Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९

फसवणूक करणाऱ्यांना मतदान करू नका -राणे
चंद्रपूर, १४ एप्रिल / प्रतिनिधी

शेतीचा सातबारा काय असतो हेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना माहिती नाही तर भाजप हा फसवणूक करणारा पक्ष असून अशा अज्ञानी व फसवणूक करणाऱ्या पक्षाला कुणी मतदान करू नये, असे आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नरेश पुगलिया यांच्या प्रचारार्थ स्थानिक भद्रनाग मंदिराच्या मैदानावर पार पडलेल्या जाहीर सभेत राणे यांनी काँग्रेस शासनाने केलेल्या विकासाचा पाढा वाचत भाजप शिवसेनेवर सडकून टीका केली.

‘कोल बेल्ट’ कुणाला तारणार?
अजय देशपांडे, वणी, १४ एप्रिल

कोळसा खाणींनी ग्रस्त वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त गावांतील शेतकरी आणि नागरिकांची मते मिळवण्यासाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश पुगलिया, भाजप-शिवसेना युतीचे हंसराज अहीर आणि शेतकरी संघटनेचे अॅड. वामनराव चटप हे उमेदवार प्रयत्न करीत आहेत. कोळसा खाणींनी वेढलेल्या वणी तालुक्यातील राजूर कॉलरी, भांदेवाडा, पिंपळगाव, कुंभारखणी, उकनी, बेलोरा, जुनाड, बोरगाव, कोलेरा पिंपरी, भालर, नायगाव, मुंगोली, निलजई, सुंदरनगर, प्रगतीनगर या आणि इतर अनेक गावांमध्ये कोळसा खाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह शेतकरी व इतर लहानसहान व्यावसायिक आणि गावकरी यांची संख्या मोठी आहे.

नक्षलवादग्रस्त भागात चोख बंदोबस्त
गोंदिया, १४ एप्रिल / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पोलीस दलाच्यावतीने नक्षलवादग्रस्त परिसरातील मतदारसंघात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अविनाश झाडे व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्य़ातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चार विधानसभा मतदारसंघात एकूण १ हजार २०४ मतदान केंद्रे राहणार आहेत.

राज्यमंत्री वडेट्टीवारांच्या खांद्यावर मारोतराव कोवासेंची धुरा
गडचिरोली, १४ एप्रिल / वार्ताहर

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मारोतराव कोवासे यांच्या प्रचारार्थ राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ‘रोड शो’च्या माध्यमातून प्रचार करण्यात आला . राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अंतिम टप्प्यात चित्रपट नट-नटय़ांना मतदारसंघात आणून त्यांचे ‘रोड शो’ केले. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व अभिनेता रजा मुराद यांचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ात ‘रोड शो’ झाले.

---------------------------------------------------------------------------

गड राखण्याची धडपड
रामटेक लोकसभा मतदारसंघ भाजप-शिवसेनाचे कृपाल तुमाने

नितीन तोटेवार, नागपूर, १४ एप्रिल

रामटेक लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीतील शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने हे तसे प्रतिस्पध्र्याच्या तुलनेत अगदी नवखे व ‘लो-प्रोफाईल’. त्यांचा प्रचारही तसाच साधा-सरळ.. गावात उतरायचे, नागरिकांना नमस्कार करायचा, शक्य झाल्यास संवाद साधायचा. हे सुरू असताना मधातच ‘जय भवानी, जय शिवाजी’ किंवा ‘कृपाल भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी परिसर दणाणून जायचा. प्रचार म्हणजे फक्त प्रचार. तहान लागल्यास जवळचे पाणी प्यायचे आणि दुपारनंतर कारमध्येच जेवण घ्यायचे..

अखंड जनसंपर्क
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ भाजप-शिवसेनाचे हंसराज अहीर

देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, १४ एप्रिल

पद असो अथवा नसो, व्यक्तिगत जनसंपर्क हेच मुख्य ध्येय मानणाऱ्या हंसराज अहिरांना प्रचाराचा अजिबात त्रास होत नाही. सलग पाच वष्रे रोज सकाळी नऊ ते रात्री दोन असे ते फिरले आहेत. प्रचाराच्या या काळात यावेळेत आणखी दोन तासांची भर पडली आहे. लोकांमध्ये ‘भया’ या नावाने ओळखले जाणारे अहीर सध्या २२ तास प्रचारात व्यस्त आहेत.
सोमवारी पहाटे तीनपर्यंत वरोरा भागात बैठकी घेतल्यानंतर भया घरी परत जातात आणि लगेच ताजेतवाने होऊन आर्णीकडे निघतात.

