Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आरसा
आरसा म्हटलं की त्याच्या निरनिराळ्या रूपाबरोबर त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टीही आठवतात. प्रसंगी आपला प्राण वाचविण्यासाठी स्वतच्या पिलालाही पायाखाली घेऊन त्यावर उभी राहणाऱ्या माकडिणीची मॉरल स्टोरी आरशाशी डायरेक्टली संबंधित नसली, तरी तिचं नातं आहेच जवळचं आरशाशी. माकडिणीला सर्वात प्यारा आपला जीव हे सत्य तसं बहुंशी सर्वच मानवजातीला लागू व्हावं. पण त्याचबरोबर सर्वात प्यारा आपला जीव असणाऱ्या माणसाला असते सर्वाधिक प्यारी असते आपलीच प्रतिमा. आपल्या प्राणप्रिय छबीला चोवीस तास डोळ्यासमोर ठेवणारा आरसाही त्याला असतो प्यारा. स्वतचं देहभान हरवण्याची वृत्ती असते मानवी

 

स्वभावाशी सुसंगत अशीच. खरंतर ही आंतरिक गरज, भूकच म्हणेनात, दिसते पुरवलेली आरसा नावाच्या आपल्या अनोख्या सोबत्याने आणि अशा प्रकारे न मागताही हा आरसा अद्भुत दिसेल माणसाच्याही नकळत त्याला सतत देताना हवासा, आश्वासक, जिव्हाळ्याचा आसरा.
आरशाची नावं अनेक - जसं आइना, दर्पण, मीरर इ. पण पुन्हा एकदा शेक्सपियरला स्मरून आरशाच्याही संदर्भात येईल म्हणता ‘नावात काय आहे?’ कारण नाव कुठलंही असलं तरी आरशाची अंगभूत वैशिष्टय़ेच असतात सदैव कार्यरत. सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ आरशाचं हे त्याच्या वास्तव जसंच्या तसं दाखविण्यात असतं. पण त्याचबरोबर त्याच्या प्रतिबिंबीत रूपाकडे, विशेषत ते कुठल्याही प्रकाशाचं अथवा कलाविष्काराचं असेल तर प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर अशी अनुभूतीची किमया करताना दिसेल. आरसा नसतो कधीच खोटी प्रतिमा दाखवत. होय, मुळात आरसा असतो वैश्विक पातळीवरचा श्रेष्ठ सत्यवादीच. या त्रिकालाबाधित सत्यवादी आरशात म्हणून कधीच नसतं बदलत समोरच्याच प्रतिबिंब जराही आणि कधीही. इथं जगातील कुठलेही निरागस बालक निरागसच दिसेल आणि कुपोषित बालकाचं कुपोषितच.
तसे सारे दिसतील आरशातल्या आपापल्या प्रतिमेत अडकलेले, पण तशातही आरसा आपसूक दिसतो कुण्या युवतीच्या पुढे आणि कैकदा गुणगुणताना, ‘सांग दर्पणा कशी मी दिसते, कशी मी दिसते?’
आपल्या इथं कुंकवाचं कोण महत्त्व. कुंकवाचा धनी गौरवात असतो कुण्या सवाष्णच्या डोळ्यात अनामिक भावात पाहताना ती आरशात. गरिबी असो वा गर्भश्रीमंती, झोपडी असो वा अलिशान बंगला, नाहीच होत साजश्रृंगार याच्या हव्याशा सोबतीशिवाय. याचे शेकडो अवतार. कधी दिसेल खांबाला लटकलेला, कधी दाढी करताना हातात, पण दिसतो खास विराजमान झालेला छानशा ड्रेसिंग टेबलवर आणि त्यातही शयनगृहात. याचा संचार सर्वत्र.
