Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लेखा परीक्षणानंतरच नाल्यांच्या कामांची बिले देणार
कल्याण/प्रतिनिधी -
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत जवाहरलाल नेहरू नागरी अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचे त्रयस्थ कमिटीतर्फे तांत्रिक लेखापरीक्षण करायचे. या कमिटीच्या अहवालावर विचारविनिमय करून या कामांच्या ठेकेदारांची बिले द्यायची किंवा कसे, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ठेकेदारांची बिले मिळण्याची शक्यता कमी वाटत असल्याने

 

त्यांचा हिरमोड झाला आहे.
जवाहरलाल नेहरू अभियानांतर्गत शहरात नाल्यांची कामे सुरू आहेत. बहुतांशी नाल्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा अहवाल पालिकेच्या दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक बैले यांनी तयार केला आहे. या अहवालावर स्थायी समितीत बुधवारी चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांमध्ये असलेले वाद कसे विकासकामांचे नुकसान करतात, अधिकाऱ्यांमध्ये कसे वाद आहेत, याचे दर्शन समिती सदस्यांना झाले. बैले यांनी दिलेल्या अहवालात कामाचा तपशील दिला नाही. हा तपशिल मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता कोलते यांच्याकडून मिळाला नसल्याचे बैले यांनी सांगितले. तर ही माहिती आपल्याकडे बैले यांनी मागितली नसल्याचे कोलते यांनी सांगितले. या आरोप-प्रत्यारोपांनी अधिकारी वर्ग हाच विकासकामांमधील अडसर असल्याचे स्थायी समितीचे स्पष्ट मत झाले.
अधिकाऱ्यांना फैलावर घेत सभापती वामन म्हात्रे म्हणाले, जवाहरलाल अभियानाचा पैसा हा एकदाच मिळणार आहे. ही कामे पहिल्याच पावसात वाहून गेली तर पुन्हा ही कामे करण्यासाठी पैसा मिळणार नाही.
यासाठी कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ज्या ठेकेदाराचे चांगले काम असेल, त्याचा सन्मान करू व त्याला ताबडतोब त्याचे बिलही मंजूर करून देऊ. पण केवळ आपला वाटा काढण्यासाठी ठेकेदारांना बिल करण्याची घाई प्रशासन करत असेल, तर ते मान्य केले जाणार नाही. ठेकेदारांची सुमारे तीन कोटींची बिले देण्यासाठी अधिकारी आतूर का झाले आहेत, असा प्रश्न करून सभापतींनी प्रथम कामे चांगली करा, मग बिलांचे पैसे मागण्यासाठी समितीत या, असे ठणकावले.
नाल्यांच्या कामांचे त्रयस्थ कमिटीतर्फे लेखापरीक्षण अहवाल तयार करण्यात येऊन मग बिल मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.