अल्पावधीत प्रचाराचा धडाका
वर्धा लोकसभा मतदारसंघ भाजप-शिवसेनाचे सुरेश वाघमारे

प्रशांत देशमुख , वर्धा, १४ एप्रिल

दिवस थोडे, सोंगं फोर, म्हणून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सुरेश वाघमारे यांच्या घरी सकाळपासूनच वर्दळ वाढलेली. प्रचाराच्या गाडय़ा सज्ज. भगव्या उपरण्यातील कार्यकर्ते गावोगावचा आढावा घेतात. निघण्याची तयारी होत असतानाच वाघमारे परत फि रून अर्धागिनीला आवाज देतात, ‘आज दोघा तिघांचा जास्त डबा भर’. वनिता वाघमारे उच्चारतात, ‘नेहमीपेक्षा जास्तच दिलाय्’. कार्यालयात निघण्यापूर्वी परत आढावा घेतला जातो.

प्रचार आणि पर्यावरण
ज्योती तिरपुडे

निवडणुकीच्या धबडग्यात नेते, कार्यकर्ते, नागरिक या सर्वानाच पर्यावरणाचा विसर पडलेला आहे. पर्यावरण, प्रदूषण यांच्याकडे बघायला, त्याच्याविषयी बोलायला समाजातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वत: पर्यावरणवादीसुद्धा निवडणुकीतील भपका बघून त्यांचे प्रबोधनविषयक काम विसलेत की काय, अशी शंका निर्माण होते. नागपुरात २७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या रोजच्या सभा, मिरवणुका, कॉर्नर मिटिंग यासाठीच्या शेकडो वाहनांच्या अखंड धावपळीमुळे शहरात प्रचंड वायू प्रदूषण, ध्वनीप्रदूषण यात भर पडत आहे. मात्र याविषयी कोणताही नेता, कार्यकर्ता अथवा स्वयंसेवी संघटनेचा पदाधिकारी-कार्यकर्ता गांभीर्याने बोलायला अथवा ते टाळायलाही पुढे येण्यास तयार नाही.

दलितांच्या आशीर्वादाची शिदोरी
भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर

अकोला, १४ एप्रिल

अकोला लोकसभा मतदारसंघातील भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मागे जनतेचे बळ आहे. या बळाच्या भरवशावरच त्यांनी गेली अनेक वर्षे कॉंग्रेसच्या कुबडय़ा त्यागून स्वतंत्र वाट चोखाळली आहे. भारिपबमसंचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयन येथील राजकारणाची समीकरणे उलटवून टाकणारा ठरला आहे. बाळासाहेबांच्या या स्वतंत्र आणि बंडखोर विचारसरणीचा प्रत्यय त्यांच्यासोबत असताना पदोपदी येतो.

विकासाच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास
काँग्रेस-राष्ट्रवादीचे बाबासाहेब धाबेकर

अकोला, १४ एप्रिल

योजनामहर्षी म्हणून बाबासाहेब धाबेकरांची ओळख आहे. गेली पन्नास वर्षे जिल्ह्य़ाच्या राजकारणात दबदबा राखलेल्या या नेत्याचे वर्णन ‘अनप्रेडिक्टेबल’ असे केले जाते. अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी समर्थपणे पेलीत हा योजनामहर्षी सध्या मतदारसंघ पिंजून काढतो आहे. बाबासाहेब सकाळी दौऱ्याला निघण्यापूर्वी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर पदाधिकारी, कार्यक र्ते यांची गर्दी चर्चेसाठी, भेटीसाठी जमलेली असते पण, गडबड, गोंधळ अजिबात नाही. एकेक करून त्यांच्याशी चर्चा करूनच बाबासाहेब बाहेर पडतात. कमी बोलणे आणि अधिक ऐकणे हा बाबासाहेबांचा स्वभाव. त्यामुळेच त्यांच्याविषयीची आदरयुक्त भीती कार्यकर्त्यांमध्ये आहे.

