Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
  पर्याय अनेक, निर्णय मात्र एक!
  प्राध्यापकापेक्षा प्राथमिक शिक्षक होणे अवघड
  भूगोलाची व्याप्ती अमर्याद
  डीलिंग रूम ऑपरेटर
  बी एम्पॉवरमेंट!
  संशोधन अभिकल्पातील पूर्वग्रह
  ब्युटी इंडस्ट्रीतील व्यवसायाची संधी..
  एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
  एच. आर. मनुष्यबळ क्षेत्रातील उत्तुंग करिअर
  उद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनातील दरी

 

आपण पाहतोच की शेअर बाजारात दररोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. कितीही मंदी किंवा तेजी असो शेअर बाजारातील ट्रेडिंगला खूपच महत्त्व असते. अचूक ट्रेडिंगचा शेअर बाजाराच्या कामकाजावर खूपच परिणाम होतो. एवढेच नव्हे तर अचूक ट्रेडिंग केल्यामुळे केवळ गुंतवणूकदारालाच नव्हे तर दलालालासुद्धा खूप फायदा होतो आणि म्हणूनच अचूक व चटपटीतपणे ट्रेडिंगचे काम करणाऱ्याला खूप महत्त्व दिले जाते. अशा लोकांची गुंतवणूक उद्योगात कायमच जरुरी असते. अचूकपणा आणि कामाचा झपाटा म्हटल्यावर आपल्यासमोर एखादे चुणचुणीत व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे येते. चुणचुणीतपणा बरोबरच अल्पकाळातील अनुभवातून पटकन ग्रहण करण्याची क्षमता असणारच. डीलिंग रूम ऑपरेटर या करिअरमध्ये तग धरू शकतो. २०/२५ ते ४०/४५ या वयोगटातील मुलामुलींना हे करिअर सुचविण्यात येते, कारण हे अपेक्षित गुण त्यांच्या
 

