Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

थकीत ‘पीएफ’बाबत सोमवारी नाशिकला चर्चा
राहुरी, १५ एप्रिल/वार्ताहर

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या २४ महिन्यांच्या थकित भविष्यनिर्वाह

 

निधीबाबत कारखान्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांना बोलवून सोमवारी (दि. २०) चर्चा करून प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही नाशिक भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक टी. के. सिंग यांनी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळास दिली.
कामगारांच्या शिष्टमंडळाने कृती समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब गावडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. कारखान्याच्या कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी २००६पासून थकित आहे. यातील काही रक्कम अधूनमधून भरली. कामगारांचे थकित भविष्यनिर्वाह निधीचे २४ हप्ते थकले असताना प्रशासनाकडून सर्व हप्ते भरल्याचे वृत्तपत्रांत मुलाखती देऊन भासविले जाते, याबाबत यावेळी लक्ष वेधण्यात आले. क्षेत्रीय प्रबंधक टी. के. सिंग व सहायक प्रबंधक आर. व्ही. शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेवरून येत्या दि. २०ला कारखान्याचे कार्यकारी संचालक वा जबाबदार अधिकारी यांना बोलवून हा प्रश्न कामगारांसमवेत मार्गी लावला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.