Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विखे समर्थकांपैकी काही कर्डिलेंसाठी सक्रिय
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या आजच्या पारनेर तालुक्यातील

 

प्रचारदौऱ्यात खासदार बाळासाहेब विखे यांचे काही समर्थक सक्रिय झाले. पारनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, अळकुटीचे सरपंच नामदेव घोलप, दूध कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे आदी विखे समर्थक प्रचारात सहभागी झाले होते.
कर्डिले यांच्या प्रसिद्धी कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गोटातूनही त्यास दुजोरा देण्यात आला. असे असले, तरी विखे समर्थकांचे पारनेर तालुक्यात नेतृत्व करणारे माजी आमदार नंदकुमार झावरे मात्र प्रचारदौऱ्यापासून दूर होते. एका विखे समर्थक जि. प. सदस्याने प्रचारदौऱ्यात सहभागी होण्यास नकार दिल्याचे समजले.
कर्डिले आज पारनेरच्या प्रचारदौऱ्यावर होते. वडगाव आमली, दैठणे गुंजाळ, जामगाव, लोणी हवेली, वडझिरे, देवीभोयरे, लोणी मावळा, अळकुटी या गावांत त्यांच्या प्रचारसभा झाल्या. जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे, जिल्हा बँक संचालक उदय शेळके, ज्ञानदेव वाफारे, जिल्हाध्यक्ष दादा कळमकर आदी या सभांना उपस्थित होते.
खासदार विखे यांनी निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कर्डिलेविरोधी रोख स्पष्ट केला होता. त्यामुळे विखे मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांना काय सूचना देतात, याकडे जाणकारांचे लक्ष लागले होते. स्थानिक परिस्थिती, सोय-गैरसोय लक्षात घेऊन विखे समर्थक त्यांची भूमिका स्पष्ट करू लागले आहेत.
त्यातूनच पारनेर तालुक्यातील विखे समर्थक डॉ. शिरोळे, घोलप, डेरे आदींनी कर्डिले यांच्या प्रचारास सुरुवात केली. कर्डिले यांच्या यापूर्वीच्या पारनेरच्या दौऱ्यात हे समर्थक सहभागी नव्हते. विखे समर्थकांचे काही प्रमाणात तरी सहकार्य मिळू लागल्याने कर्डिलेंच्या प्रचारयंत्रणेचा उत्साह वाढल्याचा दावा केला जात आहे.