Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

.. जरा विसावू या वळणावर
सदोबाला पुन्हा अल्पकालीन स्मृतिभ्रंशाचा झटका आला. त्यावेळी तो खारेकर्जुने गावात पोहोचला

 

होता. सभेच्या व्यासपीठावरील खेळीमेळीचे वातावरण पाहूनच तो पुन्हा ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस्ड’चा शिकार झाला.
‘उमेदवारा’ने भाषणात प्रामुख्याने ‘पाटलां’चेच गुणगाण गायिले. कारखानाही त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्रगतीकडे वाटचाल करीत आहे हे सांगण्यासही ‘उमेदवार’ विसरला नाही.
‘भल्या माणसांनो,’ अशी सुरुवात करून ‘पाटलां’नीही ‘उमेदवारा’चे भरपूर कौतुक केले. झालं-गेलं विसरून तालुक्याच्या भवितव्यासाठी आपल्या ‘उमेदवारा’ला मोठे मताधिक्य तालुक्यातून द्यावे लागेल हे त्यांनी खास ‘केके’ (रेंज नव्हे) शैलीत ठासून सांगितले. ‘पाटलां’चे भाषण संपते नाही तोच सदोबा ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस्ड’ झाला. त्याच्या डोळ्यासमोर एकेक जुना प्रसंग तरळू लागला..
सदोबाला इमामपूरच्या घाटातील मारामारी आठवली. मार्केट कमिटीच्या निवडणुकीत झालेल्या या मारामारीत अनेकांची डोकी फुटली. त्या प्रत्येकाचा चेहरा आठवू लागला. येथेच ‘उमेदवारा’चा राजकीय उदय झाला.
‘पाटील’ पहिल्यांदा दिल्लीला गेले म्हणून १९९५मध्ये ‘उमेदवार’ प्रथम मुंबईला जाऊ शकला. पुढे हॅटट्रीक झाली. ‘उमेदवारा’ची ती पहिली निवडणूक सदोबाला आठवली.
सन २००२ आणि १९९७ अशा जिल्हा बँकेच्या दोन्ही निवडणुका सदोबाच्या डोळ्यासमोरून जाईनात. सन २००२मध्ये तहसील कार्यालयासमोर आणि ९७मध्ये सहकार सभागृहासमोर झालेल्या दगडफेकीने त्याच्या अंगावर शहारे आले. त्यावेळी तर ‘भाऊ’सुद्धा ‘पाटलां’बरोबरच होते हेही सदोबाला आठवले.
पुढे २००४मध्ये तर विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत तर ‘पाटील’ आणि ‘उमेदवार’ परस्परांचे प्रतिस्पर्धीच होते. अर्थात ‘पाटील’ रिंगणात होते म्हणूनच त्या वेळी ‘उमेदवारा’चे मताधिक्य विक्रमी ठरले, मुंबई गाठता आली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची २००७मधील निवडणूक तर अगदीच ताजी. त्या निवडणुकीच्या स्मृती सदोबाच्या भोवती फेर धरूनच नाचत होत्या.‘उमेदवारा’ची जिरवण्यासाठी ‘पाटलां’नी नगर शहरातील जुन्याच ‘भावा’शी उघडच युती केली. पूर्वी ती छुपी होती. या ‘भावा’च्याच मदतीने ‘पाटलां’नी बऱ्याच वर्षांनी तालुक्यात झेंडा फडकावल्याचे चित्र सदोबाच्या डोळ्यासमोर उभे राहिले.
टाळ्यांच्या कडकडाटामुळे ‘मेमरी लॉस्ड’चा ‘शॉर्ट टर्म’ झटका ओसरल्याने सदोबा भानावर आला तेव्हा ‘पाटील’, ‘उमेदवार’ व ‘भाऊ’ एकाच मोटारीतून पुढच्या गावात सभेला निघाले होते, त्याचवेळी शेजारच्या हॉटेलमध्ये गाणं लागलं होतं
भले बुरे ते घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर,
जरा विसावू या वळणावर..
चतुर