Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भीतीपोटीच विविध पक्षांचा आपणास नकार - राजळे
निघोज, १५ एप्रिल/वार्ताहर
राजळे खासदार झाल्यास इतर नेत्यांना नेस्तनाबूत होण्याची भीती वाटते. त्यामुळेच विविध पक्षांनी

 

आपल्या उमेदवारीस नकार दिल्याची टीका नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांनी येथे प्रचारसभेत बोलताना केली.
सरपंच गीताराम कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस माजी सभापती गंगाराम बेलकर, हारूण तांबोळी, उपसरपंच भरत रसाळ, ठकाराम गायखे, रामदास कवडे, राजेंद्र सालके, संजय लामखडे, शिवबा ग्रुपचे अध्यक्ष अनिल शेटे, अशोक शेळके आदी उपस्थित होते. श्री. राजळे म्हणाले की, दहा वर्षे राजकारण करताना विकासाभिमुख कामांसाठी आपण पुढाकार घेतला, म्हणूनच जनतेत लोकप्रिय ठरलो. राजळे खासदार झाल्यास जिल्ह्य़ाचे नेतृत्व त्यांच्याकडे जाईल, आपले काहीच चालणार नाही, ही भीती पुढाऱ्यांना होती. त्यामुळेच पक्षाची उमेदवारी मिळण्यास आपणास मोठा विरोध झाला. या नेत्यांनी पक्षावर दडपण आणले, म्हणून उमेदवारी मिळाली नाही. जनतेतून मात्र मोठा आग्रह झाल्यामुळेच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलो आहोत.
लोकसभेत जाणाऱ्याचे इंग्रजी, हिंदी भाषांवर प्रभुत्व पाहिजे. दिल्लीत जाऊन मराठी बोलले, तर तेथील जनतेला काय कळणार, याचा विचार केला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याकडे विद्वत्ता आहे. थोरात, राजळे घराण्यांचा वारसा आहे. नगर जिल्हा मागास म्हणून संबोधला जातो. उद्योगधंदे नाहीत की मोठे प्रकल्प नाहीत. सुशिक्षित बेरोजगारी हटविण्यासाठी कोणतेही पर्याय निर्माण केले नाहीत. यात आमूलाग्र बदल झाला पाहिजे. पाटपाण्याचे प्रश्न कायम आहेत. ते सोडविण्यासाठी अभ्यासू लोकप्रतिनिधींची गरज आहे. मात्र, दंडेलशाही करणाऱ्यांना उमेदवारी दिली गेली. उमेदवारी मिळताच एकमेकांची डोकी फोडण्यास ते तयार झाले. मात्र, अशा प्रकारे दहशत निर्माण करून विकास होणार नाही. त्यासाठी सुसंस्कृतपणा, विद्वत्ता आवश्यक आहे. त्यामुळेच उमेदवारीचा निर्णय घेतला. त्याची धास्ती घेऊन शरद पवार यांनी मतदारसंघात जास्त सभा घेतल्या. मंत्रीही सभा घेत आहेत. आपणासोबत मंत्रीच काय, आमदारही नाही. सर्वसामान्य मतदार बरोबर असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.
माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी राजळे यांच्या कार्याची माहिती दिली. कवडे, तांबोळी, शेळके, सालके आदींची भाषणे झाली.
दोन सभांची तुलना!
सहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सभा झाली. त्या तुलनेत राजळेंच्या सभेला चांगली गर्दी होती. उपस्थितांत याची चर्चा होती. राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्यांना सभेस अत्यल्प उपस्थितीबद्दल भुजबळ यांनी कसे फटकारले, याचीही चर्चा या निमित्ताने होत होती.