Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
  पर्याय अनेक, निर्णय मात्र एक!
  प्राध्यापकापेक्षा प्राथमिक शिक्षक होणे अवघड
  भूगोलाची व्याप्ती अमर्याद
  डीलिंग रूम ऑपरेटर
  बी एम्पॉवरमेंट!
  संशोधन अभिकल्पातील पूर्वग्रह
  ब्युटी इंडस्ट्रीतील व्यवसायाची संधी..
  एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
  एच. आर. मनुष्यबळ क्षेत्रातील उत्तुंग करिअर
  उद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनातील दरी

 

वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धतीच्या स्वरूपामुळे पूर्वग्रहाचा समावेश संशोधनात होत असतो. पूर्वग्रह तुलनात्मकदृष्टय़ा या पद्धतीमध्ये जास्त प्रमाणावर दिसून येतो. पूर्वग्रहाला अभिनती असाही शब्दप्रयोग केला जातो. अभिनती म्हणजे न्यादर्शनातील यादृच्छिकरणात अडथळा आणणारा कोणताही प्रभाव होय. त्याचा परिणाम निष्कर्षांवरदेखील होतो. संशोधकाच्या अजाणतेपणी अभिनतीचा प्रवेश संशोधनात कसा होतो ते पाहू.
न्यादर्श पद्धती
काही वेळा अभिनती न्यादर्शनाच्या पद्धतीमुळे येऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही यादृच्छिक न्यादर्श निवडण्याचे ठरवू शकता, त्यानुसार विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळेत दिसणाऱ्या स्कूरटच्या नंबरपासून सुरुवात करू शकाल. त्या विशिष्ट कालखंडात
 

