाते. रिमोट सेन्सिंगच्या (सुदूर संवेदन प्रतिमा) सहाय्याने विविध क्षेत्रीय समस्यांचा मागोवा घेता येतो.
अभ्यासक्रम :- भारतात हैदराबाद येथील इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी व डेहराडून येथील रिमोट सेन्सिंग इन्स्टिटय़ूट या दोन अग्रगण्य संस्थांत आठ दिवसांपासून ते अकरा महिने कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संपर्कासाठी-
नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी (डिपार्टमेंट ऑफ स्पेस, भारत सरकार), बलागनगर, हैदराबाद- ५०००३७ दूरध्वनी - ०४०-२३८७९५७२-७६, वेबसाइट : www.nrsa.gov.in
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिमोट सेन्सिंग : कालिदास मार्ग, डेहराडून- २४८००१ दूरध्वनी : ०१३५-२५२४१०५,
वेबसाइट www.iirs-nrsa.gov.in
पुणे विद्यापीठ : पुणे विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएट बी.एस्सी. (अप्लाइड) इन जी.आय.एस. अ‍ॅण्ड रिमोट सेन्सिंग हा एक वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला आहे. यासाठी बी.एस्सी. (कृषी), बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स, एम.सी.ए., बी.ए. (गणित/संख्याशास्त्र) बी.ई., बी.ए. (भूगोल), एम.ए. (भूगोल) या विषयात किमान ५० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी पात्र असतात.
अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यात ५० गुणांचे दोन विभाग असतात. पहिल्या विभागात जनरल अ‍ॅप्टिटय़ूडवर आधारित प्रश्न असतात, तर दुसऱ्या विभागात आपल्या पदवीच्या विषयानुसार प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतं. परीक्षेची जाहिरात प्रमुख वृत्तपत्रांतून प्रकाशित केली जाते.
या अभ्यासक्रमात रिमोट सेन्सिंग, जी.आय.एस., काटरेग्राफी, डिजिटल इमेज प्रोसेसिंग इत्यादी विषयात प्रकल्प, फिल्डवर्क व ट्रेनिंगद्वारे प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या इस्रो या प्रतिष्ठित अंतराळ विज्ञान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली चालतो. अभ्यासक्रमानंतर खगोल संशोधन संस्था, कृषी संशोधन संस्था, पर्यावरण अभ्यास संस्था, सॉफ्टवेअर निर्मिती संस्था अशा विविध ठिकाणी करिअरच्या संधी उपलब्ध होतात.
अधिक माहितीसाठी :- कोऑर्डिनेटर, भूगोल विभाग, पुणे विद्यापीठ - ४११००७. दूरध्वनी- ०२० २५६९३३७०
वेबसाइट : www.unipune.event.in
पुणे विद्यापीठातच एम.एस्सी. (जिओइन्फॉर्मेटिक्स) हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही आहे. एकूण ३० प्रवेशक्षमता असून, जून महिन्यात त्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते.
बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा, रांची, झारखंड.
अभ्यासक्रम :- एम. एस्सी. (जिओइन्फॉर्मेटिक्स), एम. टेक (रिमोट सेन्सिंग),
पीएच.डी. (रिमोट सेन्सिंग)
बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोलकाता व जयपूर
अभ्याक्रम - एम. एस्सी. (जिओइन्फॉर्मेटिक्स)
एम. डी. एस. विद्यापीठ, अजमेर, राजस्थान.
जवाहरलाल नेहरू टेक्निकल विद्यापीठ, हैदराबाद.
आय.आय.टी. (रुरकी, कानपूर, खरगपूर)
ए.पी. विद्यापीठ, हैदराबाद.
* शहरी व प्रादेशिक व्यवस्थापन/ आर्थिक भूगोल:
नागरी नियोजन, वाहतूक नियोजन प्रादेशिक नियोजन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, नवीन उद्योग बाजार इत्यादींचं योग्य स्थान शोधून काढणं, इत्यादी नियोजन- व्यवस्थापन भूगोलाचं महत्त्व खूप आहे. लोकेशन एक्स्पर्ट, बाजार सर्वेक्षण (मार्केट रिसर्चर), जागांचे भाव निर्धारक अशा कित्येक करिअरच्या संधी मिळू शकतात.
प्रशिक्षण :- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट तसंच अन्य व्यवस्थापन संस्थांत शहरी नियोजनासंदर्भात अभ्यासक्रम आहेत. पुण्यात सी.डी.एस.ए. (पौड रस्ता), येथेही अत्यंत उपयुक्त पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
* भूगोलातील अन्य करिअर संधी :-
भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण क्षेत्रातही जाता येतं. एम. ए. (भूगोल) व बी.एड. केल्यावर शाळा तसंच कनिष्ठ महाविद्यालयात शिकवता येते. एम.ए. (किमान ५५ टक्के) नंतर नेट/सेट परीक्षा देऊन वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता होता येतं. याशिवाय स्पर्धा परीक्षांना (नागरी सेवा परीक्षा इ.) वैकल्पिक विषय म्हणून भूगोल उत्तम पर्याय समजला जातो. त्याव्यतिरिक्त पर्यटन क्षेत्रातही भूगोल जाणकारांना स्वत:ची ट्रॅव्हल एजन्सी चालवणं, पर्यटन सल्लागार म्हणून काम करणं असे पर्याय असतात. पर्यटनविषयक किंवा भौगोलिक घडामोडींविषयी लेखन करणे हाही एक चांगला पर्याय असतो.
पुणे येथील फग्र्युसन महाविद्यालयातील जगन्नाथ राठी संस्थेत पुढील दोनेक वर्ष मुदतीचे पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
प्रवास आणि पर्यटन. ४ भूराजनीती आणि आंतरराष्ट्रीय संबंध.
आजचं जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलं आहे. जगाच्या एका कोपऱ्यात घडणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे पडसाद लगेच दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचतात व यात भूगोलाचा वाटा मोठा आहे. म्हणूनच २१ व्या शतकात राहणाऱ्या ग्लोबल सिटिझन्सना भूगोलाचा अभ्यास करणं अपरिहार्य आहे.