Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
क्रीडा

..हे गतवैभवाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल - संदीप सिंग
नवी दिल्ली, १४ एप्रिल/ पीटीआय

दर्जेदार कामगिरीमुळेच सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताला अजिक्यपद पटकाविता आले असून हा विजय भारतीय हॉकीचे गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असल्याचे मत या स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार पटकाविलेल्या संदीप सिंगने व्यक्त केले आहे. अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने यजमान मलेशियाचा ३-१ असा धुव्वा उडवित जेतेपद पटकाविले होते.

धोनी सवरेत्कृष्ट कर्णधार - लक्ष्मण
हैदराबाद, १४ एप्रिल / पीटीआय

शांत स्वभाव पण मैदानावर तितकाच आक्रमक, सहकाऱ्यांशी सहज संवाद साधण्याची हातोटी, जबरदस्त आत्मविश्वास, असे अनेक गुण असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आतापर्यंत पाहिलेल्या सर्व कर्णधारांमध्ये सवरेत्कृष्ट असल्याची भावना व्हि. व्हि. एस. लक्ष्मण याने व्यक्त केली आहे. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव चांगला आहे.

युवा क्रिकेटपटूंनी पेलले शिवधनुष्य - चंद्रकांत पंडित
विनायक दळवी
मुंबई, १४ एप्रिल

ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही संघाला हरविणे हे मोठेच आव्हान आहे. अशोक मनेरियाच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या १९ वर्षांखालील संघाने हे आव्हान आजपर्यंत जपले आहे. दोन एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला चारीमुंडय़ा चीत केल्यानंतर भारतीय संघाने होबार्ट येथील कसोटीही नऊ विकेटने जिंकली. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील या यशाचे रहस्य संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी आज ‘लोकसत्ता’कडे बोलताना सांगितले.

आयपीएल म्हणजे ट्वेन्टी-२० विश्वचषकाची रंगीत तालीम - गंभीर
नवी दिल्ली, १४ एप्रिल/ पीटीआय

दक्षिण आफ्रिकेत होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) ही ट्वेन्टी-२० विश्वचषकाची रंगीत तालीम असून येथील कामगिरीचा नक्कीच फायदा इंग्लंडमध्ये होईल, असे मत न्यूझीलंडचा दौरा गाजवून ‘भारताची दुसरी भिंत’ हा बहुमान पटकाविणाऱ्या सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. आयपीएलदरम्यान ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी सर्व क्रिकेटपटूंना असून त्याचा नक्कीच फायदा इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात होईल, असे गंभीरला वाटते.

‘पीटरसन - मूर्स वादाचा आयपीएलवर परिणाम नाही’
लंडन, १४ एप्रिल / पीटीआय

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार केवीन पीटरसन याचे संघाचे प्रशिक्षक पीटर मूर्स यांच्याशी असलेल्या मतभेदांचा आयपीएल स्पर्धेवर कसलाही परिणाम होणार नाही, असे रॉयल चॅलेंजर्स संघाचे प्रशिक्षक रे जेनिंग यांनी म्हटले आहे. पीटरसन व मूर्स यांचे मतभेद किती तीव्र आहेत हे आता क्रिकेट जगतापासून लपलेले नाही. मात्र त्यांच्यातील मतभेदांशी काहीही देणे घेणे नाही अशा स्पष्ट शब्दात जेनिंग यांनी उत्तर दिले. मात्र पीटरसनचा स्वभाव हा इतरांच्या चुका शोधण्याचा असल्याचे ते म्हणाले. कोणाचीही खोड काढायला त्याला आवडते. त्याचा हा स्वभाव आधीपासूनच असा आहे. मात्र तरी त्याच्या क्रिकेटमधील योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही असेही जेनिंग म्हणाले.

मी गावसकरांच्या विरोधात काहीही बोललो नव्हतो- शाहरूख
मुंबई, १४ एप्रिल/ क्री. प्र.

सुनिल गावसकर ट्वेन्टी क्रिकेट खेळले नसल्याने त्यांना माझ्या संघाच्या धोरणांच्या विरोधात बोलू नये. त्यांनी आयपीएलमधील एक संघ विकत घेऊन त्याच्यावर त्यांच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, अशी काही दिवसांपूर्वी गावसकरांवर टीका करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलीवूडचा ‘किंग’ असलेल्या शाहरूख खानने नमते घेत गावसकरांची लेखी माफी मागितली आहे. मी गावसकरांच्या विरोधात काहीही बोललेलो नव्हतो. बुकॅनन यांनी मांडलेल्या संकल्पनेला थोडासा वेळ द्यायला हवा, असे मी म्हटले होते. माझ्या बोलण्याने जर गावसकर दुखावलेले असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. पण मी मांडलेला मुद्दा गैर नसून असे प्रयोग क्रिकेटमध्ये व्हायलाच हवेत, असे शाहरूखने दक्षिण आफ्रिकेला रवाना होताना सांगितले.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार १६ एप्रिलला ठरणार
एकापेक्षा अधिक कर्णधारांचा वाद रंगत असला तरी यावर योग्य तोडगा लवकरच निघण्याचे चिन्ह असून येत्या १६ तारखेला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार ठरविण्यात येणार आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला १८ एप्रिलपासून सुरुवात होणार असून त्याच्या दोन दिवसापूर्वी संघाच्या कर्णधाराची निवड करण्यात येईल असे संघमालक शाहरूख खानने आज स्पष्ट केले.
संघाच्या कर्णधाराच्या धोरणांबद्दल अजुन कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा निर्णय अंमलात आणायचा की नाही याबद्दल दक्षिण आफ्रिकेतच विचार केला जाईल. स्पर्धेच्या दोन दिवसांपूर्वी प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांच्याशी चर्चा करून संघाचा कर्णधार घोषित करण्यात येईल. असे शाहरूखने दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी सांगितले.

