Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पूजेला बंदी, छबीही नाही..!
मतदान करतानाचे छायाचित्र घेण्यास निवडणूक आयोगाने बंदी केल्याने आता लोकसभा निवडणुकीतील उमेदवार व प्रमुख नेत्यांच्या मतदान करतानाची छबी वृत्तपत्रातून झळकणार नाही आणि छोटय़ा पडद्यावरही उमेदवाराची मतदानाची हास्यमुद्रा दिसणार नाही!
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सन १९९१ची गडाख-विखे निवडणूक व त्यावर गुदरलेला

 

खटला या पाश्र्वभूमीवरच देशात निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर पालनाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीगणिक ही आचारसंहिता अधिकाधिक कडक होऊ लागली आहे. याही वेळी निवडणूक आयोगाने आचारसंहिता, तसेच निवडणूक प्रशासनात अनेक बदल केले. त्यातील काही उमेदवार व मतदारांशीही थेट संबंधित आहेत.
विधानसभा व लोकसभा निवडणुकांत पूर्वी मतपेटय़ांची पूजा क रून पहिले मतदान गावातील अथवा मतदानकेंद्राच्या प्रभागातील प्रतिष्ठीत व्यक्ती करीत असे. मतपेटय़ा जाऊन मतदानयंत्रे आली. परंतु त्याचीही पूजा करण्याचा प्रकार पुढेही सुरूच राहिला. हार-फुले, गुलाल-बुक्का वाहिला जाई, उदबत्त्यांचे औक्षण होई. साग्रसंगीत पूजेने विजयाचा कौल मागितला जाई. त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध होत. या सर्व गोष्टी आता दिसणार नाहीत. निवडणूक आयोगाने मतदानयंत्राची पूजा करण्यास बंदी घातली आहे. आयोगाने मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण दिले. त्यावेळी कुणालाही मतदानयंत्राची पूजा क रू देऊ नये, असे आदेश देण्यात आले. मतदानयंत्राची पूजा करण्यात आली, तर केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयोगाने दिला.
अनेक प्रभावशाली नेते, प्रमुख उमेदवार हे मतदान करताना छायाचित्र काढतात. वृत्तपत्रांचे छायाचित्रकार, विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी, तसेच खासगी छायाचित्रकार हे छायाचित्रं काढतात. प्रमुख उमेदवार, त्याचे कुटुंबीय प्रामुख्याने सपत्नीक मतदान अशी छायाचित्रे वर्तमानपत्रांमध्ये वर्षांनुवर्षे प्रसिद्ध होत आहेत. पंतप्रधानांपासून विविध पक्षांचे प्रमुख, स्थानिक पातळीवरील उमेदवारांसह नट-नटय़ा, उद्योगपती अशा ‘सेलिब्रेटी’ व्यक्तींचीही मतदान करतानाची छबी प्रसिद्ध होत असे. त्यासाठी अशा व्यक्तींचे मतदानकेंद्र आधीच हुडकून काढले जाई. अलीकडे वाहिन्यांमुळे त्याचे चित्रीकरणही होऊ लागले. त्यामुळेच मतदानाची गोपनीयता नष्ट होते, तसेच प्रक्रियेत बाधा येते असे निष्कर्ष पुढे आले. त्यामुळे आता आयोगाने छायाचित्रणासच बंदी घातली.
नेता अथवा कार्यकर्त्यांने मतदान करताना छायाचित्रं काढले व त्याची माहिती आयोगाला मिळाली किंवा छायाचित्र, वृत्तपत्रे, वाहिन्यांवरून प्रसिद्ध झाली, तर आता केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांवर आयोग कारवाईचा आसूड उगारणार आहे. आयोगाचे आदेश न पाळणाऱ्या मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही आयोग गदा आणणार आहे.
बित्तंबाज