Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भोसे खिंड, तुकाई चारीसाठी गांधींना संधी द्यावी - खडसे
मिरजगाव, १५ एप्रिल/वार्ताहर

युतीच्या राजवटीतच कर्जतला कुकडीचे पाणी मिळाले. मी पाटपंधारे मंत्री असताना भोसे खिंडीच्या

 

कामाला मंजुरी दिली. तुकाई चारीचे सर्वेक्षणही आमच्या काळात सुरू होते. परंतु आमचे सरकार सत्तेवरून गेले आणि गेली १० वर्षे ही सर्व कामे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंडळींनी रखडवत ठेवली. ती मार्गी लावण्यासाठी भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनाच मते देण्याचे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे आयोजित सभेत केले.
भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष शांतिलाल कोपनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस कैलास शेवाळे, सुभाष डांगे, बापूसाहेब गुंड, अल्लाउद्दीन काझी, अभय आगरकर, सदाशिव देवगावकर, प्रा. राम शिंदे, संजय जंजीरे, अमृत लिंगडे, ‘कुकडी’चे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप, प्रकाश शेंडगे, दत्ता वारे, राजेंद्र गुंड आदी उपस्थत होते. आमदार सदाशिव लोखंडे मात्र अनुपस्थित होते. उपस्थितांमध्ये त्याबाबत चर्चा होती. डॉ. रमेश झरकर यांनी प्रास्ताविक केले.
श्री. खडसे यांनी भाषणात गेल्या ५ वर्षांत केंद्रातील आघाडी सरकारमुळे देश चिंताग्रस्त झाल्याची टीका केली. देशाच्या सुरक्षेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीला काहीच देणे-घेणे नाही. देशात, राज्यात शेतकरी आत्महत्या करतात. परंतु केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ते कळत नाही काय? उलट पवारांचा जास्त वेळ क्रिकेटमध्येच जात आहे. मोफत वीज देऊ, असे सांगून सुशीलकुमार शिंदे व विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची फसवणूकच केली, असे ते म्हणाले.
गुजरातेत एक मिनिटही वीज जात नाही. तेथे शेतकरी आत्महत्या करीत नाहीत. शेतकरी चारचाकी गाडीत फिरतात. मोदींनी केलेल्या विकासाचे हे फलित आहे. तेच मोदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोपेतही दिसत आहेत, अशी खिल्ली त्यांनी उडविली.
जगताप यांनी भाषणात, या भागात मावशीचे राजकारण करून लबाडांनी २५ वर्षे नेतृत्व केले. वरून कीर्तन आतून तमाशा करीत लोकांना फसविले, असा आरोप केला. तर गांधी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची मंडळी महात्मा गांधींचे नाव घेतल्याशिवाय जेवत नाहीत. त्यांना दिलीप गांधीच का चालत नाही, असा सवाल केला.