Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्थानिक नेत्यांवरच आठवले अवलंबून
लोकसभेची निवडणूक आठ दिवसांवर आली, तरी प्रचाराला अजून रंग भरला नाही. काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार रामदास आठवले अजून गावागावात पोहोचले नाही. त्यांच्या ‘दर्शना’ची आस मतदार व आघाडीच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. परिणामी आठवले प्रचारात मागे पडले असून, त्यांची मदार आमदार यशवंतराव गडाखांवर आहे. याउलट शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरेंनी प्रचारात आघाडी घेतली असून, मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांचा भर दिसतो. काँग्रेसचे बंडखोर प्रेमानंद रूपवते हेही तालुक्यात अजून फिरकले नाहीत.
पुनर्रचनेत कोपरगाव मतदारसंघाचे नामकरण ‘शिर्डी’ झाले. हा मतदारसंघही राखीव झाला. नगर मतदारसंघातून नेवासे तालुका वगळून शिर्डीला जोडला. तसेच विधानसभेसाठी तालुक्याचा स्वतंत्र मतदारसंघ झाला. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. आमदार यशवंतराव गडाख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे हा तालुका आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला.
शिर्डीतून आठवलेंना उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्यामुळे प्रचारात विस्कळितपणा आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आठवलेंसाठी

 

तालुक्यात सभा घेतल्या. काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांशी आठवलेंची ओळख नाही. मग त्यांचे काम करायचे कसे? काम केले, तरी शाबासकी मिळणार नाही, अशी भावनाही कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्थानिक नेत्यांसमोर कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचे मोठे आव्हान आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा ही आठवलेंना अडचणीचा ठरू शकला असता. मात्र, भुजबळ, पाटील व गडाख कुटुंबीयांच्या सभांमुळे वातावरण निवळण्यास सुरुवात झाली आहे. आमदार गडाख यांनी आठवलेंसाठी कंबर कसली आहे. नेवासे, भेंडे, कुकाणे गटातील जबाबदारी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग सांभाळत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अशोक गायकवाड व सादिक शिलेदार यांच्याकडे आठवलेंच्या प्रचाराचे नियोजन आहे.
सेनेचे उमेदवार वाकचौरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांची प्रचारयंत्रणा सेनेचे उपप्रमुख अनिल कराळे पाहत आहे. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना त्यांनी कामास लावले आहे. तालुकाध्यक्ष हरिभाऊ शेळके, रामदास गोल्हार, बाळासाहेब डहाळे, मुन्ना चक्रनारायण आदी कार्यकर्ते गटवार व गावोगाव प्रचारफेऱ्या काढत आहेत. याशिवाय भाजपचे कार्यकर्तेही एकदिलाने प्रचारात दिसतात. जि. प. सदस्य विठ्ठलराव लंघे, दिनकरराव ताके, लक्ष्मणराव खंडाळे जुन्या-नव्या कार्यकर्त्यांसह नेवासे तालुका पिंजून काढत आहेत. या पेरणीवरच विधानसभाजिंकण्याची तयारी भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत.
वाकचौरे हे स्थानिक उमेदवार आहेत. साईभक्तांशी त्यांचा जवळून संबंध आलेला. शिवाय लवकर उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला. तालुक्यातील प्रत्येक मोठय़ा गावांत त्यांच्या पदयात्रा व सभा झाल्या. ‘आपला माणूस आपल्यासाठी’ या वाक्याची प्रचारात मोठी मदत घेतली जात आहे. तिसरे उमेदवार रूपवते यांच्या प्रचारात कुठलेच नियोजन नाही. गावातील त्यांचे कार्यकर्ते प्रचारपत्रके वाटून प्रचारात रंग भरत आहेत. वाकचौरेंना दोन साखरसम्राटांच्या प्रचारयंत्रणेशी लढत देणे कठीण आहे. वाकचौरेंचे चिन्ह गावोगाव मतदारांना माहीत आहे. ते तरुणांचे आकर्षण, तर आठवलेंचे चिन्ह अद्यापि मतदारांपर्यंत पोहोचलेले नाही.
गुरूप्रसाद देशपांडे

सन २००४चे चित्र
राष्ट्रवादीच्या तुकाराम गडाख यांना ८९ हजार ३६८, तर भाजपच्या प्रा. ना. स. फरांदे यांना २९ हजार २४६ मते. गडाख यांना ६० हजारांचे मताधिक्य.

प्रमुख प्रश्न
ज्ञानेश्वर मंदिर विकास प्रकल्प प्रलंबित, प्रलंबित लघु औद्योगिक वसाहत, भंडारदरा धरणाचे हक्काचे ३ टक्के पाणी मिळविणे, जायकवाडी धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न.