Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

पैचान कौन? हे तर ठाणेकरांचे भावी खासदार ! अर्थात मतदारांनी निवडून दिले तर.. ठाणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभा राहिलेल्या मंगेश खाडे ऊर्फ मनीषा (३०) या तृतीयपंथीयाच्या प्रचारफेरीला महिलावर्गाचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीसाठी भरावी लागणारी दहा हजार रुपयांची अनामत रक्कमही मतदारांनीच स्वत: भरली. राजकारणात चांगला प्रकाश पडावा, यासाठी मनीषाने निवडणूक चिन्हदेखील ‘टॉर्च’ निवडले आहे.

परांजपे यांचे स्वप्न साकार करणार..
ठाण्याचे खासदार म्हणून मागील १० महिन्यांमध्ये आनंद परांजपे यांनी दाखविलेले कर्तृत्व हे ठाणेकरांनाच नव्हे, तर नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदरमधील जनतेलाही ठाऊक आहे. या मतदारसंघात मोडत असलेल्या तीनही शहरांमधील जनतेसाठी रेल्वे म्हणजे ‘लाइफ लाइन’च म्हणावी लागेल. ही ‘लाइफ लाइन’ अधिक सक्षम करण्यासाठी परांजपे यांनी उण्यापुऱ्या १० महिन्यांत जीवाचे अक्षरश: रान केले. आपणही या शहरांमधील रेल्वे सेवेच्या सक्षमीकरणासाठी दिवस-रात्र एक करू. ठाणे रेल्वे स्थानकाला ‘हेरिटेज’ तसेच ‘टर्मिनस’चा दर्जा मिळावा, यासाठीदिवंगत प्रकाश परांजपे आयुष्यभर झटले. त्यांचे स्वप्न साकार करणे हे माझे पहिले ध्येय राहील.

२४x७ सुरक्षेत फेरीवालेच सुरक्षित!
ठाणे/प्रतिनिधी-
स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी महिन्याला लाखो रुपये खर्चून पालिकेने खासगी सुरक्षारक्षक नेमले असले, तरी ही योजना नागरिकांपेक्षा फेरीवाल्यांनाच मदतगार ठरत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पालिकेने सॅटिस प्रकल्प हाती घेतला असून, सध्या त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सॅटिसच्या कामामुळे लोकांना या भागातून जाणे मुश्किल होत असतानाच तेथील फेरीवाल्यांच्या उच्छादाने ठाणेकर हैराण झाले आहेत.

जिल्ह्यातील जनतेच्या पिछेहाटीचा उद्रेक होईल - विश्वनाथ पाटील
ठाणे/प्रतिनिधी

सर्वच पक्ष आणि नेत्यांनी कागदावरच विकासाचे चित्र रंगवत जिल्ह्यातील जनतेची सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात पिछेहाट केली आहे. त्याचा उद्रेक या लोकसभा निवडणुकीत होईल आणि आपण निवडून येऊ, असा दावा बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी येथे केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या पाटील यांनी आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

लेखा परीक्षणानंतरच नाल्यांच्या कामांची बिले देणार
कल्याण/प्रतिनिधी -
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत जवाहरलाल नेहरू नागरी अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचे त्रयस्थ कमिटीतर्फे तांत्रिक लेखापरीक्षण करायचे. या कमिटीच्या अहवालावर विचारविनिमय करून या कामांच्या ठेकेदारांची बिले द्यायची किंवा कसे, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा ठराव स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ठेकेदारांची बिले मिळण्याची शक्यता कमी वाटत असल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

आदिवासी जोडप्यांचे सामुदायिक विवाह
डोंबिवली / प्रतिनिधी

शबरी सेवा समितीतर्फे जव्हार तालुक्यातील जंगलपाडा येथे २५ आदिवासी वधू-वरांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. आदिवासींमध्ये जनजागृती करण्यासाठी गेली अनेक वर्षे समितीतर्फे हे काम आदिवासी भागात केले जाते. या विवाह सोहळ्यासाठी ‘श्वास’च्या लेखिका माधवी घारपुरे, समितीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद करंदीकर, रंजना करंदीकर, डॉ. त्र्यंबक मावळंकर, डॉ. फडके, दीपक नेवासकर, डॉ. त्रिंबक जोशी, बुधाजी गोंड उपस्थित होते.

