Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
  पर्याय अनेक, निर्णय मात्र एक!
  प्राध्यापकापेक्षा प्राथमिक शिक्षक होणे अवघड
  भूगोलाची व्याप्ती अमर्याद
  डीलिंग रूम ऑपरेटर
  बी एम्पॉवरमेंट!
  संशोधन अभिकल्पातील पूर्वग्रह
  ब्युटी इंडस्ट्रीतील व्यवसायाची संधी..
  एअरक्राफ्ट मेटेनन्स इंजिनीअरिंग
  एच. आर. मनुष्यबळ क्षेत्रातील उत्तुंग करिअर
  उद्योग क्षेत्रातल्या व्यवस्थापनातील दरी

 

दहावी- बारावीच्या परीक्षा संपून, शाळा- कॉलेजेसच्या परीक्षा सुरू झाल्या, त्यानंतर पदवी- पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील. मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये दरवर्षीच परीक्षांची धांदल प्रत्येक घराघरांमध्ये उडालेली असते. आणि परीक्षेनंतरचा जो कालावधी असतो तो धमाल उडविण्याचा म्हणजेच सुट्टीचा कालावधी. परंतु याच कालावधीचा वापर इ. १० वी, १२ वी किंवा पदवी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी योग्य करिअरची निवड करण्यासाठी वापरला तर नक्कीच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. करिअरची योग्य निवड हे भविष्य घडविण्याच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे व निर्णायक असे पहिले पाऊल असते. अशा वेळी योग्य निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाची अशीच गोष्ट असते. अन्यथा ‘निर्णय न घेणं हासुद्धा एक निर्णयच आहे’, हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला हवे. बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की,
 

विद्यार्थी पदवीधर झाला तरी त्याला नेमकं उमगलेलंच नसतं की जीवनात त्याला काय हवंय? अशा प्रकारचं वागणं म्हणजे, ट्रेन तर पकडायचीच, परंतु कुठे जायचंय हेच माहीत नसण्यासारखं झालं. नि:संशयपणे याचा परिणाम काय? तर वेळेचा आणि पैशाचा अपव्यय, हाच असू शकतो. असं होऊ नये अशी इच्छा असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांने या कालावधीचा परिपूर्ण वापर करून अर्थपूर्ण व प्राप्त करता येण्यासारखं ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. हा निर्णय घेत असताना प्रत्येकाने स्वत:चे शिक्षण, आवड, ज्ञान, अनुभव त्याचप्रमाणे वृत्ती, क्षमता, सध्या बाजारपेठेत असलेली मागणी, स्वत:च्या कमतरता आणि स्वत:चे सामथ्र्य इ. मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घेणे हितावह ठरते.
ढोबळमानाने स्पष्ट करायचे झाले तर पदवीनंतरचे करिअर पर्याय खालीलप्रमाणे असू शकतात.
* सर्वसामान्यपणे पहिला पर्याय म्हणजे कॉमर्स, आर्टस् किंवा सायन्स शाखेतील एखाद्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे. असा निर्णय घेताना स्वत:ची आवड व भविष्यातील संधी याचा विचार करायलाच हवा.
* दुसरा पर्याय म्हणजे पूर्ण वेळ व्यावसायिक अभ्यासक्रम करून दूर- शिक्षणाद्वारे मास्टर डिग्रीचा अभ्यास करणे किंवा एखादा अर्धवेळ अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा तुम्ही पूर्ण वेळ एखादा जॉब करून, दूर शिक्षणाद्वारे पुढील शिक्षणदेखील घेऊ शकता.
* तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षांचा देखील पूर्ण वेळ अभ्यास करू शकता.
* किंवा एखादा स्वत:चा व्यवसाय चालू करू शकता वा परंपरागत असलेला कुटुंबाचा व्यवसाय पुढे चालवू शकता.
