Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पाचपुते-नागवडेसमर्थकांची जगतापांकडून फोडाफोडी!
श्रीगोंदे, १५ एप्रिल/वार्ताहर

कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांनी भाजपत प्रवेश करताना आता

 

तालुक्यातील दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या वनमंत्री बबनराव पाचपुते व माजी आमदार शिवाजीराव नागवडे गटांनी जगताप यांची राजकीय नाकेबंदी सुरू केली. त्याकरिता आजपर्यंत सुप्त असणाऱ्या जगताप विरोधकांची मदत घेतली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या जगताप यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व उपाध्यक्ष राजीव राजळे यांना टांग मारताना अर्बन बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधींना जवळ करीत भाजपत प्रवेश केला. कर्डिलेंना आघाडीची उमेदवारी जाहीर होताच वनमंत्री पाचपुते यांचे कट्टर विरोधक नागवडे हे आदेशाची वाट न पाहता, पक्षनिष्ठा दाखवित पाचपुतेंच्या खांद्याला खांदा लावत प्रचारात सामील झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस व राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनीही कर्डिलेंसाठी उडी घेतली.
एरव्ही एकमेकांविरुद्ध कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या या नेत्यांनी कर्डिलेंसाठी एकी केल्याने सगळ्यांचे लक्ष जगतापांकडे लागले होते. आमदारकी लढविण्याच्या तयारीत असलेले जगताप जिल्हा बँक लक्षात ठेवून निर्णय घेतील, हे अपेक्षित होते. कर्डिलेंसाठी तालुक्यातील सगळे नेते एकत्र आल्यानंतर जगताप राजळे यांच्यासाठी तरी ‘नारळ’ हातात घेतील, ही अपेक्षा होती. मात्र, तालुक्यातील राजकारण्यांना चपराक देण्यासाठी थेट ‘कमळ’ हातात घेऊन ते कर्डिले-राजळे यांच्या विरोधात मैदानात उतरले.
पारनेर येथील गोपीनाथ मुंडे यांच्या सभेच्या वेळी त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्यासोबत विखेसमर्थक सुभाष डांगे यांनी भाजपला जवळ केले. कालही जगताप यांनी श्रीगोंद्यातील बैठकीत पाचपुते, नागवडे, भोस, शेलार समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश करवून दुसरा हादरा दिला. त्यामुळे हादरलेल्या नेत्यांनी आता जगताप यांच्या विरोधात मोर्चा उघडण्याचे संकेत दिले. त्यासाठी आता हे एकत्रित आलेले नेते जगताप यांच्या खच्चीकरणासाठी थेट आरोप करणार असल्याचे समजले. त्यातच भर जगताप सध्या पाचपुतेंना टार्गेट करताना नागवडेंचे मात्र कौतुक करीत आहेत. ही दुहेरी खेळी विरोधकांना घायाळ करणारी असल्याने आता जगताप यांच्या अंतर्गत विरोधकांना ताकद देण्यात येणार असल्याचे समजले. जगताप भाजपत येतेवेळी तालुकाध्यक्ष संतोष लगड, माजी अध्यक्ष राजेंद्र म्हस्के व दत्तात्रेय हिरनवाळे यांना पक्षाने विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे ते सध्या नाराज आहेत. त्यांचा उपयोग करून जगतापांना लक्ष्य करताना गांधींना फटका देण्याचा डाव विरोधक रंगवित असल्याची चर्चा आहे.