Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जिल्ह्यातील जनतेच्या पिछेहाटीचा उद्रेक होईल - विश्वनाथ पाटील
ठाणे/प्रतिनिधी

सर्वच पक्ष आणि नेत्यांनी कागदावरच विकासाचे चित्र रंगवत जिल्ह्यातील जनतेची सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात पिछेहाट केली आहे. त्याचा उद्रेक या लोकसभा निवडणुकीत होईल आणि आपण निवडून येऊ, असा दावा बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी येथे

 

केला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या पाटील यांनी आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली ग्रामविकासाची संकल्पना राबविणे, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव व शेतीवर आधारित उद्योगधंद्यांच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करणे, जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र कोकण राज्याच्या निर्मितीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन पाटील यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. त्याचप्रमाणे डहाणू- विक्रमगड- वाडा- भिवंडी- दिवा रेल्वे मार्गाचा पाठपुरावा, कुणबी विकास महामंडळाची स्थापना करणे, भिवंडीतील टोरॅन्ट वीज कंपनीच्या मनमानी कारभाराला लगाम घालून वीज ग्राहकांना न्याय देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
भाजपने आपल्याला उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र कार्यकर्ते आणि बहुजन समाजाच्या आग्रहाखातर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आगरी सेना व शिवसेनेची आपल्याला साथ मिळेल तसेच वसई विकास आघाडी आणि सीपीएमचाही पाठिंबा मिळविण्याबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. कुणबी समाजाचे आध्यात्मिक गुरू महंत काशिनाथ महाराज यांनी केलेल्या आरोपाबद्दल बोलताना पाटील म्हणाले, त्यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकारणातून निवृत्ती स्वीकारू. मात्र आरोप सिद्ध न झाल्यास निवडणुकीनंतर त्यांच्या घरावर मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.