Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

परांजपे यांचे स्वप्न साकार करणार..
ठाण्याचे खासदार म्हणून मागील १० महिन्यांमध्ये आनंद परांजपे यांनी दाखविलेले कर्तृत्व हे ठाणेकरांनाच नव्हे, तर नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदरमधील जनतेलाही ठाऊक आहे. या मतदारसंघात मोडत असलेल्या तीनही शहरांमधील जनतेसाठी रेल्वे म्हणजे ‘लाइफ लाइन’च म्हणावी लागेल. ही ‘लाइफ लाइन’ अधिक सक्षम करण्यासाठी परांजपे यांनी उण्यापुऱ्या १० महिन्यांत जीवाचे अक्षरश: रान केले. आपणही या शहरांमधील रेल्वे सेवेच्या सक्षमीकरणासाठी दिवस-रात्र एक करू. ठाणे रेल्वे स्थानकाला ‘हेरिटेज’ तसेच ‘टर्मिनस’चा दर्जा मिळावा, यासाठीदिवंगत प्रकाश परांजपे आयुष्यभर

 

झटले. त्यांचे स्वप्न साकार करणे हे माझे पहिले ध्येय राहील. ठाणे- वाशी- नेरुळ- पनवेल मार्गावरील फेऱ्या वाढविणे, ठाणे-सीएसटी, ठाणे- कर्जत- कसारा या मार्गावर गाडय़ा वाढवाव्यात, यासाठी मी घाम गाळीन. मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांच्या विशेषत: गुजरातकडे जाणाऱ्या गाडय़ा थांबाव्यात, हा माझा प्रयत्न राहील. पनवेल-सीएसटी मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा सुरू करण्याचा प्रस्ताव परांजपे यांनी सर्वप्रथम मांडला. हा प्रस्ताव मार्गी लागावा, यासाठी मी आग्रही असेन.
नवी मुंबईत सिडको संचालक म्हणून मी नऊ वर्षे काम केले आहे. अतिशय उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा मला अनुभव आहे. मी स्वत: प्रकल्पग्रस्त समाजातील नाही, परंतु या समाजाचे प्रश्न मला ठाऊक आहेत. आगरी-कोळी समाजाने माझ्यावर प्रेम केले, मला एकेकाळी ऐरोली गावात विसावा दिला. काही नेत्यांना निवडणुका जवळ आल्या की, ‘गाववाले’ आठवतात. माझे तसे नाही. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे आजही नियमित करताना शासन का-कू करते. जेएन-१ सारख्या निकृष्ट इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी सरकार वाढीव ‘एफएसआय’ देताना नाकं मुरडते. लोकांमध्ये मिसळून काम करायचा माझा छंद आहे. तुम्ही मला थेट दूरध्वनी करू शकता, मला भेटू शकता. मी लोकांमधला कार्यकर्ता आहे. माझी ‘अपॉइंटमेंट’ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्या मामा-भाच्याकडे जोडे झिजवावे लागत नाहीत. आवाज द्या विजय हजर असतो. आम्हीच खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक असा माझा स्वभाव नाही. एकाच घरात सगळी सत्ता. मग यांच्यासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे लावायचे आणि खुच्र्या उचलायच्या. मला ते गणित बदलायचे आहे.
