Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रंग प्रचाराचे
कारवॉँ निघाला पुढे..
कैलास ढोले

फटाक्यांची आतषबाजी, शाल-फेटे.. रणरणत्या उन्हातही गावोगावी तरुणांकडून असं स्वागत सुरू असतं. गळ्यात हार-तुरे पडतात. नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजीव राजळे एक एक

 

गाव घेत पुढे सरकतात. नियोजनबद्धपणे त्यांचा प्रचारदौरा सुरू असतो. कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. मात्र, पक्षाचे बॅनर नसल्याने बारीक सारीक गोष्टीतही त्यांना लक्ष घालावे लागते.
सकाळी साडेसहाला राजळेंचा दौरा सुरू होतो. राजळेंचे आटोपेपर्यंत त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते पुढची तयारी करतात. काही कार्यकर्ते ८-१० माणसांना पुरेल इतके जेवणाचे डबे गाडीत नेऊन ठेवतात. शिवाय औषधे, पाण्याच्या बाटल्या, प्रचार पत्रकाचे गठ्ठे असे बरेच काही. पांढरा टी शर्ट, पांढरी पँट घातलेले राजळे हॉलमध्ये आले. संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता येतो. कानाशी लागला. ब्रिगेडमध्ये फूट पडल्याचे त्याने सांगितले. राजळे ऐकतात अन् निघतात. ताफा प्रचारासाठी रवाना झाला.
कान्हूर पठार, वाफाऱ्यांची वाडी ही पठारावरची गावं. शेकडो मैल पडीक जमीन. अपवाद कुकडी कालव्याचा! स्थानिक प्रश्नांपेक्षाही लोकांना राजळेंविषयीच उत्सुकता. निघोजला मोठी गर्दी. गावातील तरुण मंडळच नव्हे, तर आबालवृद्धही फेरीत सामील. तुताऱ्या, फटाके अन् ढोलांच्या गजरात स्वागत अन् मग दणक्यात सभा.
गाडीत बसलं की राजळे स्वीय सहायकाला गावे विचारतात. तरुण, अभ्यासू म्हणून राजळेंची प्रतिमा. त्यांच्या गाडीत बसल्या बसल्या हे जाणवते. ‘वातावरण बरं आहे, चाललंय..’ असं सांगतात. मोबाईलवर संभाषण. बहुधा राहुरी तालुक्यातून फोन असावा.. ‘पाटील, मी परवा येतो. भेटून जाईन.’ हा संवाद मध्येच तुटतो. एखादी वाडी, छोटे गाव लागते. राजळे खाली उतरून हात जोडतात. ‘सहकार्य करावे लागेल बरं का. लक्षात ठेवा. नारळ चिन्ह आहे..’
पहिला पडाव नगर तालुक्यातील हिंगणगावात. उत्साही कार्यकर्ते डफ वाजवून स्वागत करतात. गावच्या पटांगणात सभा. सोनवणे नावाचा कार्यकर्ता राजळेंची माहिती देतो. समोर दुकानाच्या ओटय़ावर विरोधी गटाचे लोकही बसलेले. सरपंच पाडळे राष्ट्रवादीचे. एकास विचारले, ‘कसं काय वातावरण?’ सावधपणे न्याहळत ‘सारं नारळंच!’ असं सांगून त्याने प्रश्नकर्त्यांचे समाधान केले.
एव्हाना ऊन तापायला लागलेलं. तरुणांचा जथ्था खातगावला वाट पाहत उभा असतो. विकास चेमटे, अंकुश रोहोकले, दीपक रोहोकले, बी. एस. ठुबे. ‘भाऊ, भाषण करा’ असा त्यांचा आग्रह.
भाळवणी, टाकळी ढोकेश्वरदरम्यान डोंगरमाथ्यावर धोत्रे बुद्रुक गाव. कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला उभे. राजळेंना जवळच्या हॉटेलमध्ये नेतात. बैठक होते.
