Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रमुख उमेदवारांच्या सौभाग्यवतीही प्रचाराच्या रणधुमाळीत!
नगर, १५ एप्रिल/प्रतिनिधी

नगर मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या चारही प्रमुख उमेदवारांच्या सौभाग्यवती

 

प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. या सौभाग्यवतींच्या प्रचाराची मर्यादा प्रचारफेऱ्यांपुरती मर्यादित असली, तरी त्यांनी आता महिला बचतगटांचे मेळावे घेण्यासही सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांची पत्नी अलकाबाई, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांची पत्नी सरोज, अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांची पत्नी मोनिका, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार तुकाराम गडाख यांची पत्नी लक्ष्मीबाई या चौघींनीही पतीच्या खांद्याला खांदा भिडवून प्रचारात उडी घेतली आहे.
श्रीमती अलका कर्डिले व श्रीमती लक्ष्मी गडाख या दोघींना परिवारात ‘अक्का’ या नावाने ओळखले जाते. त्यामुळे प्रचारात महिला कार्यकर्त्यां त्यांना त्याचं नावाने ओळखतात. श्रीमती सरोज गांधी या ‘भाभी’ नावाने, तर श्रीमती मोनिका राजळे ‘वहिनी’ या नावाने परिसरात व कार्यकर्त्यांत परिचित आहेत.
श्रीमती कर्डिले, श्रीमती गांधी व श्रीमती गडाख यांना मूळची किंवा माहेरी कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नाही. श्रीमती राजळे यांना मात्र आहे. त्या औरंगाबादचे माजी राज्यमंत्री व घृष्णेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक डोणगावकर यांच्या कन्या आहेत. श्रीमती कर्डिले यांना राजकीय पाश्र्वभूमी नसली, तरी त्यांच्या दोन्ही कन्या आजी-माजी महापौरांच्या पत्नी आहेत. श्रीमती शीतल या विद्यमान महापौर संग्राम जगताप यांच्या व श्रीमती सुवर्णा या माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी आहेत. या दोन्ही कन्या आईसमवेत प्रचारात असतात.
चौघाही उमेदवारांच्या सौभाग्यवतींनी प्रथम नगर शहरातून प्रचारास सुरुवात केली. आता त्या ग्रामीण भागात प्रचार करू लागल्या आहेत. त्यांच्यासमवेत महिला कार्यकर्त्यांचा जथ्था असतो. कार्यकर्त्यां घोषणा देतात, तर सौभाग्यवती हात जोडतात आणि मतदान करण्याचे आवाहन करतात. सौभाग्यवतींचा भर प्रचारफेऱ्या काढून पत्रके घरोघर पोहोच करण्यावर आहे. जाहीरसभांतून मात्र त्या उपस्थित नसतात.