Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

.. तर आठवलेंनी पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी झटावे - पिचड
राजूर, १५ एप्रिल/वार्ताहर

‘युपीए’ला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी आठवलेंनी पुढाकार

 

घ्यावा, असे आवाहन आमदार मधुकरराव पिचड यांनी केले.
येथील बाजारपेठेत आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ‘युपीए’चे उमेदवार रामदास आठवले यांच्या प्रचारसभेत श्री. पिचड बोलत होते. यावेळी सर्वश्री. सीताराम गायकर, सोन्याबापू वाकचौरे, शिवाजी धुमाळ, यमाजी लहामटे, कैलास वाकचौरे, वसंत मतकर, काशिनाथ साबळे, गिरजाजी जाधव, जाईबाई ठोकळ आदी उपस्थित होते. पिचड मतदारांना आवाहन करताना म्हणाले की, आठवले यांना खासदार म्हणून नव्हे, तर केंद्रीय मंत्री समजून निवडून द्यावे. ते अन्यायाविरोधात लढणारे नेते आहेत. मराठा आरक्षणालाही त्यांचा विरोध नाही. ते आर्थिक निकषावर दिले जावे, अशीच त्यांची मागणी आहे, असेही पिचड म्हणाले. आठवले म्हणाले की, भारतीय राज्य घटना सर्वाना एकत्र बांधणारी आहे. मात्र, त्याला छेद देण्याचे काम भाजप-शिवसेना युती करीत आहे. त्यामुळे त्यांना रोखले पाहिजे. आंबेडकरांनी दलितांनाच नव्हे, तर सर्वाना न्याय मिळावा, यासाठी चळवळ उभी केली. त्यांचेच काम आम्ही पुढे नेत आहोत. आरपीआयचे तालुक्यातील नेते राष्ट्रवादीबरोबर यापूर्वी कसे वागले हे विसरून जावे. यापुढे ते तसे करणार नाहीत. विधानसभेत पिचड पिता-पुत्रांच्यामागे खंबीरपणे उभे राहतील. निवडून आल्यास तोलार खिंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याची जबाबदारी घेतो, असे आश्वासन आठवले यांनी दिले.
धुमाळांना कानपिचक्या
शिवाजी धुमाळ यांना कानपिचक्या देताना रामदास आठवले म्हणाले की, तुम्ही शिवसेनेत गेलात. मात्र, तुम्हाला तिकडे काहीच मिळाले नाही. आता आमदार पिचड यांच्याबरोबर एकनिष्ठ रहा, म्हणजे ‘अमृतसागर’चे अध्यक्षपद अबाधीत राहील. यानंतर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.