Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
व्यापार - उद्योग

वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये २३ एप्रिलपासून फायबर्स अ‍ॅण्ड यार्न प्रदर्शन
व्यापार प्रतिनिधी: टेकोया इन्फोटेक या टेकोया ट्रेंड ग्रुपचा एक भाग असलेल्या कंपनीने फायबर्स आणि यार्न या विषयावर विशेष प्रदर्शन आयोजित केलेले आहे. हे चौथे फायबर्स अ‍ॅण्ड यार्न २००९ प्रदर्शन २३ ते २५ एप्रिल २००९ या कालावधीत मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनाच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या हंगामासाठी उद्योग उत्पादन विषयक कार्यक्रमांची योजना आखतानाच हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे आणि फायबर्स अ‍ॅण्ड यार्न प्रदर्शनामुळे या उद्योगांना केवळ यार्न बघायलाच मिळणार असे नाही तर प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या यार्न अ‍ॅण्ड फायबरच्या वस्त्रांचे नमुनेही पाहायला मिळतील. परिणामी यार्नचे सोर्सिग करणे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी सोपे होईल, तसेच आपल्या गरजा ते थेट उत्पादकांकडून पूर्ण करू शकतील.

‘कॉस्ट ऑडिट’वर तज्ज्ञ समितीच्या शिफारसी सरकारला सादर
व्यापार प्रतिनिधी:
कॉस्ट रेकॉर्डस् रुल्स व कॉस्ट ऑडिट यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे कॉस्ट अॅडव्हायझर बी. बी. गोयल यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ज्ञ समिती (एक्स्पर्ट ग्रुप) जानेवारी २००८ मध्ये स्थापन केली. या ग्रुपने देशातील विविध संबंधितांशी चर्चा करून आपला अहवाल मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांना नुकताच सादर केला. या अहवालामध्ये ग्रुपने ३९ शिफारसी सादर केल्या असून यामध्ये प्रामुख्याने फॉरमॅट बेस कॉस्ट ऑडिटपेक्षा प्रीन्सिपल बेस कॉस्ट ऑडिट करण्यावर जास्त भर दिला आहे. एक्स्पर्ट ग्रुपचे शिफारसीमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव आहे.

‘ओरिएंट ब्लॅकस्वान’कडून ‘गट्टू टेल्स’ मालिकेतील तिसरा संच
व्यापार प्रतिनिधी:
ओरिएंट ब्लॅकस्वान या अग्रेसर प्रकाशन संस्थेने बुकबॉक्स आणि स्टार प्लस वाहिनीच्या सहकार्याने ‘गट्टू टेल्स’ या अॅनिमेटेड सीडी/व्हीसीडीसह उपलब्ध होणाऱ्या पाच स्टोरी बुक्सच्या संचातील तिसरा स्टोरीटेलर संच अलीकडेच समारंभपूर्वक सादर केला. या संचात अॅनिमेटेड सीडी/व्हीसीडी, गेम्स, प्रिंट व पेंट कलरिंग बुक्स आणि अॅनिमेटेड स्टोरी बुक्सचा समावेश आहे. या संचातील प्रत्येक पुस्तक वेगवेगळेही मिळू शकते. स्टोरीटेलर्स ही मुलांची करमणूक करणारी आणि गमतीने त्यांना शिकवणूक देणारी गोष्टींची एक नाविन्यपूर्ण मालिका आहे. या गोष्टींमधील मुख्य नायक गट्टू हे स्टार प्लस वाहिनीवरील ‘बा, बहू और बेबी’ या मालिकेतील पात्रावर आधारीत आहे.

मतदारांच्या जागृतीसाठी इनसाइड डिजिटलचे नवे संकेतस्थळ
व्यापार प्रतिनिधी:
भारतातील पहिल्या शैक्षणिक वेब-वाहिनीचे प्रणेते असलेल्या इनसाइट डिजिटलने, कार्टून्स, कोडी, जादूचे खेळ आणि मोबाइल डिस्प्ले यांच्या माध्यमातून येत्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ‘इंडियाव्होटिंग डॉट कॉम’ नावाचे नवीन वेबस्थळ सुरू केले आहे. अनेक कंपन्यांनी सामाजिक दायित्वाची भावना म्हणून, तसेच अनेक एनजीओंनी सामान्यजनांना मतदानाचा अधिकार बजावण्याचा आवाहन करताना वेब माध्यमाचा वापर केला आहे. पण ‘इंडियाव्होटिंग’ ही साइट सुरू झाल्यापासून तीन आठवडय़ात एक लाखांहून अधिक लोकांना तिला भेट दिली. यावरून ही साइट नेटकरांची भूक शमवू शकेल अशा माहितीची मोठी खाण आहे याचाच प्रत्यय देते, असे इनसाइट डिजिटलचे व्यवस्थापकीय संचालक अमित त्रिपाठी यांनी सांगितले. ‘इंडियाव्होटिंग’ने या निमित्ताने ‘व्होटयात्रे’चेही आयोजन केले असून, देशभर १,५०० किलोमीटरचा प्रवास करून १५० मतदारसंघांतील १० लाखाहून अधिक मतदारापर्यंत पदपथावरील ५०० हून अधिक शोचे या यात्रेदरम्यान आयोजन केले जाणार आहे.