अवघ्या एक दोन टक्क्याचं गणित
सोमनाथ सावळे, बुलढाणा, १४ एप्रिल

बुलढाणा लोकसभा मतदरासंघात सकृतदर्शनी चौरंगी लढत दिसत असली तरी ती प्रत्यक्षात दुरंगी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे व शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव यांच्यातील ही लढाई अतिशय काटय़ाची, प्रतिष्ठेची, रोमहर्षक व तुल्यबळ आहे. या तुंबळ महासंग्रामात कोण विजयी होईल आणि कोण पराभूत होईल हे धारिष्टय़ाने सांगणे अतिशय कठीण आहे, असे भाकित किंवा भाष्य केल्यास तो एका उमेदवारावर अन्याय होईल.

अंदाज आपापले..
बाबूजींना किती मते मिळतील ते सांगता येत नाही पण, थोडय़ा फार फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे.. माणिकराव किती मत घेतात, यावर बनवारीलाल यांचे भवितव्य आहे.. विलासभाऊंना गेल्या निवडणुकीत जेवढी मते मिळाली त्याच्यापेक्षा ५० हजार जरी मते कमी मिळाली ना तरी ते निवडून येतात.. प्रत्येकजण आपापल्या परीने निवडणुकीचे अंदाज बांधत असल्याची चर्चा शहरातील बहुतेक भागात सुरू आहे.. काही ठिकाणी तर विविध पक्षाचे कार्यकर्ते उमेदवाराच्या नावाचे असलेले ओळखपत्र घरोघरी पोहोचविण्याचे काम करीत होते. शहरातील बहुतेक सरकारी कार्यालयात व पानटपरीवर निवडणुकीचे अंदाज बांधत लोक चर्चा करीत होते. शंकरनगर चौकातील पानटपरीवर चार पाच युवक आपसातच पुरोहित आले तर मी पार्टी देईल आणि मुत्तेमवार आले तर तुला पार्टी द्यावी लागेल, अशा शर्यती लावत पुरोहितांना कुठल्या भागात किती मते मिळतील तर, माणिकराव वैद्य यांच्यामुळे पुरोहितांना कसा फायदा होईल, याचा अंदाज घेत चर्चा करीत होते. यावेळी पुरोहितांचे पारडे जड असले तरी इतके सोपे नाही. विलासभाऊंचा जनाधार मोठा आहे. गेल्या निवडणुकीत अटलबहादूर सिंग भाजपचे उमेदवार होते त्यावेळी असेच अंदाज बांधले जात होते. त्यावेळीही भाजपाला अनुकूल असेच वातावरण होते पण, एक लाखावर फरकाने मुत्तेमवार विजयी झाले होते. यावर्षी काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे असले तरी शेवटच्या क्षणी ते सगळे एकत्र येतात पण, वेळेपर्यंत काहीही सांगता येत नाही, हे तितकेच खरे आहे.. मायावतींची सभा यावेळी मोठी झाली. त्यामुळे दलित मते मोठय़ा प्रमाणात वैद्य यांना मिळू शकतात. शिवाय, सुलेखा कुंभारे यांनी बसपाला पाठिंबा दिला आहे पण, त्याचा फारसा फरक पडणार नाही. याशिवाय, २० ते २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे तेही उमेदवार काही ना काही मते घेतीलच ना. विलास मुत्तेमवार आणि बनवारीलाल पुरोहित बाजूलाच राहतील आणि दोघांच्या भांडणामध्ये माणिकराव वैद्य निवडूनही येऊ शकतात, असेही एक युवक म्हणाला. आपण तर कुठल्याच पक्षाचे नाही. त्यामुळे जो उमेदवार आपले भले करेल त्याला मत देऊ. निवडणूक म्हणजे सर्व पैशाचा खेळ आहे. उद्या मतदान होईल. आपण कुठल्या तरी उमेदवाराला मतदान करू. त्यात कोणीतरी एक उमेदवार निवडून येईल. नंतर तो आपल्याला भेटणारसुद्धा नाही. त्यामुळे निवडणुकीचे अंदाज आपण कितीही बांधले तरी दहा ते सात आपल्याला नोकऱ्या करायच्याच आहेत. त्यामुळे चहा घ्या आणि आपापल्या कामाला लागा चला.
फिरस्ता
---------------------------------------------------------------------------

