Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ एप्रिल २००९
विशेष लेख

दलित मतदारांना गृहीत धरणारे
हे कोण टिकोजीराव?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाच्या उत्थानासाठी राजकारण, समाजकारण, धर्मकारण करतानाच दलित-शोषित पीडितांच्या राजकीय शक्तीचे बुलंद प्रतीक म्हणून सर्वसमावेशक बलशाली अशा रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञाती बांधवांना असेही निक्षून सांगितले होते की मोठय़ा कष्टाने दलितोद्धाराचा रथ मी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ओढीत आणला आहे. तो तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर नेऊ नका, पण तो किमान मागे तरी नेऊ नका. तो आहे तिथेच राहू द्या.
आपल्या पश्चात आपले वारस कसे वागणार आहेत हे द्रष्टय़ा बाबासाहेबांनी जाणले होते. म्हणून तर त्यांनी आपल्या वारसांना चळवळीच्या एकजुटीसंदर्भात मोलाचा उपरोक्त सल्ला दिला होता. प्रश्न असा की बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर गेल्या ५३ वर्षांत काय झाले? तर बाबासाहेबांचे राजकीय वारस म्हणविणारे पुढारी चक्क आंबेडकरी चळवळीचे निर्घृण मारेकरीच ठरले. रिपब्लिकन पक्षाच्या सर्वच आजी-माजी पुढाऱ्यांनी रिपब्लिकन चळवळीचे तीनतेरा वाजवून रिपब्लिकन चळवळ दुबळी करून सोडली. स्वार्थाखातर आंबेडकरवादाला सोडचिठ्ठी देऊन रिपब्लिकन चळवळ सौदेबाजीपायी मोडीत काढली. प्रश्न असा की आंबेडकरी चळवळीच्या या मारेकऱ्यांना दलित समाजाने लोकसभा निवडणुकीत जाब न विचारता काय म्हणून क्षमा करावी?
लोकसभेच्या निवडणुकीत एक प्रकाश आंबेडकरांचा बऱ्यापैकी जागा लढविण्याचा अपवाद करता अन्य रिपब्लिकन गटांच्या मठांचे मठपती एखाद-दुसरी जागा लढवीत आहेत. काय अवस्था आहे या मठाधिशांची? रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे कुंकू लावून काँग्रेसचा एक अघोषित दलित सेल म्हणून निवडणुकीस उभे आहेत.

 