नाहीच कल्पना करवत तमाम नव्या-जुन्या हेअर कटिंग सलूनची याच्याशिवाय आणि आता तर त्याच्याच नवनवीन रूपात तो असतो चंद्रागत साक्षीला कुणी नववधूच्या रूपगर्विता रूपात अवतरताना. कधी खऱ्या लग्नमंडपात जाताना, कधी कुण्या शुटिंग लोकेशनवर तमाम अद्ययावत ब्युटी-पार्लर्समध्ये झगमगत्या प्रकाशात. आता याचं अस्तित्वच धरलं जातं गृहित लहान-मोठय़ा हॉटेल्स, फूडमॉलसमध्ये. तेथील वॉशिंग रूममध्ये, रेल्वे स्थानक, एअरपोर्ट आणि तेथील वेटिंग रूम्समध्ये. बुलेटसह साऱ्या धडधडणाऱ्या ट्रेन्स, सर्वच प्रकारच्या मोटारगाडय़ा आणि बाईक्स असतात बिनधोक धावतात याच्या जोरावर. केवळ रोजचे रस्त्यावरचे आणि रूळावरील वाचलेले जीव जरी ध्यानी घेतले, तरी आरशाची शब्दातीत महती समजावी. त्याचं मिनीरूप खुलवतं लेडिज पर्सेसना नि पुरुषांच्या शेविंग किटलाही. चंद्रावर जाण्याच्या तयारीत आपण असताना आजही कुठं झाडाखाली कुणी एकाग्र कुणाची दाढी करताना हा युगायुगाचा सोबती स्थितप्रज्ञ वृत्तीत असतो दाखवित कुणाला तुडूंब फेसात हरवल्या चेहऱ्याला.
युगानुयुगे, कालौघात आरसा दिसतो नेहमीच जोडलेला मानवी संस्कृतीशी, विविध वाङ्मयाशी आणि सिनेमा आदी कलाक्षेत्राशी अखंड. सहज आठवतो बाल रामाने चंद्रासाठी हट्ट केल्यावर तो पुरवताना चंद्राची प्रतिमा प्रतिबिंबीत झालेला आरसाच. त्याच्या हाती कल्पक राजमंत्र्याने देताना. चित्तोडची राणी पद्मिनीचं लावण्यमयी रूप आरशात पाहून अल्लाउद्दिन खिलजीच्या रूपात आलेल्या संकटाला त्या पराकोटीच्या आदर्श नारीने आपला स्त्रीधर्म जपताना दाखवलेले अतुलनीय धैर्य आणि केलेला जोहार. भारतीय इतिहासातील हा सुवर्णक्षणही असाच जोडला गेलाय एका आरशाशी यावच्चंद्रोदिवाकरो.
इंग्रजीतील अजरामर झालेली ‘मिरर मिरर ऑन द वॉल’ हा स्नो व्हाईट अ‍ॅण्ड सेवन ड्वार्फस्मधील असाच धमाल गीतातील आरसा आणि लॉर्ड टेनिसच्या लेडी ऑफ शालॉट या पोवाडय़ागत काव्यातला केंद्रस्थानी असलेला आणि शेवटी भंग पावलेला रहस्यमयी आरसा, असेच आठवत (की छळत) राहतात.
आपल्या हिंदी सिनेमातही आरशांनी लक्षणीय भूमिका केल्यात. त्यातही आठवतो अमर अकबर अ‍ॅन्थनीमधील आपल्याच आरशातील जखमी झालेल्या प्रतिमेवर मलमपट्टी करणारा अमिताभ. आठवतो कोहिनूरमध्ये आरशाच्या चौकटीत जीवन या नटाला त्याच्या आरशातील प्रतिबिंबाचा प्रत्ययकारी आभास देणारा दिलीपकुमार. नाहीच विसरता येणारा सहस्त्रावधी आरशांनी मंडित राजदरबारातील प्यार किया तो डरना क्या या गाण्यात अनारकली म्हणजे मधुबालेची प्रतिबिंबीत झालेल्या अगणित झगमगणाऱ्या प्रतिमा आणि सत्यम शिवम सुंदरममधील आरशातील आपल्या बेडौल प्रतिमेला पाहून संतापलेला शशी कपूर.
चेहऱ्याला मनाचा आरसा म्हणतात. सध्या जिकडे-तिकडे असले चेहरेच हरवून त्या जागी दिसू लागलेत मुखवटेच मुखवटे. खरंतर असा सत्वाचा आणि आत्मभानाचा आरसा हरवल्या माणसाला त्याचाच आतला आवाज ऐकू यावा म्हणताना ‘आईना मेरी पहलीसी सुरत मांगे’ पण आंतरिक आवाज जर बंद करून ठेवला असेल तर? तर आरसा बिचारा काय करणार होय ना?