विद्यार्थी मित्रांनो, करिअर घडविण्यामध्ये सर्वात प्रमुख वास्तव घटक म्हणजे तुमचे करिअर घडविण्यामागे किंवा बिघडविण्यासाठी तुम्ही आणि फक्त तुम्हीच बऱ्याचदा जबाबदार असता हे पक्के लक्षात ठेवा. सकारात्मक वृत्ती, योग्य दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या साह्य़ाने तुम्ही जे इच्छित आणि जे ध्येय ठरविता त्यापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकता, मात्र जर तुम्ही स्वप्नच पाहिले नाहीत तर ते पूर्ण होण्याचा प्रश्नच उरत नाही. मानवाचं मन जी काही कल्पना करू शकतं, इच्छा करू शकतं आणि त्यावर विश्वास ठेवू शकतं ते तो साध्य करू शकतो. करिअरची निवड करताना एखाद्या अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या भविष्यकाळात किती प्रमाणात संधी उपलब्ध आहे. किती प्रमाणात मागणी आहे याचे सर्वेक्षण करणे फायद्याचे ठरते. तसेच जरी तुम्ही स्वत:ला ओळखत असाल म्हणजेच स्वत:ची आवड, कुवत, क्षमता यांची तुम्हाला जाणीव असूनही जर तुम्ही द्विधा मन:स्थितीत असाल तर अशावेळी करिअर निवडताना एखाद्या व्यावसायिक करिअर कौन्सिलरची, सल्लागाराची किंवा तुमच्या शिक्षकाची/ प्राध्यापकाची मदत घेणे फायद्याचे ठरते. मात्र करिअर निवडताना काळजीपूर्वक व पुरेसे गांभीर्य लक्षात घेऊन निवड करणे केव्हाही चांगलेच हे लक्षात घ्या. कारण तुमची चुकीची निवड आयुष्यभर तुम्हाला पश्चात्ताप करायला लावू शकते.
तुमची आवड लक्षात घेऊन करिअर निवडताना खालील गोष्टीचा विचार करा. या गोष्टी तुम्हाला नक्कीच योग्य करिअर निवडायला मदत करतील. खालील क्षेत्रांचा विचार करा.
१) कलात्मक- जर तुम्हाला सर्जनशील कार्यामध्ये अभिरुची असेल तर या क्षेत्रातील करिअरचा विचार करू शकता.
२) शास्त्रीय- जर निसर्ग व निसर्गातील गूढ गोष्टी शोधून काढण्याची इच्छा असेल, तसेच मेडिसीन, जीवशास्त्र इ. संदर्भात संशोधनाची इच्छा असेल तर
३) संरक्षक- जर तुम्हाला जीव आणि मालमत्ता इ. गोष्टींचे संरक्षण या बाबतीत आवड असेल तर.
४) जर तुम्हाला यांत्रिक तत्त्वाचा अभ्यास करण्याची आवड असेल किंवा यंत्राची किंवा विविध यंत्र- साधने व तंत्र यांचा अभ्यास करण्याची इच्छा असेल तर.
५) औद्योगिक- जर तुम्हाला नियोजनपूर्ण कृती करून उद्योग वाढविण्यामध्ये जास्त आवड असेल तर.
६) व्यवसाय/धंदा- स्वत:चा व्यवसाय करण्याची आवड असेल तर.
७) विक्री- स्वत:चे विक्री कौशल्य वापरून नफ्यामध्ये वाढ घडवून आणण्याचं तंत्र आत्मसात केलेले असेल तर.
८) मानवतावादी- जर तुम्हाला दुसऱ्याच्या मानसिक, अध्यात्मिक, सामाजिक, शारीरिक किंवा व्यावसायिक गरजा ओळखून त्यांना मदत करण्याची इच्छा असेल तर.
९) परफॉर्मिग आर्ट्स- जर तुम्हाला प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची आवड असेल तर.
१०) नेतृत्व प्रभाव- जर तुमच्याकडे वक्तृत्व गुण असेल तर व गटामध्ये काम करण्याची आवड असेल तर.
११) वनस्पती आणि प्राणी- जर तुम्हाला वनस्पती व प्राणी या संदर्भातील कार्याची आवड असेल तर-
अशा विविध स्वरूपाच्या क्षेत्रांपैकी कोणत्या क्षेत्रात स्वत:ला आवड आहे हे ठरवून त्यापैकी स्वत:ला योग्य ते क्षेत्र निवडून आपण त्यामध्ये करिअर घडवू शकतो. आता आपण बारावीनंतर प्रामुख्याने कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत ते पाहूया.
