Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महागाईला जोड टंचाईची!
‘कॉमन मॅन’चा अर्थसंकल्प कोलमडला
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींना टंचाईचीही जोड मिळाल्याने ऐन निवडणुकीच्या

 

रणधुमाळीत सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. घरगुती गॅसची टंचाई, सिमेंटचे दर गगनाला भिडले, शिवाय टंचाई या साऱ्या गोष्टींमुळे ‘कॉमन मॅन’चा मासिक अर्थसंकल्प पूर्णपणे कोलमडला आहे.
मागच्या १५ दिवसांत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या. गेल्या सुमारे आठ-दहा महिन्यांपासून जागतिक मंदीच्या झळा जाणवू लागल्या, तेव्हापासूनच महागाईने तोंड वर काढले. सुरुवातीच्या काळात त्यावर ओरडही झाली. मात्र, लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी ही चर्चा मागे पडली. आता तर निवडणूक ऐन भरात आली आहे. मात्र, महागाईकडे राजकीय पक्ष व सरकारी यंत्रणेनेही कानाडोळा केल्याचे दिसते.
नगर शहरासह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसचा जास्त तुटवडा निर्माण झाला आहे. मागच्या १५ दिवसांत सिमेंटचेही दर प्रचंड वाढले. शिवाय आता सिमेंटची टंचाई निर्माण झाली आहे. मंदीला सुरुवात झाली, तेव्हापासूनच स्टीलचे भाव कमालीचे घटले होते. अलीकडच्या काळात त्यामुळे बांधकाम क्षेत्रात थोडी हालचाल जाणवू लागली असतानाच सिमेंटचे दर वाढले आणि आता कमालीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी २४० रुपयांना असलेली सिमेंटची गोणी आता २८०-२८५ रुपयांवर पोहोचली आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडूतील बहुसंख्य सिमेंट कंपन्या सध्या मोठय़ा वीजकपातीला तोंड देत आहेत. त्यामुळेच उत्पादन प्रचंड घटले असून, त्याचा परिणाम किमती वाढण्यात व तुटवडय़ात झाल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक मनोज नहार यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, सिमेंटसारख्या गोष्टीच नव्हे, तर मागच्या ८-१० दिवसांत काही कंपन्यांच्या सिगारेटचे दरही २० ते ३० टक्क्य़ांनी वाढले आहेत. शिवाय त्यांचाही कृत्रिम तुटवडा केला जात असल्याची तक्रार होऊ लागली आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असतानाच दुसरीकडे शेअर मार्केट मात्र गुंतवणूकदारांना दिलासा देणारे ठरले आहे. मागच्या १५ दिवसांत महागाई वाढली. साधारणपणे त्याच काळात शेअरच्याही किमती १०० टक्क्य़ांच्या आसपास वाढल्या आहेत. हा विरोधाभास सर्वसामान्यांना अधिकच त्रासदायक ठरू लागला आहे.