मंदीच्या लाटेतही डोंबिवली नागरी सहकारी बँक प्रगतीच्या लाटेवर
डोंबिवली / प्रतिनिधी

सर्वत्र मंदीची लाट असूनही डोंबिवली नागरी सहकारी बँकेने सर्व ग्राहक सेवा, गुंतवणूक, कर्ज व्यवहार, ठेवींमध्ये आघाडी घेतली आहे. येत्या वर्षभरात डोंबिवली नागरी बँक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली असेल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. उदय कर्वे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्षा नंदिनी कुलकर्णी, सरव्यवस्थापक सुहास करंदीकर, सहमहाव्यवस्थापक गोपाळ परांजपे व इतर विश्वस्त उपस्थित होते. कर्वे म्हणाले, या वर्षांअखेरीस बँकेच्या ठेवी १२६८ कोटी, कर्जव्यवहार ७९७ कोटी, गुंतवणूक ५३८ कोटी, भागभांडवल ३५ टक्क्यांनी वाढून ४२ कोटीपर्यंत पोहचले आहे. २१ टक्क्यांपासून ते ४३ टक्क्यांपर्यंत बँकेच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे.

नवीन वैद्यकीय पदवीधरांचा डोंबिवलीत सत्कार
डोंबिवली / प्रतिनिधी

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शहरातील नवोदित २९ वैद्यकीय पदवीधरांचा नुकताच सत्कार करण्यात आला. डोंबिवली जिमखाना येथे शहरातील विविध वैद्यकीय संघटनांतर्फे आयोजित या कार्यक्रमाला हिंदुजा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर. ए. भालेराव, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. मकरंद गणपुले, संयोजक डॉ. सुनील पुणतांबेकर, आयुर्वेद व्यासपीठचे विजयकुमार पोंक्षे, होमिओपॅथी असोसिएशनचे डॉ. राहुल घटवाल, अमर कात्रे, लक्ष्मीकांत बढे उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवलीकरांचा रेल्वे प्रवास सुसह्य करण्यावर भर देणार - डावखरे
ठाणे/प्रतिनिधी

लोकसभेत निवडून गेल्यास कल्याण- डोंबिवलीकरांचा रेल्वे प्रवास सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांनी सांगितले. डावखरे यांनी कल्याण ते मुंब्रा- कळवा असा रेल्वे प्रवास करून प्रवाशांशी संपर्क साधला. यावेळी प्रवाशांनी रेल्वे प्रवासात होणाऱ्या त्रासाची कैफियत डावखरे यांच्याकडे मांडली. डोंबिवली रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, उपनगरीय गाडय़ांची संख्या वाढवणे, रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्या वाढवणे, तसेच रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रेल्वे उड्डाण पुलांची संख्या वाढवणे, या कामांना प्राधान्य देणार असल्याचे डावखरे यांनी सांगितले. कल्याण रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा देणे, मुंब्रा स्थानकाचे सौंदर्यीकरण, दिवा स्थानकातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधा पुरविणे तसेच सकाळच्या वेळेस मुंब्रा व कळवा स्थानकातून लोकल सोडणे या गोष्टी खासदार झाल्यास आपण प्राधान्याने पूर्ण करू, असे डावखरे यांनी सांगितले. शासकीय कामकाजाची माहिती असणारा, अनुभवी खासदार म्हणून आपल्याला मत द्यावे, असे आवाहन डावखरे यांनी रेल्वे प्रवाशांना केले.

इंटरनेटद्वारे मतदानाचा हक्क देण्याची मागणी
कल्याण/वार्ताहर:
लोकसभा निवडणुकीचे मतदान इंटरनेटद्वारे करण्याचा हक्क निवडणूक आयोगाने मतदारांना द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. लोकसभेच्या मतदानाच्या कालावधीत सुट्टय़ा आल्या आहेत. नागरिक बाहेर गावी जाण्याच्या मन:स्थितीत आहेत, त्याचबरोबर वाढते तापमान पाहता दुपारी १२ ते ४ या वेळेत मतदार मतदानासाठी घराबाहेर पडण्यास धजावणार नाहीत, तेव्हा एकतर मतदानाची वेळ वाढवावी, अन्यथा इंटरनेटद्वारे मतदानाची सोय निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी कथोरे यांनी केली आहे.सध्याचे युग संगणक पद्धतीचे व जलदगतीचे बनले आहे. नागरिकांमध्ये मतदानाबद्दल कमालीची उदासीनता येत चालली आहे. मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याचे प्रमाण घसरत चालले आहे. मतदारांना इंटरनेटवरून मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्यास मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वास व्यक्त करून अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी रुग्णांना यामुळे मतदानाचा हक्क बजावता येईल, असे ते म्हणाले.