बहुकर्णधार संकल्पनेला पाठींबा दिला नव्हता- इशान्त शर्मा
नवी दिल्ली, १४ एप्रिल/पीटीआय

बुकॅनन यांच्या बहुकर्णधार संकल्पनेला पाठिंबा दिलेल्या वृत्ताचे आज वेगवान गोलंदाज इशान्त शर्माने खंडन केले आहे. बहुकर्णधार संकल्पनेला मी कधीही पाठींबा दिला नव्हता. कोणत्याही एका संघाचे चार कर्णधार कसे काय असू शकतात. एका संघाचा एकच कर्णधार असायला हवा, असे इशान्तने सांगितले आहे. तो पुढे म्हणाला की, मला संघाच्या रणनितीबद्दल काहीही माहीत नाही, दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतरच मला संघाच्या रणनितीची माहिती मिळेल.

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात शरथ व शामिनी
नवी दिल्ली, १४ एप्रिल/पीटीआय
योकोहामा येथे होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात ऑलिम्पिक खेळाडू अचंता शरथ व राष्ट्रीय विजेती कुमारसेने शामिनी यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा २८ एप्रिलला सुरू होणार आहे. दहा जणांच्या भारतीय संघात समावेश असलेला राष्ट्रीय विजेता सुभजित सहा, पौलमी घातक व मौमा दास हे सध्या जपानमध्ये २५ दिवसांच्या सराव शिबिरात सहभागी झाले आहेत, तर शरथ सध्या स्पॅनिश लीग स्पर्धेत व्यस्त आहे. तो २० एप्रिलला जपानला रवाना होणार आहे. या स्पर्धेत भारताला विजेतेपदाची आशा आहे. पुरुष दुहेरी गटात शरथ व शुभजित जोडीचे पारडे जड मानले जात आहे. महिला दुहेरी गटात पौलमी व मौमा सर्वोत्तम जोडी म्हणून ओळखली जाते.

अनेक कर्णधारांच्या योजनेचे मुंबई इंडियन्सला देणेघेणे नाही - सचिन
नॉयडा, १४ एप्रिल / पीटीआय

कोलकाता नाइट रायडर्सच्या जॉन बुकॅनन यांनी संघात अनेक कर्णधारांची संकल्पना राबविली असली तरी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिनला त्याच्याशी देणेघेणे नाही, आपल्या संघातही तो अशी संकल्पना राबविण्याच्या विचारात नाही. सचिनने सांगितले की, ‘त्यांना काय करायचे आहे ते करू द्या. मुंबई इंडियन्स संघात मला जे करायचे आहे ते मी करीन.’बुकॅनन यांच्या या संकल्पनेत सचिनला नवे काही दिसत नाही. तो म्हणतो, कोणत्याही संघात सीनियर खेळाडू नेहमीच महत्त्वाच्या सूचना करीत असतात. त्यामुळे ही संकल्पना म्हणजे अनेक कर्णधारांची नव्हे तर अनेक डावपेचांची आहे. संघाचा कर्णधार हाच सर्व निर्णय एकटय़ाने घेत नाही. इतर खेळाडूही त्याला सुचवित असतात. त्यामुळे कर्णधारापाशी अनेक पर्याय उपलब्ध असतात.

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात शरथ व शामिनी
नवी दिल्ली, १४ एप्रिल/पीटीआय

योकोहामा येथे होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात ऑलिम्पिक खेळाडू अचंता शरथ व राष्ट्रीय विजेती कुमारसेने शामिनी यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा २८ एप्रिलला सुरू होणार आहे. दहा जणांच्या भारतीय संघात समावेश असलेला राष्ट्रीय विजेता सुभजित सहा, पौलमी घातक व मौमा दास हे सध्या जपानमध्ये २५ दिवसांच्या सराव शिबिरात सहभागी झाले आहेत, तर शरथ सध्या स्पॅनिश लीग स्पर्धेत व्यस्त आहे. तो २० एप्रिलला जपानला रवाना होणार आहे. या स्पर्धेत भारताला विजेतेपदाची आशा आहे. पुरुष दुहेरी गटात शरथ व शुभजित जोडीचे पारडे जड मानले जात आहे. महिला दुहेरी गटात पौलमी व मौमा सर्वोत्तम जोडी म्हणून ओळखली जाते.

प्रबोधन क्रीडा प्रशिक्षण शिबीरे सुरू
मुंबई, १४ एप्रिल / क्री. प्र.
प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या १९ व्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आज शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू लोकेश मेंडन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या शिबिरात क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स योग, बुद्धिबळ, टेबल टेनिस, जलतरण कराटे या खेळांच्या प्रशिक्षणाबरोबरच चित्रकलेचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.