स्थिर सरकारसाठी काँग्रेसला विजयी करा -आवारी
गडचिरोली, १४ एप्रिल / वार्ताहर

केंद्रात काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारने पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे स्थिर सरकार देऊन विकासात्मक कामे केलेली आहेत. या भागाच्या सर्वागीण विकासासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मारोतराव कोवासे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी केले. सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी, कुनघाडा, सुभाषग्राम, मुलचेरा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी खासदार आवारी पुढे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने राज्यात सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले असून काँग्रेसच्या विकास कामांचा विचार करून जनतेने साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी आमदार पेंटा रामा तलांडी, रामराव दुधीवार, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीहरी भंडारीवार, सगुणा तलांडी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दीपक आत्राम, बब्बू हकीम, बाबासाहेब भातकुलकर आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न -पाशा पटेल
चंद्रपूर, १४ एप्रिल / प्रतिनिधी

शेतकऱ्यांना जात नसते, शेतकरी हा अंतत: शेतकरीच असतो; परंतु काही संधीसाधुंनी स्वार्थापोटी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. शेतकरी एकसंघ राहुच नये अशी पद्धतशीर नीती या संधीसाधु नेत्यांनी अवलंबली आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सय्यद पाशा पटेल यांनी कोरपना येथील जाहीर सभेत केला. ५० वर्षे सत्तेचा उपभोग घेऊन काँग्रेसने या देशातील लोकांना काय दिले? अशी पृच्छा करून ते म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. विदर्भात शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होईपर्यंत कर्जमाफीची प्रतीक्षा हे सरकार करीत होते. भाजप शिवसेनेचे नेते रस्त्यावर उतरले नसते, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच नसती ही काळय़ा दगडावरची रेषा शेतकरी बांधवांनी समजून घेतली पाहिजे, असे पाशा म्हणाले. यावेळी वणीचे आमदार विश्वास नांदेकर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वातील सरकारवर घणाघाती टीका करून काँग्रेसच्या हातात देश सुरक्षित राहिला नसून आता भाजप, शिवसेनेच्या हातात सत्ता सोपविण्याची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी उमेदवार हंसराज अहीर म्हणाले की, राजकारणातून समाजकारण व त्या माध्यमातून जनसेवा हेच कर्तव्य समजून कार्य केले. माझ्य़ा या कार्यात सर्वानी सहकार्य दिल्यानेच मला जनसेवेची संधी मिळाली, असे अहीर म्हणाले. या सभेला भाजपचे सरचिटणीस खुशाल बोंडे, शिवसेनेचे गोपाल मालपानी, अरुण नवले, शिवाजी शेलोकर, नारायण हिवरकर, विशाल गज्जलवार आदी उपस्थित होते.

दारू विक्रेत्यांना जिल्ह्य़ातून हद्दपार करण्याची मागणी
गडचिरोली, १४ एप्रिल / वार्ताहर

गडचिरोली जिल्ह्य़ात असलेली दारूबंदी ही या जिल्ह्य़ातील नागरिकांना शासनाने दिलेली मोठी देणगी असून या दारूबंदीमुळे अनेक अवैध व्यवसायांनाही आळा बसला आहे; परंतु या जिल्ह्य़ात अवैध दारू विक्री सुरूच असल्याने अशा सराईत दारू विक्रेत्यांना तात्काळ हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या जिल्हा शाखेने केली आहे. जिल्ह्य़ातील अनेक लोक अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात उतरले असून कमी श्रमात जास्त पैसे कमविण्याचा त्यांचा उद्योग तेजीत आहे. अनेक लोक आडमार्गाने दारूची आवक करीत आहेत. दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग निष्क्रिय असून पोलीस ठाण्याचे या व्यवसायाकडे दुर्लक्ष आहे. गडचिरोली, वडसा, चामोर्शी, आरमोरीच्या अनेक पोलिसांना यात हफ्ते मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ात दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसठी सराईत दारू विक्रेत्यांना तात्काळ जिल्ह्य़ातून हद्दपार करावे, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे राज्य विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भडांगे, जिल्हा सचिव श्रावण झोडे, कोषाध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष सुभाष घुटे, शहर अध्यक्ष किशोर खोब्रागडे आदींनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