* बारावी विज्ञान शाखेनंतरचे पर्याय-
जर विद्यार्थी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या गटाचा प्रामुख्याने विचार करत असेल तर सध्या पुढील पर्याय उपलब्ध आहेत.
अभियांत्रिकी- यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
(MHT- CET, AIEEE, IIT-JEE इ.) यामध्ये सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
आर्किटेक्चर- कल्पकता असणे आवश्यक, तसेच गणितावर प्रभुत्व असणेदेखील आवश्यक आहे.
आय.टी. (माहिती तंत्रज्ञान)- हा संगणकसंबंधित सॉफ्टवेअर कोर्स आहे. यासाठी बारावीला गणित असणं आवश्यक आहे.
एव्हिएशन- पायलट, केबिन क्रू, एअर होस्टेस इ. मध्ये करिअर करण्यासाठी या क्षेत्राचा विचार करता येईल.
मरिन इंजिनीअरिंग/नॉटिकल सायन्स- बारावीला फिजिक्स, मॅथ्स असलेले विद्यार्थी या करिअरचा विचार करू शकतात.
नेव्ही/एअरफोर्स- फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण विद्यार्थी याचा विचार करू शकतात.
तसेच सिरॅमिक टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी, ऑईल अ‍ॅण्ड पेंट टेक्नॉलॉजी, रबर टेक्नॉलॉजी, पल्प आणि पेपर टेक्नॉलॉजी यासारखे तंत्रज्ञानात्मक कोर्स उपलब्ध आहेत.
जर विद्यार्थी भौतिक, रसायन आणि बायोलॉजी या गटाचा असेल तर प्रामुख्याने पुढील क्षेत्रे उपलब्ध आहेत.
मेडिसिन- यासाठी प्रवेश परीक्षा आहे. एम.बी.बी.एस. डेण्टिस्ट्री, व्हेटर्नरी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी असे पर्याय उपलब्ध आहेत.
पॅरामेडिकल शाखा- फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अ‍ॅण्ड ऑडिओलॉजी, प्रोस्थेटिक व ऑर्थोटिक्स यांचा अभ्यास यामध्ये येतो.
बायोमेडिकल- बारावीनंतर या शाखेचादेखील विचार करता येतो. सध्या या शाखेला प्रचंड मागणी आहे.
फार्मसी- यासाठीदेखील प्रवेश परीक्षेनंतर प्रवेश घेता येतो.
मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी- डिप्लोमा कोर्स करता येऊ शकतो.
ऑप्टोमेट्री- डोळ तपासणी करण्यासाठी डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये वा क्लिनिकमध्ये यांना मागणी असते. स्वतंत्र व्यवसाय करू शकतात. हा डिग्री कोर्स बारावीनंतर करता येऊ शकतो.
टेक्निशियन कोर्स- डेन्टल टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, पॅथोलॉजिस्ट असे कोर्सेस उपलब्ध आहेत.
तसेच अ‍ॅग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर म्हणजेच शेतीविषयक झाडे, भाज्या, फळे, फुले, बाग इ. विषयक अभ्यासक्रमांचा अभ्यास बारावीनंतर बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चरमध्ये करता येतो. तसेच नर्सिग, डेअरी टेक्नॉलॉजी हेदेखील पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेतून बारावी पूर्ण केल्यानंतर इंडियन डिफेन्स सव्‍‌र्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा असणारा उमेदवार आर्मीमध्ये प्रवेश घेऊ शकतो. कॉमर्समधून बारावी झालेले विद्यार्थी बारावीनंतर बीकॉम, बीकॉम इन बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बॉकॉम इन अकाऊण्टस अ‍ॅण्ड फायनान्स, चार्टर्ड अकाऊंन्टन्सी, आयसीडब्ल्यूए, कंपनी सेक्रेटरी इ. कोर्सेस बीकॉमकरीत असतानाच करू शकतात.