टाकळी ढोकेश्वरच्या बाजारात सभा. चांगली गर्दी. सभा झाल्यावर शेजारील दुकानात राजळेंचा फेटा बांधून सत्कार. नंतर नारायण शिंदे नावाच्या वयस्कर कार्यकर्त्यांच्या राजळे पाया पडले. ‘तुझ्या बुद्धिमत्तेला मत’ असे सांगून त्यानेही आशीर्वाद दिला. गर्दी पुढे गेली आणि मागे चर्चा सुरू झाली - ‘दोन मराठय़ांच्या भांडणात मारवाडी निघंल!’ गावाच्या पुढे पुलावर झावरे कुटुंबातील सुवासिनींनी राजळे यांना ओवाळले. पुन्हा गाडय़ा धावू लागल्या.
कर्जुलेहर्या गावात विठाबाई फाफळे, समाबाई जाधव यांनी पिण्याच्या पाण्याचं गाऱ्हाणं मांडलं. आता सूर्य आग ओकू लागला होता. गाडीत बसताच राजळे पेंगतात. मग छोटी डुलकी. गाव आलं की लगेच उतरतात. पिंपळगाव रोठे कोरठण खंडोबासाठी प्रसिद्ध. रस्त्यावर चिटपाखरू नाही. वडाच्या झाडाखाली दोन वृद्ध बसलेले. राजळे शांताराम खोसे यांच्या घरी पोहोचतात. चहा-पाणी होते. माजी सभापती गंगाधर बेलकर, मोहन रांजवण ताफ्यात सामील झाले. कोरठण खंडोबा मंदिरात राजळेंनी अभिषेक केला. सुरुवातीला आगत-स्वागत झाले. प्रसादाचा श्रीफळ घेतला. आता वाडी-वस्त्यांवर माणसं भेटणार नाहीत, असे सांगून मोठय़ा बाजारपेठेच्या गावी गाडी घेण्याची सूचना राजळे यांनी केली.
कान्हूरपठारकडे जाताना मध्येच रस्ता सोडून गाडय़ा जवळच्या वस्तीकडे वळाल्या. नवनाथ वाफारे यांच्याकडे पुन्हा चहा-पाणी. पारनेरला राजळे यांचे कार्यालय आहे. येथे ताफा थांबला. सभापती पांडुरंग खेडकर पुढील नियोजन करतात. संजय वाघमारे यांच्या निवासस्थानी जेवण. जेवतानाही मोबाईल सुरूच होता. नंतर पत्रकारांशी संवाद..
पारनेरपासून ११ किलोमीटर अंतरावर गोरेगावला अंबाबाईच्या यात्रेतील कुस्त्यांचा हगाम्याला राजळेंनी हजेरी लावली. सुरुवातीला ‘राजळेभाऊ आले’ असा गलका झाला. त्याचवेळी भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांचे चिरंजीवही तिथे आले. ग्रामस्थांनी दोघांचाही सत्कार केला. पुढे राळेगणसिद्धीला भैरवनाथ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन फटाके वाजवत स्वागत केले.
मग वाडेगव्हाण, कुरुंद, जवळे, निघोज, देवीभोयरे, लोणी मावळा, अळकुटी, बाभूळवाडे, वडझिरे, चिचोंली, पुणेवाडी अशी गावे घेत गाडय़ा पुढे जातात.
निघोज, अळकुटीच्या सभेत राजळे आपलं तिकीट कसं कापण्यात आलं ते सांगितलं. आर. आर. पाटलांवर टीका केली. माझी दखल घेऊ नका असं राष्ट्रवादीवाले म्हणतात, परंतु अर्धे भाषण माझ्यावरच करतात! मी साधा किरकोळ माणूस, पण मला पाडण्यासाठी शरद पवार, आर. आर. आणि निम्मे
मंत्रिमंडळ सभा घेते. हिंदीत कांद्यास प्याज म्हणतात. साखरेला काय म्हणतात.. चिनी.. समोरचा उमेदवार हे विषय संसदेत कसे मांडेल? राजळे सवाल करतात. लोक हसून प्रतिसाद
देतात.
रात्री अकराला परतीचा प्रवास. घरी येईपर्यंत १२ वाजले होते, तरीही बंगल्यावर कार्यकर्ते थांबलेले. राजळे हॉलमध्ये बसतात. चर्चा सुरू होते. आता उद्याचे नियोजन..