Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

२४x७ सुरक्षेत फेरीवालेच सुरक्षित!
ठाणे/प्रतिनिधी- स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी महिन्याला लाखो रुपये खर्चून पालिकेने खासगी सुरक्षारक्षक नेमले असले, तरी ही योजना नागरिकांपेक्षा फेरीवाल्यांनाच मदतगार

 

ठरत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पालिकेने सॅटिस प्रकल्प हाती घेतला असून, सध्या त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सॅटिसच्या कामामुळे लोकांना या भागातून जाणे मुश्किल होत असतानाच तेथील फेरीवाल्यांच्या उच्छादाने ठाणेकर हैराण झाले आहेत. मुळातच रस्त्यावर पडलेल्या बांधकाम साहित्यातून कसाबसा मार्ग लोक काढीत असताना मनमानीपणे इतस्तत: उभ्या राहणाऱ्या रिक्षा, लोकांच्या वाटेतच ठाण मांडून बसलेले फेरीवाले यामुळे सकाळ-संध्याकाळ स्टेशन परिसरातून मार्ग काढणे जिकिरीचे होत आहे. या फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने खासगी सुरक्षारक्षक तैनात केले, मात्र हे सुरक्षारक्षक म्हणजे ठेकेदारांचे पोट भरण्यासाठीची सोय, अशीच चर्चा होऊ लागली आहे. सुमारे २५ सुरक्षारक्षक स्टेशन परिसरात तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या वेतनापोटी महिन्याला लाखभर रुपये खर्च होतात. गेली सुमारे दोन वर्षे हा प्रकल्प सुरू आहे. म्हणजेच फेरीवाले हटविण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही त्या परिसरातील एकही फेरीवाला हटविण्यात पालिकेला यश आलेले नाही. उलट या फेरीवाल्यांचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून, आता तर तलावपाळी आणि गोखले रोडही त्यांनी व्यापला आहे. परिणामी सकाळ-संध्याकाळी स्टेशन परिसरात जाणे नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वी स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्यासाठी भाजपने उपोषणाचे नाटय़ केल्यानंतर पालिका आणि रेल्वे पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करीत फेरीवाल्यांना हटविले, मात्र आता रेल्वे पोलिसांबरोबरच पालिकेने नेमलेले खासगी सुरक्षारक्षकही लोकांपेक्षा फेरीवाल्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष असल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अधूनमधून कारवाई केली जाते. मात्र याची खबर अतिक्रमण विभागातील कर्मचारी सुरक्षारक्षकांना आणि सुरक्षारक्षक फेरीवाल्यांना पोहोचवतात. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षक हे ठाणेकरांच्या नव्हे, तर फेरीवाल्यांच्याच रक्षणासाठी असावेत, असा आरोप ठाणेकर करीत आहेत.