प्रा. जोगेंद्र कवाडे स्वत:ला तत्त्वनिष्ठ आंबेडकरानुयायी म्हणवितात. शरद पवारांकडे लांगूलचालन करून त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळविली होती. पण आठवले गटाच्या अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकरांना राज्यमंत्री करताच खैरलांजीचे निमित्त करून त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री आबा पाटील यांनी दलितांचे संरक्षण करण्यात कुचराई केली असा ठपका ठेवून आमदारकीचा राजीनामा दिला आणि मागच्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी नितीन गडकरींना पाठिंबा देऊन भाजपशी चुंबाचुंबी सुरू केली. आता लोकसभा निवडणुकीत मुंबईतील भाजप उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. तर असा हा सर कवाडेंचा अस्सल (?) बावनकशी (?) आंबेडकरी बाणा!
तिकडे रामटेकमधून निवडणूक लढवू पाहणाऱ्या सुलेखा कुंभारे आधी शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी मातोश्रीवर जाऊन धडकल्या. पण धनुष्यबाणावरच निवडणूक लढवाल तरच शिवसेनेचा पाठिंबा मिळेल असे उद्धव ठाकरेंनी बजावताच सुलेखा कुंभारे कुठल्याशा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नावे रामटेकमधून उभ्या राहिल्या. आता त्यांनी माघारही घेतली आहे.
रा. सु. गवईंनी आयुष्यभर काँग्रेसची भाटगिरी केली. आता तोच कित्ता त्यांचे पुत्र राजेंद्र गवई अमरावतीत गिरवीत आहेत.
टी. एम. कांबळेंनी काँग्रेसचे सोनियांना साकडे घालून पाहिले. पण काँग्रेसने लातूरची जागा त्यांच्यासाठी काही सोडली नाही. प्रश्न असा की अशा या आंबेडकरद्रोह्य़ांना दलित मतदारांनी काय म्हणून थारा द्यावा?
रिपब्लिकन पुढाऱ्यांनी गत पन्नासएक वर्षांत दलित समाजाच्या बुनियादी प्रश्नावर कोणती आंदोलने केली? दलित समाजाचे कोणते रोजी-रोटीचे प्रश्न सोडविले? तरुणांच्या बेकारीला कितपत हात घातला? तर यापैकी त्यांनी काही एक केले नाही. उलट त्यांनी दलित समाजास भावनात्मक चळवळीत गुंतवून स्वत:चे मात्र चांगभले करून घेतले. दलित जनता एकीकडे रोजी-रोटीला मोताद झालेली असताना यांचे मात्र बंगले उभे राहिले. दारात मोटारगाडय़ा उभ्या राहू लागल्या. गळ्यात पोळ्याच्या बैलागत जाड सोनसाखळ्या चमकू लागल्या. मनगटे सोन्याच्या साखळ्यांनी व पाचही बोटे अंगठय़ांनी सजू लागली. कोंबडीची टांग आणि वर मद्यपान याशिवाय यांच्या जेवणाला चव येईनाशी झाली. प्रत्येक निवडणूक म्हणजे नोटांची बंडले मिळविण्याची यांची सुगी ठरली.
बाबासाहेबांनी उपाशी-तापाशी राहून ब्रेडच्या तुकडय़ावर अठरा-अठरा तास अभ्यास केला तो कशाकरिता? आपणाला जे सुख उपभोगता आले नाही ते सुख आपल्या चिल्या-पिल्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडून का होईना पण उपभोगावे यासाठीच का बाबासाहेबांनी हाडाची काडे केली? आपले पुढारी दलित समाजाचे हित वाऱ्यावर सोडून, रिपब्लिकन चळवळीचे थडगे बांधून मस्तपैकी उंची (की भ्रष्ट?) जीवन जगत असतील तर उपाशीपोटी दलितांनी ओला-कोरडा घास-कुटका खाऊन, घोटभर पाणी पिऊन टाळ्या नकोत का पिटायला? हे जर पटत नसेल तर मग निवडणुकीत अशा रिपब्लिकन पुढाऱ्याची अनामत रक्कम जप्त करण्याचा पुरुषार्थ त्याने गाजवायला हवा की नको?
रिपब्लिकन फाटाफुटीचा इतका वाईट परिणाम झाला आहे की, दलितांचे राजकीय संघटन लाचार, विकाऊ झाले आहे हे ओळखूनच खेडोपाडी धनदांडग्या सवर्णानी दलित समाजावर अन्याय अत्याचार केले. कुठे दलित महिलांवर बलात्कार केले, कुठे दलित तरुणींची धिंड काढली तर कुठे खोटे-नाटे आळ घेऊन दलितांचे मुडदेही पाडले. महाराष्ट्रात असा एकही दिवस उगवत नि मावळत नाही की, ज्या दिवशी दलित समाजावर कुठे ना कुठे माणुसकीला काळिमा फासणारा अत्याचार होत नाही. याची शरम कोणत्या दलित पुढाऱ्याला वाटली? दलित अत्याचाराच्या प्रश्नावर जे कुणी छटाकभर मंत्रीपद भूषवीत आहेत, जे कुणी आमदारकी-खासदारकी उपभोगीत आहेत त्यांनी दिले का आपआपल्या पदांचे राजीनामे? नाही. उलट दलितांचे दिवसाढवळ्या मुडदे पाडा, दलित बायका-पोरींच्या अब्रूचे लचके तोडा, पण आम्हाला मंत्री करा, अशीच यांची समाजद्रोही भूमिका राहिली आहे. मग हे कसले आंबेडकरवादी? आणि यांना काय म्हणून दलित समाजाने मतदान करावे?
आता राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा. दोन्ही काँग्रेसच्या धोरणात्मक भूमिकेविषयी चर्चा होऊ शकते. पण प्रश्न हा नाही. तर प्रश्न असा आहे की ज्या दगलबाज - विश्वासघातकी रिपब्लिकन पुढाऱ्यांचे नाव काढताच दलित समाजाच्या कपाळावर आढय़ा उमटतात त्या विकाऊ रिपब्लिकन पुढाऱ्यांशी युती करण्याची गरज दोन्ही काँग्रेसना का वाटावी? ज्या रिपब्लिकन पुढाऱ्यांच्या मागे काळे कुत्रेही नाही त्या रिपब्लिकन पुढाऱ्यांशी युती केली तर दलित मिळतील असे गृहीतक दोन्ही काँग्रेस पक्ष कशाच्या बळावर मांडतात? खरे तर या दोन्ही पक्षांनी या पुढाऱ्यांमार्फत दलित समाजाकडे मते मागावयास न येता स्वतंत्रपणे येऊन मते मागितली असती तर एकवेळ त्याचा विचार तरी करता आला असता. पण ज्या पुढाऱ्यांना दलित समाज आपले नेतेच मानीत नाही त्यांच्यामार्फत दलित मतांची बेगमी करून पाहणाऱ्या दोन्ही काँग्रेस पक्षांनाही म्हणूनच मग दलित मतदारांनी धडा का शिकवू नये?
काँग्रेसी राज्यातच दलित समाजावर ग्रामीण भागात माणुसकीला लाजविणारे अधम अत्याचार होत आले हे तरी दलित मतदारांनी का विसरावे? खरे तर रिपब्लिकन पुढाऱ्यांना नादी लावून रिपब्लिकन चळवळ संपविण्याचे जे पाप काँग्रेसने केले ते सुद्धा इतके अक्षम्य आहे की, या पापाची शिक्षा म्हणून रिपब्लिकनांबरोबरच दोन्ही काँग्रेस पक्षांना दलित मतदारांनी धडा शिकविणे आवश्यक होऊन बसले आहे. अशा या जालीम मात्रेचा परिणाम म्हणून रिपब्लिकन पुढारी ताळ्यावर आले तर येतील आणि काँग्रेसही भानावर येईल, याची जाण लोकसभा निवडणुकीत दलित मतदारांनी ठेवलेली बरी.
मग प्रश्न असा की, दलित समाजाने मतदान कुणाला करावे? तर याचे उत्तर असे की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- रिपब्लिकन यांना वगळून अन्य कुठल्याही धर्मनिरपेक्ष पक्ष - संघटनांच्या उमेदवारांना करावे. पण एकदाच काँग्रेस-रिपब्लिकन युतीला धडा हा शिकवावाच शिकवावा. कारण दलित मतदारांना गृहीत धरणारे हे कोण टिकोजीराव पक्षनेते?
बी. व्ही. जोंधळे