आज ठाणे-बेलापूर पट्टी असो वा वागळेचा पट्टा, हे कामगारमंत्री असताना कंपन्या एका मागोमाग एक बंद पडल्या. प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या गेल्या. नोसिल, पील बंद पडत होती, तेव्हा ‘गाववाले’ आठवले नाहीत यांना. ही सगळी कारखानदारी मला पुन्हा उभी करायची आहे. बेकारांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. ठाणे, मीरा-भाईंदरमध्ये पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या शहरांत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आणायची आहे. आज शाळा प्रवेशाची समस्या ‘आ’वासून उभी असताना ठाणे, ओवळा-माजिवडा, मीरा-भाईंदर, ऐरोली या पट्टय़ात केंद्रीय शाळा सुरू करण्याचा माझा बेत आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार एकनाथ शिंदे यांनी उड्डाणपूल, तसेच सब-वेचे काही प्रकल्प मांडले आहेत. केंद्राचा निधी मला यासाठी मिळवून द्यायचा आहे. मी गुन्हेगार असल्याचा माझ्यावर आरोप होत आहे. पाणी, रस्ते यासारख्या प्रश्नांवर आंदोलन केल्याचे माझ्यावर चार गुन्हे आहेत. नवी मुंबईतील एकाधिकारशाही विरोधात मी संघर्ष उभा केला. माझ्या शिवसैनिकांच्या मदतीने या ‘दादागिरी’विरोधात एकटा लढतो आहे. यांच्या विरोधात साधा ‘ब्र’ काढण्याची कुणाची हिंमत नव्हती. ‘हम करें सो कायदा’, असा सगळा कारभार होता. या विरोधात मी उभा राहिलो, लढतोय, जनता मला साथ देईल, हा विश्वास आहे.
मनसेच्या नैतिक धाकासाठी..
मी कामगार नेता. राजकारणाचा कधी विचारच केला नव्हता. केवळ कामगारांच्या भल्याचा ध्यास घेऊन कंत्राटीकरणाविरोधात आंदोलन छेडत राहिलो. मराठी माणसाला देशोधडीला लागण्यास कारणीभूत ठरले आहे ते कंत्राटीकरण. त्याच्या विरोधात आंदोलन छेडून मराठी कामगाराला न्याय देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांपासून उद्धव ठाकरे आदी राजकीय नेतृत्वाला भेटून ठोस उपाययोजनांबाबत आखण्याच्या विनंत्या केल्या. विविध कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरीत कामगारांची पगारवाढ आणि त्यांना कायम आणि उत्तम सोई देण्यात यशस्वी ठरलो, मात्र कंत्राटीकरण रोखण्यास अपयश आले. तेंव्हा लक्षात आलं की मराठी माणसाचे हित जपण्यासाठी राजकीय बैठकीची गरज आहे. त्यातून नव्या पक्षाचा बाळबोध विचार मनात घोळू लागला. त्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मराठी माणसाला जागृत करण्याची चळवळ उभी केली. मराठी माणसाच्या हक्काबाबतची तळमळ पाहून त्यांची भेट घेतली आणि दुसऱ्या भेटीत त्यांच्या आदेशावरून ठाणे लोकसभेची निवडणूक लढविण्यास सज्ज झालो.
मी भगवद्गीता नुसती वाचली नाही तर ती जगलो आहे. पत्नीच्या पगारावर घर चालवून माझा पगार समाजसेवेसाठी खर्च करीत असतो. ठाण्यात जन्मलो आहे. उमेदवारीनंतर भाईंदर, ऐरोलीमध्ये जनतेने केलेले स्वागत हे अनोखे वाटले. बेलापूर वगळता सर्व मतदारसंघ माहीत आहे. एल.एल.बी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, पाइप खरेदी भ्रष्टाचार, अर्धवट असलेले विटावा, कोपरीचे रेल्वे ब्रीज आदी रोजच्या नागरी समस्या जगतोय. या सर्व समस्यांचे मूळ आहे ते कंत्राटीकरणामध्ये. कंत्राटीकरण ही समस्या सर्वव्यापी आहे. यात अर्थकारण असल्याने कोणी हात घालत नाही. शिक्षण, आयटी, उद्योग, महापालिकापर्यंत कंत्राटीकरण झाले आहे. ठाणे, बेलापूर औद्योगिकपट्टय़ातील शेकडो कारखाने बंद होऊन मराठी माणूस भिकेला लागला आहे. कामगार नेते दत्ता सामंत यांच्याकडून कामगार चळवळीचे धडे घेतल्यानंतर स्वतंत्र युनियन स्थापून कामगारांच्या हक्कासाठी अनेक लढे लढलो आणि कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या समस्येपेक्षा परप्रांतियांच्या लोढय़ांमुळे महाराष्ट्राचे अस्तित्व जपणे ही मोठी समस्या आहे. जागतिक महामंदी लवकर थांबणार नसून आता खासगी नोकऱ्या असुरक्षित आहेत. वास्तविक, अध्यात्मापासून फारकत घेतल्यापासून राजकारण विधिनिषेधशून्य झाल्याने मनसेच्या माध्यमातून नैतिकतेचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न राहील.