माहिती अधिकार सामान्यांसाठी वरदान- कुळवेकर
शेगाव, १४ एप्रिल / वार्ताहर

केंद्र सरकार माहिती अधिकार कायद्यामुळे सामान्य नागरिकांचा अधिकाऱ्यांवर वचक निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त विजय वि. कुळवेकर यांनी केले. विश्राम भवनात पत्रकारांसोबत ते बोलत होते. या कायद्यामुळे कुठल्याही कार्यालयात माहिती मागता येते माहिती अधिकार अंमलात आला तेव्हापासून कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीचे महत्त्व समजले, असेही ते म्हणाले.

पदयात्रेने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
गोंदिया, १४ एप्रिल / वार्ताहर

शिशुपाल पटले यांच्या प्रचार पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता. या पदयात्रेत माजी आमदार रमेश कुथे, दयाराम कापगते, अशोक इंगळे, आमदार हेमंत पटले, भगत ठकरानी, दीपक कदम, रवी अग्रवाल, अमृत इंगळे, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, सभापती विजय रहांगडाले सहभागी झाले होते. भाजप कार्यालयातून पदयात्रेला सुरुवात झाली. भाजपचे चिन्ह ‘कमळ’ आणि प्रचार रथाने सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. शिवसेनेचे दुर्गेश रहांगडाले, तेजराम मोरघडे, सोनू कुथे, संजय कुलकर्णी, विनोद किराड, जयपाल मेश्राम, सुधीर कोसरकर, राजा कदम, अखिलेश सेठ, सोनू सावंत, अशोक यादव, शंभू ठाकूर, योगराज रहांगडाले, बिट्टू टेहरा, मनीष स्वामी यावेळी उपस्थित होते.

..तर नकारार्थी मतदान, ग्रामसभेचा इशारा
चंद्रपूर, १४ एप्रिल/प्रतिनिधी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या उमेदवारालाच मतदान करू अन्यथा नकारार्थी मतदान करू, असा इशारा दहा ग्रामसभेतील गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पातील कोळसा, रामनतळोधी, पळसगाव, देवाडा, झरी, पेठ, पायमी, कारवा, पांगडी, जुनोना, जामनी, नवेगाव या दहा ग्रामसभेने समस्या सोडविण्याची मागणी या उमेदवारांकडे केली आहे. या प्रकल्पातील गावांमध्ये विविध समस्या आहे. मात्र या समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. यातूनच दहा ग्रामसभेने गावातील समस्या सोडविण्यासाठी जंगलवासी अधिकार बचाव मंच तयार केला. हा मंच आजूबाजूच्या ग्रामसभेत जावून प्रकल्पातील समस्या सोडवणाऱ्या उमेदवाराला मतदान करा अन्यथा नकारार्थी मत देण्याचा प्रचार करित आहे. याचा मतदारानावर परिणाम होणार आहे.

खामगाव तालुक्यात शिंगणेंच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
खामगाव, १४ एप्रिल / वार्ताहर

राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पदयात्रेला खामगाव मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रचार पदयात्रेत उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार दिलीप सानंदा, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजय अंभोरे, माजी आमदार नाना कोकरे, डॉ. सदानंद धनोकार, राजाराम काळणे, गोपाळराव कोल्हे, शांताराम पाटेखेडे, रामकृष्ण पाटील, रामचंद्र पाटील, देवेंद्र देशमुख, दिलीप मारके, काशीनाथ दारमोडे, श्रीकृष्ण ढबाले, सतीश राठी, समाधान मुंडे, अशोक हटकर, जानराव पाटील, अवधूत टिकार सहभागी झाले होते. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. सुटाळा (बु.) येथे पदयात्रेचे आगमन झाले असता नागरिकांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. ही प्रचारयात्रा वाजत गाजत गावातील विविध मार्गाने फिरली. ठिकठिकाणी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना डॉ. शिंगणे यांनी आघाडी सरकारच्या कार्याची माहिती दिली. बोरी अडगाव येथेही पदयात्रेला प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइंचे कार्यकर्ते या पदयात्रेत सामील झाले होते.