सळसळत्या ताकदीशीही संबंधित आहेत. फिनक्वेस्ट सेक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत स्वत:चे यशस्वी करिअर करून दाखविणाऱ्या जॅकी गांधी या गद्धे पंचविशीतील तरुणाचे रोल मॉडेल जाणीवपूर्वक सादर करीत आहोत.
१. डीलिंग रूम ऑपरेटर हे करिअर आहे हे आपल्याला कसे कळले?
२००२-०३ मध्ये मी माझ्या वडिलांबरोबर एका शेअर दलालाच्या कार्यालयात जाऊ लागलो. माझ्या डॅडींकडे काही शेअर्स होते. त्याबद्दल तिथे चर्चा चालत. त्या चर्चा मी उत्सुकतेने ऐकत असे. हळूहळू या विषयातला माझा रस वाढू लागला. वर्तमानपत्रांचे या दृष्टीने वाचन करू लागलो. माझे काका शेअर बाजारात ट्रेडर होते. मी त्यांच्याकडे जाऊ लागलो. की-बोर्डचा वापर कसा करावा ते मी तिथे शिकलो.
२. आपली कौटुंबिक आणि शैक्षणिक पाश्र्वभूमी काय आहे?
या करिअरची पाश्र्वभूमी माझ्या घरातून तयार झाली असे म्हणता येणार नाही. माझे वडील डॉक्टरांकडे काम करतात. आई गृहिणी आहे. लहान भाऊ सीएफए करत आहे. मी मुंबई विद्यापीठातून बी. कॉम. केल्यानंतर डीबीएम पूर्ण केले. राष्ट्रीय शेअर बाजाराची डीलर होण्यासाठी जी परीक्षा कंपल्सरी आहे ती दिली.
३. या करिअपर्यंत कसे पोचलात?
बाजाराच्या अभ्यासाला सुरुवात केली. तो जाणून घेण्यासाठी सतत धडपडलो, धडपडत आहे. अनेक कंपन्यांच्या उद्योगांचा अभ्यास केला. इथे कुठलाही शॉर्टकट नाही. २००४ मध्ये विसाव्या वर्षी फ्रांचाईसी म्हणून काम करू लागलो. अनुभवातून मी स्वत:ची मशागत करून स्वत:ला सुपीक बनवू लागलो. स्वत:चा विकास करू लागलो. या साऱ्या मेहनतीला सुदैवाने एका शुभप्रभाती फळ आले. फिनक्वेस्ट सेक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित पेढीत मी डीलिंग रूम ऑपरेटरचे काम करू लागलो.
४. आपल्या विशेष कामासाठी कोणत्या प्रकारचे वातावरण आवश्यक असते?
राऊटर, टी.व्ही., टेक्निकल अ‍ॅनालिस्ट, क्लायंटशी थेट संपर्क साधण्याची सुविधा या बेसिक गरजा आहेत.
५. आम्ही असं ऐकलंय की आपल्या कामात गुप्तता बाळगण्याला खूप महत्त्व आहे. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?
हो खरं आहे ते. ही गुप्तता आवश्यकच आहे. त्यामुळे कामाच्या वेळात आमच्या रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. अलीकडे तर बऱ्याच वेळा बाजाराचं वातावरण खूपच गोंधळाचं असतं. अशा वेळी घेतलेल्या शॉर्ट पोझिशन कोणालाही न कळणं हेच हितावह असतं. अन्यथा आपल्या नफ्यावर विपरीत परिणाम होईल. आपल्या पोझिशनचा अन्य व्यक्ती गैरफायदा घेण्याचा यात धोका नक्कीच असतो.
६. आपल्या अचूक कामाचे रहस्य काय? चूक झाली तर काय करावे?
टच वुड! माझ्या हातून आजपर्यंत एकही चूक झाली नाही. यासाठी स्वभावात शांतता, तंतोतंतपणा, एकाग्रता या गुणांची आवश्यकता आहे. संगणकाच्या कामातील पारंगतता प्रॅक्टिसने येते. जर एखाद्याच्या हातून चूक झाली तर ती त्याने मोकळेपणाने सांगावी. समजूतदार क्लायंट आपल्याला समजून घेऊ शकतो, अन्यथा दलालामार्फत कळवावे.
७. आपल्याला प्रोत्साहन भत्ता असतो काय?
होय. वेतनाबरोबर प्रोत्साहन भत्ताही असतो. दरवर्षी टारगेटस् ठरवून देण्यात येतात.
८. हे करिअर करू इच्छिणाऱ्यांना आपण कोणत्या टिप्स द्याल?
आपले मित्र आणि सहकारी यांच्याबरोबर सहज नाते असावे. केवळ भावनिक नसावे. कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नये. सहकाऱ्यांच्या पाठिंब्याखेरीज एकटेपणाने आपण उत्कर्षांप्रत जाऊ शकत नाही हे लक्षात असू द्या. तुम्ही स्मार्ट असाल तरच इथे टिकाव धरू शकता. आज्ञाधारकपणे स्वत:ला झोकून देऊन काम करा. सतत वाचन करा. ज्ञान मिळवा. काम करण्याची तहान लागली पाहिजे. कधीही डिस्टर्ब होऊ नका. तुमच्या ग्रहणशक्तीवर तुमचे यश अवलंबून आहे.
९. या करिअरला कितपत स्कोप आहे?
शेअर बाजारात सध्या मंदीचे वातावरण असल्यामुळे कामावर परिणाम झालेला आहे; परंतु ही स्थिती तात्पुरती आहे. मंदीनंतर तेजी येतेच. त्या वेळी काम खूप वाढणार आहे, याची मला खात्री आहे.
१०. या गुंतागुंतीच्या कामाला न्याय देण्यासाठी स्वत:ला फिट कसे ठेवता?
अनेकजण हे काम कंटाळून सोडून देतात. सर्वच डीलर ४० ते ४५ वयापर्यंतच काम करू शकतात असा आजवरचा अनुभव आहे. डोळे लवकर थकतात. ९.५५ ते ३.३० पर्यंत सतत एकाग्रपणे काम करताना अनेकवेळा दुपारचे जेवण करणेही शक्य होत नाही. तशी तर डय़ुटी ८.३० ते ६ एवढा वेळ असते. मी अजून विवाहबद्ध झालेलो नाही. सर्फिग, मित्रांबरोबर चॅटिंग करतो. सिनेमे पाहतो. विंडो शॉपिंग करतो. क्रिकेट खेळतो. संगीत श्रवण करतो. मी कानसेन आहे.
११. डीलरचे काम करताना खास नोंद घ्यावी असा आपला कोणता टप्पा सांगता येईल? आपले ध्येय काय आहे?
हे काम करायला सुरुवात केल्यापासून तीन वर्षांत मी देशी व विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा डीलर झालो. सेल्स ट्रेडर व्हावे हे माझे ध्येय आहे.
वरील संभाषणावरून असे लक्षात येते की या करिअरमध्ये गांभीर्याने काम करणे खूपच महत्त्वाचे आहे. असे असले तरी त्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे छांदिष्टपण व रसिकतेचे पैलूदेखील टिकवून ठेवलेले आहेत. स्वत:चा ताणतणाव घालविण्यासाठी या साऱ्यांचा तो चांगलाच उपयोग करतो, हे यातून शिकण्यासारखे आहे. पर्सनल लाइफ मारण्याची गरज नाही हा खास संदेश त्याच्या संभाषणातून सापडतो.
मेक द मोस्ट.
सुरेखा मश्रुवाला
शब्दांकन : डॉ. शुभांगी वाड-देशपांडे

shweni45@hotmail.com
फोन : ०२२-२६३२१४८१.