Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

भारत-अमेरिका अणुऊर्जा कराराविषयी योग्य तऱ्हेने माहिती पुरवली जाणे आवश्यक होते, ती दिली गेली नाही, अशी कबुली भारताचे अमेरिकेतले माजी राजदूत रॉनेन सेन यांनी दिली आहे. आपल्या राजदूतपदाचा कार्यकाळ संपल्यावर सेन आता भारतात परतले आहेत. भारत-अमेरिका यांच्या संबंधांविषयीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा कालखंडात रॉनेन सेन यांनी अमेरिकेत राजदूतपदाची जबाबदारी सांभाळली आहे. भारतीय परराष्ट्र सेवेत १९६६ मध्ये दाखल झालेले सेन यांनी १९६८ ते १९८४च्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या दृष्टीने

 

महत्त्वाच्या ठरलेल्या काळात मॉस्को, सॅन फ्रान्सिस्को, ढाका या शहरांमध्ये, तसेच दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे. अणुऊर्जा आयोगाचे सचिव या नात्यानेही त्यांनी काम केले आहे. स्वाभाविकच भारताची अणुऊर्जाविषयक गरज त्यांना पूर्ण माहीत आहे. जुलै १९८४ ते डिसेंबर १९८५ या दरम्यान परराष्ट्र खात्यात सहसचिव असणारे सेन त्यानंतर पंतप्रधानांचे परराष्ट्र घडामोडींविषयक सहसचिवपदी राहिले. परराष्ट्र, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर पंतप्रधानांना ते सल्ला देत असत. मेक्सिकोमध्ये १९९१-९२ मध्ये, तर रशियात १९९२-१९९८ या राजकीय उलथापालथीच्या काळात ते भारताचे राजदूत होते. जर्मनी आणि इंग्लंडमध्ये राजदूतपदाचे काम पाहिल्यावर त्यांना अमेरिकेत राजदूतपदी काम करायची संधी मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघ, राष्ट्रकुल, अलिप्त राष्ट्र परिषद, पाच खंडांमधल्या सहा देशांची शांतता परिषद, दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषद (सार्क), जी-१५ देशांची परिषद आणि जवळपास १६० देशांमधल्या शिखर परिषदा यात त्यांचा सहभाग राहिला आहे. पंतप्रधानांचे खास दूत म्हणूनही वेळोवेळी त्यांनी अनेक देशांमध्ये दौरे केले आहेत. इंग्लंडमध्ये राजदूतपदी असताना गुजरात दंगलींच्या पाश्र्वभूमीवर तेव्हाचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भेटायला आलेल्या मुस्लिम शिष्टमंडळाबरोबरची चर्चा त्यांच्याच निवासस्थानी पार पडली होती. राजीव गांधी यांच्याशी त्यांचे संबंध मित्रत्वाचे होते, अशी चर्चा असली तरी प्रत्यक्षात राजीव गांधी हे साधे, सरळ आणि दूरदृष्टी असणारे पंतप्रधान होते आणि त्यांचा विश्वास आपण संपादन केला होता, या पलीकडे या संबंधांना फार अर्थ नाही, असे ते मानतात. भारत आणि अमेरिका यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण व्हावेत, यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडता आली, हे आपले भाग्य होय, असे त्यांचे मत आहे. अमेरिकेत अणुऊर्जा कराराविषयीच्या सर्व महत्त्वाच्या चर्चात एम. के. नारायणन, अनिल काकोडकर, श्याम सरण, शिवशंकर मेनन यांच्यासमवेत त्यांचा सहभाग होता. या कराराविषयी अधिक चांगला संदेश देशातल्या लोकप्रतिनिधींपर्यंत जाणे आवश्यक होते, पण तो गेला नाही, याचा खेद होतो, असे त्यांनी म्हटले आहे. या चर्चेत आपली भूमिका फार महत्त्वाची नव्हती, तरीही आपण काही गोष्टींचे संदर्भ पुरवले आणि अमेरिकेने काँग्रेसच्या सदस्यांशी स्वतंत्रपणे चर्चा घडवून आणल्या, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून त्यांची भूमिका कमी महत्त्वाची होती, असा निष्कर्ष काढता येत नाही. ‘रेडिफ डॉटकॉम’ या इंटरनेट संकेतस्थळावर त्यांनी दिलेल्या मुलाखतीने संसद सदस्यांमध्ये खळबळ माजवली होती. अणुऊर्जा कराराच्या विरोधकांना उद्देशून त्यांनी ‘हेडलेस चिकन’ असा शब्दप्रयोग केला होता, त्यावरून गदारोळ माजला आणि सेन यांना तातडीने माघारी बोलवायची मागणी विरोधकांनी, विशेषत: डाव्यांनी केली. सेन यांना सभागृहाच्या हक्कभंग समितीपुढे पाचारण करण्यात येऊन त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला. सेन यांनी त्यावर माफी मागून पडदा टाकला. परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी, सेन यांना माघारी बोलावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून सेन यांची पाठराखण केली. या महिन्याच्या प्रारंभी अमेरिकेतून परतताना, आपण मायदेशी समाधानाने परतत असल्याचे सांगून आपल्या मनात कोणाविषयीही राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रॉनेन सेन यांची कारकीर्द वादळी ठरली, तरी त्यांचा विविध प्रश्नांचा आवाका कल्पनातीत आहे, हे अनेकांनी मान्य केले आहे. मीरा शंकर या आता अमेरिकेत राजदूत बनल्या आहेत.