युवाशक्तीमार्फत परिवर्तन घडविण्यासाठी..
अवघ्या २३ व्या वर्षी महापौर बनलो आणि नवी मुंबई महापालिकेचा पाण्याचा प्रश्न निकालात काढला. राष्ट्रवादीतील वजनदार मंत्री गणेश नाईक यांच्याकडून राजकारणाचा वारसा लाभला असला तरी विद्यार्थीदशेपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. नवी मुंबई महापालिकेत तीनदा निवडून आलो असून सहा वर्षे महापौर म्हणून काम केले आहे. मनपा, राज्यस्तरावर काम केल्यानंतर देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन युवा शक्तीच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात दुसऱ्यांदा उडी घेतली आहे.
अखिल भारतीय महापौर परिषदेचा उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र महापौर परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केले. बेलापूर आणि ठाणे या पूर्वीच्या दोन विधानसभांचे मिळून नवीन ठाणे लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाल्याने हा मतदारसंघ पूर्ण माहीत आहे. त्यातून कळवा-मुंब्रा हा भाग वगळण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी लोकसभेची पोटनिवडणूक लढविली होती. ४० टक्के झोपडपट्टीतील मतदार असलेल्या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाइंदर या तीन महापालिकांच्या सीमा आणि ठाण्यातील ८३, मीरा-भाईदर ७९ आणि ८८ नवी मुंबईतील वॉर्ड असा मतदारसंघाचा विस्तार आहे. जुना असलेला हा मतदारसंघ पोटनिवडणूक हरल्यानंतर पिंजून काढला आहे.
मुळात ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाइंदर या शहरांच्या समस्या स्वतंत्र आहेत. त्यांची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. ठाण्यात डंपिंग ग्राऊंड, पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, सीआरझेड, अनाधिकृत बांधकामे आणि रेल्वे पूल या प्रमुख समस्या आहेत. खाडी किनारा लाभलेल्या शहरांची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी जलवाहतूक उपयुक्त ठरेल. घोडबंदर रोड परिसरातील वाढता विकास, लोकसंख्या आणि तेथील नागरिकांना जुन्या ठाण्यात लवकर येण्यासाठी मोनो, मेट्रो रेल्वे सुरू करण्यावर भर दिला पाहिजे. महापालिकेतील आरक्षित भूखंडावर सेवा प्रकल्प सुरू करण्याची गरज असून अनधिकृत बांधकामांना नियमित करून धोकादायक इमारतींना वाढीव चटईक्षेत्र देऊन विकसित करण्यावर भर दिला जाईल. तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरात स्टेडियम, नाटय़गृह, मैदानांची आवश्यकता आहे. ठाण्यात बिकट बनलेला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शाई धरणाच्या निर्मितीचे काम आघाडी सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्याबरोबर मीरा-भायंदरचाही प्रश्न निकालात निघेल.
मीरा-भायंदर हा कमी वेळात अधिक वेगाने वाढलेला परिसर आहे. वाढीव चटईक्षेत्राची गरज आहे. त्यांचा खारभूमीचा मुख्य प्रश्न असून हे प्रकरण केंद्राकडे प्रलंबित आहे. तो प्राधान्याने मार्गी लावला जाईल.
नवी मुंबईत पाणीपुरवठय़ाप्रमाणे २४ तास घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. औद्योगिक पट्टा असलेल्या या शहराला भेडसावणारे लोड शेडिंग बंद करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून काम केले जाईल. सिडकोने खासगीकरणातून जेटी उभारून जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धारावीच्या धर्तीवर एमआयडीसी आणि महसूल जमिनीवर उभ्या असलेल्या मतदारसंघातील झोपडपट्टय़ांचा विकास केला जाईल.