‘हिप्पो’च्या नव्या हाय-पॉवर बाइक्स
व्यापार प्रतिनिधी:
‘हिप्पो’ या ब्रॅण्ड नावाने रोडस्टार, स्पोर्ट्स, रेसिंग तसेच भारतातील पहिली क्रुझर बाइसिकल्स प्रस्तुत करणाऱ्या रवी इंडस्ट्रीजने आपल्या नव्या प्रीमियम श्रेणीतील ‘हिप्पो २००९’ मॉडेल्स प्रस्तुत केल्या आहेत. यात २१ स्पीडच्या दुहेरी सस्पेंशन अॅरो स्पोर्ट्स मॉडेल, बिग बॉस आरएस सस्पेंशन बाइक, स्प्राइट लेडी प्रीमियम रिअर सस्पेंशन एक्स्ट्रा कम्फर्ट लेडीज मॉडेल्स तसेच एक्स्ट्रीम किड्स मॉडेल्सचा समावेश आहे. महाजन समूहातील रवी इंडस्ट्रीज या कंपनीने २००५-०६ सालात ‘हिप्पो’ हाय-पॉवर बाइक्स बाजारात आणल्या होत्या. तीन वर्षांच्या अल्प कालावधीत हा भारतातील बाइसिकल्सचा आघाडीचा ब्रॅण्ड बनला आहे. सध्याच्या घडीला हिप्पो श्रेणीत कंपनीने ८० विविध मॉडेल्स बाजारात आणल्या आहेत. कंपनीने महाराष्ट्रासह सात राज्यात ५०० हून अधिक डीलर्सचे जाळे विणले आहे.

सवलतीच्या गृह कर्जदराला स्टेट बँकेकडून मुदतवाढ
व्यापार प्रतिनिधी:
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने डबघाईला आलेल्या वाहन उद्योग आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी २००९ मध्ये आपल्या व्याजाच्या दरांमध्ये घसघशीत कपात केली होती. गृहकर्जासाठी पहिल्या वर्षांसाठी व्याजाचे दर सरसकट आठ टक्के तर वाहन कर्जासाठी सरसकट १० टक्के दरांचा लाभ घेण्यासाठी स्टेट बँकेने यापूर्वी जाहीर केलेली ३० एप्रिल २००९ ही मुदत आता ३० सप्टेंबर २००९ पर्यंत वाढविली गेली आहे. म्हणजे सप्टेंबर २००९ पर्यंत गृहकर्ज आणि वाहन कर्जासाठी अर्ज करणाऱ्या आणि कर्जाला मंजुरी मिळविणाऱ्या ग्राहकांना अनुक्रमे आठ आणि १० टक्के या सवलतीच्या व्याजदराचा लाभ मिळेल. या योजनेत सध्याच्या अन्य बँकांच्या गृहकर्जदारांनाही सहभागी होता येईल. लोकांकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता या सवलतीतील व्याजदरांच्या योजनेला मुदतवाढ दिली गेली असल्याचे बँकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडांना मानाचे पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी:
भांडवली बाजारात दीर्घ काळ सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या आव्हानात्मक काळातही सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंड हाऊसेसपैकी एक सर्वश्रेष्ठ म्हणून ‘इक्विटी म्युच्युअल फंड हाऊस ऑफ द इयर २००८’ सह, इक्विटी आणि बॅलन्स्ड फंड प्रकारात अनेक मानाचे पुरस्कार डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने पटकावले आहेत. सीएनबीसी टीव्ही १८- क्रिसिलसह, लिपर, इक्रा आणि मॉर्निगस्टार या प्रतिष्ठित संस्थांच्या पुरस्कारांचा यात समावेश आहे. अलीकडेच पार पडलेल्या ‘सीएनबीसी टीव्ही १८-क्रिसिल’ पुरस्कारांनुरूप लार्ज कॅप इक्विटी प्रकारातील २६ फंडांपैकी ‘डीएसपी ब्लॅकरॉक टॉप १०० इक्विटी फंड’ सर्वश्रेष्ठ ठरला; एक आणि पाच वर्षांच्या कामगिरीसाठी ‘कन्सिस्टंट सीपीआर परफॉर्मर इक्विटी’ प्रकारातील अनुक्रमे २२ योजनांमध्ये ‘डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी फंड’, तर ११ योजनांमध्ये डीएसपी ब्लॅकरॉक बॅलन्स्ड फंड अव्वल ठरला; बॅलन्स्ड प्रकारातील १६ पात्र योजनांमध्येही ‘डीएसपी ब्लॅकरॉक बॅलन्स्ड फंड’ अव्वल ठरला आहे. त्या आधी इक्रा म्युच्युअल फंड्स अॅवार्ड्स सोहळ्यात डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी व बॅलन्स्ड योजनांनी पुरस्कार पटकावले आहेत.

