Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नवीन वैद्यकीय पदवीधरांचा डोंबिवलीत सत्कार
डोंबिवली / प्रतिनिधी

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शहरातील नवोदित २९ वैद्यकीय पदवीधरांचा नुकताच सत्कार करण्यात आला. डोंबिवली जिमखाना येथे शहरातील विविध वैद्यकीय संघटनांतर्फे आयोजित या

 

कार्यक्रमाला हिंदुजा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर. ए. भालेराव, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. मकरंद गणपुले, संयोजक डॉ. सुनील पुणतांबेकर, आयुर्वेद व्यासपीठचे विजयकुमार पोंक्षे, होमिओपॅथी असोसिएशनचे डॉ. राहुल घटवाल, अमर कात्रे, लक्ष्मीकांत बढे उपस्थित होते.
गेले १९ वर्षांपासून हा कार्यक्रम करण्यात येत आहे. नवीन वैद्यकीय पदवीधरांचे स्वागत व दिशा देणे हा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे प्रास्ताविकात कात्रे यांनी सांगितले.
डॉ. भालेराव यांनी रुग्णालयांचे सुरक्षितता आणि आपण या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. ते म्हणाले, अखंड सावधान या भूमिकेत प्रत्येक डॉक्टरने असले पाहिजे. यापूर्वी आपल्या दारावर रुग्णच येईल, असे आपणास वाटत असे, पण आता दहशतवादीही कोणत्याही क्षणी धडकतील हे मुंबईतील दहशतवादी हल्ल्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे रुग्णालये चालविताना कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखविता कामा नये. आपण एकदा रुग्णालयाचे प्रमुख झालो की तेथील सफाई कर्मचारी, रुग्ण ते डॉक्टपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या आपल्यावर येतात याचे भान डॉक्टरने ठेवणे आवश्यक आहे. रुग्णालयातील औषधे, शस्त्रक्रिया खोली, औषध, साहित्याची विल्हेवाट, रुग्णाला देण्यात येणारी सुविधा याविषयी सदैव तत्पर असले पाहिजे. रुग्णाची कागदपत्रे काळजीपूर्वक ठेवली आहेत की नाहीत, एखाद्या रुग्णाकडून कधीकाळी
आरोप झाला तर त्याला कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याची तयारी प्रत्येक डॉक्टरने ठेवली पाहिजे, अशा सर्व जबाबदाऱ्या डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या तर कोणत्याही धोक्याची शक्यता नसते.