Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आम्ही जातीयवादी कसे? - जावडेकर
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

‘रामराज्य’ ही तर महात्मा गांधींची संकल्पना आहे. मग त्यातील रामाच्या मंदिराचा आग्रह धरला,

 

तर आम्ही जातीयवादी कसे ठरतो? असा युक्तिवाद भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी येथे केला.
पक्षाचे नगर मतदारसंघातील उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ आलेल्या जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना आज पक्षाची भूमिका विशद केली. सन १९८४ पासून काँग्रेसची लोकप्रियता ‘घटती’, तर भाजपची ‘चढती’ असून या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच विजयी होणार, असा दावा त्यांनी केला.
‘रामराज्य’ महात्मा गांधींजींनीच मांडले होते, असे सांगून जावडेकर म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकरांनीच समान नागरी संहितेची आवश्यकता घटनेत दिलेली आहे. घटनेतच ३७०वे कलम हे फक्त सुरुवातीची १० वर्षे असावे, असे म्हटले आहे व घटनेतच ‘गाय’ ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे साधन असल्याने गोपालन, गोसंरक्षण झाले पाहिजे हे नमूद केलेले आहे. याच गोष्टींचा आम्ही आग्रह धरत असतो, तर आम्ही जातीयवादी कसे काय होतो?’’
गुजरातमधील दंगलींवरून भाजपला, नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, तिस्ता सेटलवाड या समाजसेवी कार्यकर्तीच्या दबावाने, भडकावण्याने अनेकांनी खोटय़ा तक्रारी दाखल केल्या. या निकालावरून सेटलवाड यांच्यावर न्यायालयीन कारवाई करता येईल का, किमान तशी मागणी करता येईल का, यावर भाजप गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.
पंतप्रधानांची ‘दुर्बल पंतप्रधान’ अशा नेहमीच्या शब्दात संभावना करून जावडेकर म्हणाले, ‘‘भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे जाहीर चर्चेचे आव्हान ते स्वीकारत नाहीत. त्यांच्या ‘मॅडम’ही स्वीकारत नाहीत. ते स्वत ‘येस मॅडम’ पंतप्रधान आहेत. देशभरातील ६० ते ७० कोटी मतदार एकाच वेळी पाहू व ऐकू शकतील, अशी चर्चा करण्यास काँग्रेसवाले घाबरतात.’’
देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी हा विषयसुद्धा काँग्रेसने मतपेटीचा बनवला. आम इन्सान, किसान, जवान, नौजवान अशा सर्वच स्तरावर काँग्रेस अपयशी ठरली आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपकडे देशविकासाचा कार्यक्रम आहे. आर्थिक धोरण आहे. देशातील प्रत्येकाला घर हे भाजपचे धोरण आहे. त्यासाठी दर वर्षी १ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. ऐन निवडणुकीत काँग्रेसप्रणित संपुआ निर्बल, तर भाजपप्रणित रालोआ सबल झाली. त्यामुळेच आमचा विजय निश्चित आहे, असा दावा जावडेकर यांनी केला.
‘काँग्रेस आघाडी उमेदवाराची दहशत’
नगर मतदारसंघाच्या दौऱ्यात काही ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची दहशत जाणवली. अशा ठिकाणच्या मतदान केंद्रांची स्वतंत्र यादी तयार करून ती दिल्लीत निवडणूक आयोगाला सादर करू व तेथे विशेष पोलीस बंदोबस्ताची मागणी करू, असे जावडेकर यांनी सांगितले.