‘आरसीएफ’चा वायू पुरवठा व वहनासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजशी सामंजस्य करार
व्यापार प्रतिनिधी:
खतनिर्मिती क्षेत्रातील मुंबईतील अग्रेसर कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ)ने वायू पुरवठा आणि वायू वाहतुकीसाठी अनुक्रमे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. आणि रिलायन्स गॅस ट्रान्स्पोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केला आहे. रिलायन्सने नव्यानेच उत्पादन सुरू केलेल्या केजी बेसिन या वायूनिर्मिती केंद्रापासून आरसीएफच्या तुर्भे आणि थल येथील उत्पादन प्रकल्पापर्यंत हा वायू आणला जाणार आहे. वायू पुरवठा सुरळित झाल्याने आरसीएफच्या तुर्भे येथील बंद पडलेला युरिया निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू होऊन, दरसाल ३.३० लाख टन युरियाचे उत्पादन घेतले जाईल. तर थल येथील युरिया प्रकल्पात महागडय़ा नाफ्थाऐवजी गॅसचा वापर झाल्याने उत्पादनखर्चात मोठी कपात होईल.

मुसळुणकर ज्वेलर्सचा ‘विवाह उत्सव’
व्यापार प्रतिनिधी:
लग्नसराईचा उत्सव रंगलाय, शुभ मुहूर्त दणक्यात साजरे होऊ लागले आहेत, दागिन्यांपासून कपडय़ांपर्यंत खरेदीसाठी झुबंड उडालीय, परंपरा व नवता यांना दिलखुलास प्रतिसाद मिळतोय आणि अशातच विलेपार्ले (पूर्व) येथील व्ही. एम. मुसळुणकर ज्वेलर्सनी विवाह उत्सवाची घोषणा केलीय. या खास ‘विवाह उत्सव’ खरेदी योजनेनुसार व्ही. एम. मुसळुणकर ज्वेलर्स, विलेपार्ले (पूर्व) यांच्या पेढीवर २७ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत सोने व हिरे यांच्या मजुरीवर १५ टक्के सवलत देण्यात येत आहे इतकेच नव्हे तर चार हजार व त्यापेक्षा जास्त खरेदीवर भाग्यवान सोडत काढण्यात येणार असून, त्यातील पहिल्या तीन ‘भाग्यवान विजेत्यां’ना मसूरीची मोफत सहल लाभणार आहे. नवीन पिढीची सोन्यातील विविधता, नक्षीकाम यातील आवड-निवड लक्षात घेऊन व्ही. एम. मुसळुणकर यांनी नावीन्यपूर्ण नक्षीकामाकडे विशेष लक्ष दिले आहे.

महाराष्ट्र चेंबरतर्फे करिअरविषयक कार्यशाळा
व्यापार प्रतिनिधी:
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरतर्फे २१ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत ‘१० वी आणि १२ वीनंतर करिअरच्या वाटा’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात ओल आहे. यात ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम, इव्हेंट मॅनेजमेन्ट, ज्वेलरी आणि फॅशन डिझायनिंग, फोटोग्राफी आणि व्हीडिओ शुटिंग, आय.टी. आणि काँम्प्युटर कोर्सेस आदींबाबत मार्गर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी रेवती खरे यांच्याशी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर, सहावा मजला, ओरिकॉन हाऊस, १२ के. दुभाष मार्ग, काळा घोडाजवळ, फोर्ट येथे संपर्क साधता येईल.