Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
अग्रलेख

प्रश्नचिन्हांकित फेरी!

या खेपेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सामान्य माणसाचे प्रश्नच जणू बेपत्ता असावेत, असे वातावरण असल्याने लोकसभेच्या ज्या १२४ मतदारसंघांत आज मतदान पार पडणार आहे, तिथे मतदारांचा कल कसा असेल ते सांगता येणे अवघड आहे. १५ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश यांच्यात ही पहिली फेरी पार पडणार आहे. ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या विधानसभेसाठीही आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आजच्या मतदानात विदर्भातले १० लोकसभा मतदारसंघ

 

आणि मराठवाडय़ातले तीन मतदारसंघ आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या ज्या भागात घडल्या, त्या भागातल्या प्रचारामध्ये या शेतकऱ्यांच्या हिताचा एकही मुद्दा उपस्थित केला गेला नाही. काँग्रेस आघाडीचे नेते तर एवढे निगरगट्ट की त्यांनी शेतकरी वर्ग सुखात असल्याचा आभासही निर्माण केला. कर्जमाफीनंतर बापजादे स्वर्गवासी झाले, त्याचा या शेतकऱ्याला विसर पडेल, असे वाटून त्याविषयी बोलायचेच बहुतेकांनी टाळले. विजेचे, पिण्याच्या पाण्याचे, सिंचनाचे, प्रदूषणाचे, कुपोषणाचे सर्व प्रश्न त्यांच्या दृष्टीने संपलेच होते. महाविद्यालयाच्या निवडणुकांमध्ये टारगट तरुण मुले एकमेकांच्या उखाळय़ापाखाळय़ा काढत ज्याप्रमाणे आपापल्या उमेदवारांचा प्रचार करतात, जवळपास तसाच प्रचार या मंडळींकडून चालू होता. हे तर आमच्या उद्याच्या लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी. आपल्या उमेदवाराचा प्रचार करून घसा कोरडा करणारे त्याच्यावर उतारा उमेदवाराच्याच खर्चाने रात्री शोधतात. महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला कोणत्याच प्रश्नांचे समजा, सोयरसुतक नाही, पण जे त्यांच्या विरोधात प्रचार करणारे आहेत, त्यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले, असे विचारले तर त्याचेही उत्तर नकारात्मक द्यावे लागते. त्यांनाही जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे सोयरसुतक नाही. मृतवत झालेले प्रश्न पुन:पुन्हा चिवडत बसण्याखेरीज हिंदुत्ववादी पक्षांना दुसरा उद्योगच नाही. त्यांच्यापैकी कुणी आर्थिक प्रश्नावर, विजेच्या प्रश्नावर अतिशय उत्तम भाषणे केली, असे अजिबातच दिसले नाही. या राज्यात खैरलांजीसारखे भीषण हत्याकांड घडले, पण त्याचा उल्लेखही टाळण्यात आला. ग्रामीण भागात १७-१८ तास वीज नसणे हे प्रागतिक म्हणवणाऱ्या राज्याचे लांछन आहे, पण त्याचीही कुणाला लाज नाही. हा प्रश्न उपस्थित केला, तर ‘एन्रॉन’चा सर्वाधिक घोळ कुणी घातला, असा प्रश्न उलट टोलवला जाईल, ही काँग्रेसविरोधकांना वाटणारी भीती आहे. स्वाभाविकच कुणाचा पाय किती खोलात आहे, यावरच चर्चा अधिक झाली. विदर्भात दहा लोकसभा मतदारसंघांत उभ्या असणाऱ्या सर्व कोटय़धीश उमेदवारांची संपत्ती एकत्रितरीत्या मोजली तर ती हजार कोटी रुपयांच्याही वर जाते. गेल्या निवडणुकीत ज्यांची ५० कोटींवर संपत्ती होती, त्यांची ती आता शंभर कोटींवर कशी गेली, हा मतदारांना पडलेला प्रश्न प्राप्तिकर खात्याने सोडवायला हवा. हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे उमेदवार लक्षाधीश असतील, पण ते तरी खरे का, असे मतदाराला वाटावे, अशी स्थिती आहे. या निवडणुकीत ज्यांनी आपली धनसंपत्ती, बलसंपत्ती पणाला लावायचे ठरवले, त्यांना कोणत्याच प्रश्नाचे गांभीर्य नाही. पंचतारांकित हॉटेलांच्या आठ-दहा खोल्या एकेका उमेदवाराने राखून ठेवल्या, या पलीकडे त्यांचे कर्तृत्व काय? प्रत्येक उमेदवाराच्या प्रचार कार्यालयासमोर २००-२५० गाडय़ा उभ्या असताना त्या घेऊन हिंडणारे कार्यकर्ते करतात काय, असा प्रश्न आहे. लोकसभा उमेदवाराला जास्तीत जास्त नऊ गाडय़ा वापरायची परवानगी आहे. विदर्भातल्या काही भागांत नक्षलवाद्यांचा हैदोस आहे. अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि यवतमाळ या जिल्हय़ांचे काही भाग आदिवासी आहेत, तर काही टोकाचे कुपोषणग्रस्त. उर्वरित जिल्हय़ात बऱ्यापैकी सधनता आहे. त्यामुळे पैसे फेकून निवडणूक जिंकता येऊ शकते, अशा