Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मंदीच्या लाटेतही डोंबिवली नागरी सहकारी बँक प्रगतीच्या लाटेवर
डोंबिवली / प्रतिनिधी

सर्वत्र मंदीची लाट असूनही डोंबिवली नागरी सहकारी बँकेने सर्व ग्राहक सेवा, गुंतवणूक, कर्ज व्यवहार, ठेवींमध्ये आघाडी घेतली आहे. येत्या वर्षभरात डोंबिवली नागरी बँक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली असेल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. उदय कर्वे यांनी येथे पत्रकार

 

परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्षा नंदिनी कुलकर्णी, सरव्यवस्थापक सुहास करंदीकर, सहमहाव्यवस्थापक गोपाळ परांजपे व इतर विश्वस्त उपस्थित होते. कर्वे म्हणाले, या वर्षांअखेरीस बँकेच्या ठेवी १२६८ कोटी, कर्जव्यवहार ७९७ कोटी, गुंतवणूक ५३८ कोटी,
भागभांडवल ३५ टक्क्यांनी वाढून ४२ कोटीपर्यंत पोहचले आहे. २१ टक्क्यांपासून ते ४३ टक्क्यांपर्यंत बँकेच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. बँकेचा ढोबळ नफा ३६ कोटी झाला आहे. प्रति कर्मचारी व्यवसायामध्ये चार कोटी ७४ लाखाची वाढ झाली आहे. आठ जिल्ह्य़ांमध्ये बँकेच्या ३० शाखा झाल्या आहेत. येत्या दोन महिन्यात नागपूर, सातारा, जळगाव, खोपोली येथे शाखा सुरू करण्यात येणार आहेत. पुढील वर्षांपर्यंत बँकेच्या अलिबाग, सिन्नर, चिपळूण, अंधेरी, घाटकोपर, कर्जत, कल्याण येथे शाखांचा विस्तार करण्यात येणार आहे.
तत्पर ग्राहक सेवेसाठी बँकेच्या ग्राहकाला तेजस एटीएम कार्डद्वारे देशातील कोणत्याही बँकेतून पैसे काढणे शक्य होणार आहे. एसएमएस, ऑन लाईन बँकिंग सेवा सुरू करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. नेहरू मैदान, शास्त्रीनगर, बदलापूर येथील बँका सोमवारी व दादर येथील शाखा सातही दिवस सुरू राहणार आहे. लहान मुलांसाठी मायनर खात्याची सुविधा केली आहे. विविध प्रकारचे कर भरण्यासाठी नेट बँकिंगची सोय बँकेत आहे. विमा, फंड्सच्या सुविधा बँकेत उपलब्ध आहेत.
शहापूर तालुक्यातील गरजूंना रोजगारासाठी २५ लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्यातील ३६ जवानांच्या कुटुंबियांकडे १८ लाखाचा निधी सुपूर्द केला. सामाजिक सेवा करणाऱ्या संस्थांना दहा लाखाचा निधी वाटप केला.
ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर डॉ. सलिल कुलकर्णी यांच्या लोकप्रियतेचा लाभ बँकेला झाला. चार बँकांनी बँकेत विलिनीकरणाचे प्रस्ताव दिले आहेत. त्याबाबत विचार सुरू आहे, असे उदय कर्वे यांनी सांगितले.