कोणती स्कूटर तुम्हाला दिसेल हे निश्चित नसते, त्यामुळे तुम्ही निवडलेल्या पद्धतीत यादृच्छिकरण आहे हे सत्य. आपण जर अशा रीतीने न्यादर्श निवडला तर ज्यांच्याकडे स्कूटर नाही त्यांना आपण वगळतो हे उघड आहे. याचाच अर्थ असा की, आपण विशिष्ट प्राप्ती असलेल्या लोकांकडे पाहत आहोत, म्हणून आपले येणारे निष्कर्ष हे केवळ विशिष्ट मर्यादित प्राप्ती असलेल्या लोकांशीच निगडित राहतील. संपूर्ण जनसंख्येच्या संदर्भात उपयुक्त ठरणार नाहीत, हीच अभिनती असेल.
प्रश्नावल्या
प्रश्नावली प्रकार अभ्यासातदेखील संशोधकाच्या नकळत अभिनती येत असते. तुम्ही प्रश्नावली तयार करता व दक्षतापूर्वक निवडलेल्या न्यादर्शाला पाठवून देता. सर्वच लोक प्रश्नावली भरून पाठवीत नाहीत. तेथेही मोठय़ा प्रमाणावर गळती असते. शिवाय तुमच्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न नाजूक असतो. मग तो लोकांच्या उत्पन्नाबाबत किंवा त्यांच्या खासगी जीवनाविषयी असेल. कदाचित अशा प्रश्नामुळे आपण अडचणीत येऊ या भीतीने पुष्कळशा लोकांनी तुमच्या प्रश्नावल्या परत पाठविल्या नसतील. ही संख्यादेखील सर्वसाधारण गळतीमध्ये भर घालते. अशा रीतीने प्रश्नावलीमुळे संशोधनात अभिनती येऊ शकते.
मुलाखती
मुलाखती घेत असता काही व्यक्तींच्या संदर्भात तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे अभिनती येते. काही वेळा तुमच्या बोलण्यातील चढ-उतारामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचे उत्तर अपेक्षित आहे, हे श्रोत्याला सुचविले जाते. ही कृती स्वाभाविकपणे घडते व संशोधकाला याची जाणीवही नसते. समजा, तुम्ही मुलाखती घेतलेल्या १०० लोकांपैकी १० टक्के लोकांवर तुमचा प्रभाव पडला व तुम्हाला याची कल्पनाही नाही. प्रतिवेदकांच्या उत्तरांचे जेव्हा तुम्ही विश्लेषण करता त्या वेळी या गोष्टी विचारात घेत नाही. अशा रीतीने अभिनतीचा प्रवेश होतो व निष्कर्षांवर त्याचा परिणाम होतो.
अभिनती हा एक संशोधनात अंतर्भूत असलेला वास्तव घटक आहे. तज्ज्ञ संशोधकाला याची जाणीव असते, असा कर्तव्यदक्ष संशोधक आपल्या अभ्यासासाठी अभिनती व पूर्वग्रह कोणत्या ठिकाणी आहे, त्याचा प्रामाणिकपणे उल्लेख करतो.
वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धतीमध्ये पुष्कळशी माहिती दिलेली असते. संशोधकाला या माहितीचे अर्थनिर्वचन करावयाचे असते हे लक्षात ठेवायला हवे. पुष्कळसे संशोधक प्रश्नावल्या तयार करणे, त्या पाठविणे, परत त्याचे संकलन वा संग्रहण करणे, त्यातील माहितीची मांडणी करणे या पलीकडे जात नाहीत. त्यासाठी संशोधन आराखडा नेहमी समोर ठेवणे आवश्यक आहे. तो एक प्रकारचा नकाशाच आहे. त्यामधून केवळ माहितीचे संकलन पुरेसे नसल्याची जाणीव होते. आराखडा जर चांगला असेल तर त्यामधून तुम्ही माहितीचे अर्थनिर्वचन कसे करणार आहात याची स्पष्ट कल्पना येते. यापुढे जाऊन माहितीचे मूल्यमापन व अर्थनिर्वचन या कृती सुरू करू शकता.
माहितीचे अर्थनिर्वचन
संशोधन म्हणजे माहितीचे केवळ संकलन नव्हे, त्यामध्ये माहितीचे अर्थनिर्वचन महत्त्वाचे असते. यांचा आम्ही वारंवार उल्लेख केलेला आहे. चर्चमध्ये जी मूलभूत तत्त्वे आढळली त्यांच्या आपण एकत्रित नोंदी करू.
माहितीची कार्यवाही कशी करणार याची नोंद आराखडय़ामध्ये करणे आवश्यक असते, त्याचे पद्धतशीर वर्णन करून प्रत्येक उपसमस्येला तुम्ही जमवलेली माहिती संबंधित आहे याची खात्री करून घ्यावी व नंतर त्यांचे स्पष्टीकरण करावे.
माहितीचे अर्थनिर्वचन तुम्ही कसे करणार आहात याची नोंद आराखडय़ामध्ये करणे आवश्यक असते. कारण त्याचा संबंध खालील तत्त्वांशी असतो.
माहितीच्या अर्थनिर्वचनातील प्रत्येक पायरी निश्चित करणे, माहितीचे मापन कसे करणार आहात, कोणत्या सांख्यिकी तंत्राचा वापर करणार आहात ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. समजा तुम्हाला मध्यवृत्तीचा वापर करावयाचा आहे तर कोणत्या कारणासाठी त्याचा वापर करू इच्छिता? त्यामधून कोणत्या गोष्टी स्पष्ट होतील?
संग्रहित माहिती तुमच्या निष्कर्षांना दुजोरा देते याची खात्री करा. काही वेळा ही गोष्ट दुर्लक्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकदम निष्कर्षांप्रत येऊ नका. प्रत्येक टप्प्यात माहितीचा संदर्भ घेऊन तुम्ही कोणती माहिती संग्रहित केली व कोणता निष्कर्ष काढला याचा संबंध प्रस्थापित करावा लागतो.
या घटकामध्ये आपण वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धतीची वैशिष्टय़े विचारात घेतली. ज्या वेळी आपल्याला सभोवतीच्या पर्यावरणातील वास्तवतेचे, माहितीचे, घटनांचे निरीक्षण करावयाचे असते तेव्हा ही पद्धती उपयुक्त ठरते. माहिती संग्रहित करण्याची तंत्रे अभ्यासली आणि विशेषत: अभिनतीच्या बाबतीतील मर्यादा पाहिल्या. न्यादर्श हे एक संशोधनातील आव्हान असल्याचे दिसून आले आणि जास्तीत जास्त प्रमाणात खऱ्या अर्थाने संधीचे प्राबल्य प्रत्येक ठिकाणी कसे राखता येईल याचा गांभीर्याने विचार केला, त्यामुळे प्रसामान्य वक्र कार्यरत राहील.
रणजित राजपूत
rajputrl@yahoo.co.in