निवडणुकीचे प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
कल्याण/प्रतिनिधी -
निवडणुकीचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांच्या ठिकाणी प्रशिक्षणार्थीना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची कोणतीच सोय केली जात नसल्याने, प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तीन तासाचे प्रशिक्षण असले तरी दिवसभर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली राबवले जाते, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. प्रशिक्षित कर्मचारी हे शासनाच्या विविध खात्यामधील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयांमधील प्राध्यापक, बँकांचे कर्मचारी, अधिकारी आहेत. खात्यांतर्गत प्रशिक्षण घेताना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत चहापान, भोजन, भत्ता दिला जातो. पण निवडणूक कार्यालयाकडून अशा प्रकारचे प्रशिक्षण देताना किमान प्रशिक्षणाच्या ठिकाणी पाण्याची तरी व्यवस्था करावी, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कार्य आहे, म्हणून त्या ठिकाणी किमान कोणावर अन्याय होणार नाही, याची तरी काळजी घ्यावी, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुलुंड येथे निवडणुकीचे प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येत होते. त्या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्राध्यापक मंडळींना घरी उत्तरपत्रिका पडल्या असताना थांबावे लागले. चहानाश्त्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने अखेर वडापाव खावा लागला अशी माहिती प्राध्यापक मंडळींनी दिली. हे काम करण्यास कोणतीही अडचण नाही, पण किमान प्रशिक्षणासाठी माणसेच आली आहेत, याची जाणीव ठेवण्यात यावी, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रिक्षाचालकांना मिळाला तोंडी प्रचाराचा मंत्र
ठाणे/प्रतिनिधी

रिक्षाचालकांपासून तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय व समाजवादी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी ठाण्यात प्रचार फेरी आणि मेळाव्यांवर भर दिला.
अनुराधा मंगल कार्यालयात झालेल्या तरुणांच्या मेळाव्यात अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सभेतील उपस्थित तरुणांना पाहून नाईक म्हणाले, माझ्याकडेही तरुणांचा फौजफाटा असून त्यांचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता न करता समाजनिर्मितीसाठी व्हायला हवा. प्रत्येक तरुणाची जबाबदारी आता माझी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. कृष्णाई सभागृहातील रिक्षा चालक-मालकांच्या मेळाव्यात तोंडी प्रचार कसा करावा, याचे मार्गदर्शन प्रभाकर सावंत यांनी केले, तसेच काँग्रेसचे नेते अनिल साळवी, मनोज प्रधान, संजय वढावकर, सुधीर चव्हाण, राजा गवारी यांनी मार्गदर्शन केले. गायत्री सभागृहातील मेळाव्यानंतर वागळे इस्टेट येथील नगरसेवक शैलेश सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून प्रचार फेरी काढण्यात आली. सुर्वेवाडी, साठेवाडी, धर्मवीर नगर, ओसवाल पार्क, कशिश पार्क, मॉडेला नाका ते दत्तमंदिर, लॉरेन्स स्कूल, डिसुझा वाडी, किसननगर एक, पडवळनगर ते महाराष्ट्रनगर अशा मार्गवरून काढलेल्या फेरीचे रूपांतर सभेत करण्यात आले. नाईक यांच्यासोबत कांती कोळी, नगरसेवक रवींद्र फाटक, मधुकर होडावडेकर, डॅनी डिसुझा, जे.बी. यादव, कल्याण राय, रेश्मा पाटील, मंगला जानकर, रोहिणी आचरेकर, बाबू महाडिक, दीपक वेतकर, अभिजित पांचाळ आदींचा समावेश होता.