काही कोर्सेस तर असे आहेत की आर्टस्, सायन्स, वा कॉमर्स इ. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी या कोर्सेस्ना प्रवेश घेऊ शकतो. यामध्ये मॅनेजमेंटमधील बीएमएस हा कोर्स, जर्नालिझममधील बीएमएम हा कोर्स हे कोर्स कोणत्याही शाखेचा विद्यार्थी करू शकतो. आता तर बिएमएम हा कोर्स मराठी माध्यमातूनदेखील करता येऊ शकणार आहे. ज्याच्यांकडे क्रिएटिव्हीटी आहे, चित्रकला आहे असे विद्यार्थी विविध क्षेत्रांतील जसे की, फॅशन, ज्वेलरी, टेक्स्टाइलमधील डिझायनिंग कोर्सला जाऊ शकतात. कमर्शियल आर्टस् परफॉर्मिग आर्टस् या क्षेत्रातही डिग्री कोर्स उपलब्ध आहे. समाजसेवेची आवड असलेल्यांसाठी बी.एस.डब्ल्यू हा कोर्स आहे. अ‍ॅनिमेशनमध्ये करिअर करता येऊ शकते. बारावीनंतर पाच वर्षांचा ‘लॉ’चा एकात्मिक अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. शिक्षकी पेशात जायची इच्छा असेल तर डी. एड्. करता येते. ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझममधील कोर्सेस करता येऊ शकतात. हॉटेल मॅनेजमेंटमधील किंवा रिटेल मॅनेजमेंटमधील कोर्सेस करता येतील. असे अनेक पर्याय आज बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसमोर उभे आहेत. असे आणि अशाच स्वरूपाचे अनेक कोर्सेस पदवीनंतरही उपलब्ध आहेत.
कोर्सेस, अभ्यासक्रम बरेच उपलब्ध आहेत, संध्याही उपलब्ध आहेत, आवश्यकता आहे ती आपल्याला नेमकं काय हवंय ते ओळखण्याची. ते ओळखा आणि तुम्हाला ते नक्कीच मिळेल. परंतु आता वेळ आहे ती, तुम्ही योग्य निर्णय घेण्याची. जे लोक कोणताही निर्णय अगदी त्वरित आणि ठामपणे घेतात त्यांना स्वत:ला काय हवंय हे निश्चितपणे ठाऊक असतं आणि म्हणूनच सहसा ते त्यांना मिळतं. कुठल्याही क्षेत्रातील आघाडीवरचे लोक त्वरित आणि ठामपणे निर्णय घेत असतात. ते आघाडीवर असण्याचं हे एक प्रमुख कारण असतं. जी व्यक्ती आपल्या शब्दाने आणि कर्तृत्वाने आपलं उद्दिष्ट ठाऊक असल्याचं दाखवून देते त्याला त्याचं स्थान देण्यासाठी मार्ग रिकामा ठेवणं ही जगाची सवयच आहे. बऱ्याचदा विद्यार्थी काहीही ध्येय न ठरवता प्रवाहाबरोबर वाहत जाऊन शिक्षण घेतात, शिक्षण संपताच जी मिळेल ती नोकरी स्वीकारतात. निर्णय घेण्याची क्षमता नसल्यामुळे त्या पहिल्याच नोकरीत अडकतात. सर्वेक्षणानंतर असे आढळून येते की, अठय़ाण्णव टक्के लोक जे पगारी नोकरीत असतात ते त्या जागीच अडकल्यासारखे राहतात. बऱ्याचदा अशा लोकांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला नसतो किंवा त्यावेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता नसते.
विद्यार्थी मित्रांनो, जरी आता सुट्टीचा कालावधी असला, तरी तो केवळ फिरण्यात, अनावश्यक गोष्टी करण्यात फुकट घालवू नका. तर भावी आयुष्य घडविण्याच्या दृष्टीने विविध उपलब्ध कोर्सेस्ची माहिती मिळवा, कुटुंबियांशी या विषयासंबंधी सुसंवाद साधा, स्वत:ला जाणून घ्या, विशिष्ट ध्येय ठरवा, जाणकारांकडून सल्ला घ्या, योग्य निर्णय घ्या. It is only when you DREAM, THINK and DETERMINE what exactly you want to do, You are on your way to Make it Big in life. All the Best!
सुहास कदम
संपर्क -९७०२४४२४६२ / suhaskadam11@yahoo.in