नाईकांची घराणेशाही संपणार -चौगुले
ठाणे/प्रतिनिधी

मी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांची घराणेशाही मतदारराजा संपवेल, असा विश्वास शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विजय चौगुले यांनी काल मीरा-भाइंदरमधील प्रचार रॅलीमध्ये व्यक्त केला. ठाणे लोकसभेचे उमेदवार विजय चौगुले यांनी मीरा-भाइंदर येथे प्रचार फेरी काढली. संजीव नाईक यांच्या घराणेशाहीचा उदो उदो करीत महापौर, स्थायी समिती सभापती, एमएमआरडीएचे सदस्य, आमदार आणि आता खासदारकीची उमेदवारी अशी नाईक कुटुंबियांची घराणेशाही आहे. सिडकोचा संचालक असताना नवी मुंबई शहराचा शिस्तबद्धरीत्या विकास केला, मात्र विकासाचे श्रेय लाटण्याचा आघाडीचे नेते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. आघाडीच्या उमेदवाराकडे कोणतेही मुद्दे नसल्याने मतदारांची दिशाभूल करणारे मुद्दे ते प्रचारात वापरत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. दरम्यान, नौपाडय़ातील शुभंकरोती सभागृहातील मेळाव्यात आमदार एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीपुरते आपली कार्यालये थाटणारे विरोधक निवडणुकीनंतर मतदार जनतेला विसरतात. त्यामुळे आनंद परांजपे यांनी कारकीर्दीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी युतीचा विजय आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार संजय केळकर, संजय वाघुले, सुभाष काळे, विश्वास दामले, आदी आजी-माजी नगरसेवक, युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यंदा मताधिक्य वाढणार - परांजपे
बदलापूर/वार्ताहर :
नव्यानेच स्थापन झालेला कल्याण लोकसभा मतदार संघ तरुण असून आपणही तरुण उमेदवार असल्याने गेल्या वेळचे मताधिक्य वाढवण्याची संधी मतदार देतील, असा विश्वास खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. माझ्यासमोर कोण निवडणूक लढवतो आहे, याची चिंता मला नाही. गेल्या आठ महिन्यांच्या अपुऱ्या कालावधीत केलेल्या भरघोस विकासकामांच्या आधारे मतदार पुन्हा संधी देतील, असा दावा खा. परांजपे यांनी व्यक्त केला. मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघ आकाराने लहान झाला. यामुळे शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून केलेल्या कार्याची माहिती देणे आता सहज शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले. भविष्यात चौथी मुंबई म्हणून विकसित होणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाबरोबरच रेल्वेला समांतर रस्ते करण्याच्या कामाबाबत विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील युतीचे चारही खासदार विजयी होतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख आ. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्ष संपदा गडकरी, उपजिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगराध्यक्ष गुलाबशेठ करंजुले, भाजपच्या नगरसेविका वैशाली बिर्जे आदी यावेळी उपस्थित होते.

ठाण्यात १७ एप्रिलला लोकसंसद
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारांशी थेट संवाद साधण्यासाठी समर्थ व्यासपीठ व वोट फॉर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने १७ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता शुभंकरोती सभागृहात लोकसंसद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, सोलापूर, नाशिक आणि धुळेपाठोपाठ समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने लोकसंसद हा कार्यक्रम ठाण्यात राबविण्यात येत आहे. ज्या मतदारांना उमेदवारांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी आपले प्रश्न समर्थ भारत व्यासपीठ, तळमजला, शुभज्योत सोसायटी, घंटाळी मंदिर रोड येथे किंवा वोट फॉर ठाणे या संकेतस्थळावर पाठवावेत, असे आवा हन आयोजकांनी केले आहे.

येऊरमधील बंगले; याचिकाकर्त्यांचेच अनधिकृत बांधकाम
ठाणे/प्रतिनिधी

येऊरमधील अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठवीत थेट उच्च न्यायालयात दाद मागणारे याचिकाकर्ते चंद्रकांत जाधव यांनीच येऊरमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या हेतूविषयीच पालिकेने शंका उपस्थित केली असून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणण्यात येणार आहे. येऊरमधील अनधिकृत बांधकामाबाबत सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीदरम्यान पालिकेने बंगले तोडण्याची कारवाई चालूच ठेवावी, तसेच सर्व बांधकामांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने आधी २१ आणि गेल्याच आठवडय़ात पाच अनधिकृत बंगल्यावर कारवाई केली आहे, तसेच येऊरमधील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात याचिकाकर्ते जाधव यांनीच दोन बंगले अनधिकृतपणे बांधले असून त्यांच्या काही सहकाऱ्यांचीही अनधिकृत बांधकामे असल्याचे आढळून आले आहे. ही बाब उद्या उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात येणार असून त्यानंतर न्यायालय जो आदेश देईल, त्याप्रमाणे कारवाई करण्याचे पालिकेने ठरविले आहे.

अंबरनाथमध्ये महामानवाला अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी

अंबरनाथ नगरपालिका मुख्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मध्यरात्री हार अर्पण करून राष्ट्रवादी-काँग्रेस-आरपीआय आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे आणि आरपीआय नेते शाम गायकवाड यांनी अभिवादन केले. डॉ.आंबेडकरांच्या ११८ व्या जयंती महोत्सवाची सुरुवात मध्यरात्री झाली. भीमगर्जनेच्या जयघोषात निघालेल्या मिरवणुकीतून अनुयायींनी पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. मागील दोन वर्षांपासून मध्यरात्रीपासून जयंती साजरी केली जात असल्याने या वर्षी चांगली गर्दी होती. नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे विठ्ठलवाडी, उल्हासनगर, बदलापूर आणि परिसरातील गावांमधून अनुयायी कार्यक्रमात सहभागी झाले होते.