मस्तीत वावरणाऱ्यांची संख्या कमी नाही. लोकसभेची ही निवडणूक कुचेष्टेचा विषय ठरते आहे. आपल्या भागाचे साधे साधे प्रश्नही माहीत नसणारे हे उद्याचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर काय करतील, हा प्रश्नच आहे. प्रश्न असूनही ते नाहीत, असे भासवणाऱ्या या प्रचारकांमुळे मतदारांमध्ये एक प्रकारचे नैराश्य आणि त्याचबरोबर उद्विग्नता आली आहे. त्यामुळे याच आठवडय़ात दक्षिण आफ्रिकेत पार पडणाऱ्या आणि भारतात केबलवरून प्रसारित होणाऱ्या ‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या २०-२० मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धाना जबरदस्त प्रतिसाद मिळाला, तर आश्चर्य वाटायला नको. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे निवडणूकपूर्व आणि मतदानोत्तर पाहणी यांना निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. इतकेच नव्हे, तर ज्या भागात या निवडणुका आहेत, त्या भागांचे प्रश्न वृत्तवाहिन्यांवर दाखवायलाही निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. घाऊकरीत्या ‘एसएमएस’ पाठवून प्रचाराला बंदी आहे, तरीही आपल्यापैकी बहुतेकांच्या मोबाइलवर घोषणायुद्ध येऊन धडकत असतेच. काही भागांत जिथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे, तिथे मतदानावर बहिष्कार घालायचा ‘आदेश’ त्यांनी दिला आहे. हा भाग संवेदनशील आहे आणि बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला हा एकप्रकारे निवडणूक आयोगाला नक्षलवाद्यांनी दिलेला धमकीवजा इशाराच आहे. लोकसभेच्या आजच्या मतदानात केरळमधल्या सर्वच्या सर्व २० जागांसाठी मतदान होईल. बिहारमध्ये ४० पैकी १३, उत्तर प्रदेशात ८० पैकी १६, आंध्र प्रदेशात ४२ पैकी २२, ओरिसात २१ पैकी १० आणि आसाममध्ये १४ पैकी तीन अशा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रासह ही महत्त्वाची राज्ये सोडता अरुणाचल, मणिपूर, मेघालय आणि काश्मीर या राज्यांमध्येही मतदान पार पडत आहे. काश्मीरमध्ये उद्याच्या फेरीत सहापैकी एकाच मतदारसंघात मतदान घेतले जाणार आहे. आज लालूप्रसाद यादव, मुरली मनोहर जोशी, के. चंद्रशेखर राव, रेणुका चौधरी, शशी थरूर आदी आपले नशीब आजमावणार आहेत. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे संगणकाशी लीलया खेळणारे म्हणून ओळखले गेले, पण सध्या ते पैशाच्या खेळातच जास्त अडकले आहेत. तिथे त्यांना काँग्रेसबरोबर चित्रपट अभिनेता चिरंजीवीचे आव्हान अधिक असल्याचे वाटते आहे. एकटय़ा आंध्र प्रदेशात आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी ५० कोटी रुपये जप्त केले आहेत. मतदारांना पैसे वाटण्याचे कृत्य आता उघडपणाने घडू लागले आहे. १०० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशात ७२ कोटी पात्र मतदार आहेत, त्यापैकी ११ कोटी मतदार हे पूर्णत: नवे आहेत. ते सर्वच्या सर्व मतदान करतीलच असे नाही, पण त्यांचे मतदान बऱ्याच अंशी निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या र्निबधांविषयी अनेक जाहीर सभांमधून वेडेवाकडे बोलले गेले आहे. तथापि, धनदांडग्यांची एकूण अवस्था लक्षात घेता या र्निबधांची आवश्यकता आहेच, असे स्पष्ट होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची संयुक्त पुरोगामी आघाडी, भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय लोकशाही आघाडी, डाव्यांची तिसरी आघाडी आणि लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान यांची चौथी (उप)आघाडी आणि मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचा स्वयंभू झंझावात अशांच्या लढती आहेत. याखेरीज फुटकळ पक्ष, उपपक्ष तसेच अपक्षही आणि छुपे वा उघड बंडखोर नेहमीप्रमाणे रिंगणात आहेत. यातल्या बऱ्याच राजकारण्यांना आता पंतप्रधानपदाची माळ आपल्याच गळय़ात पडेल, याची एकशे एक टक्के खात्री आहे. शक्य असते तर ‘आयपीएल’च्या कोलकाता नाइट रायडर्सच्या चार कर्णधारांच्या प्रयोगाप्रमाणे त्यांनी पाच वर्षांत पाच पंतप्रधान बनवायचा आणखी एक प्रयोगही आपल्या सुपीक डोक्यातून पुढे आणला असता, पण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतला त्यांचा पूर्वानुभव बेताचा असल्याने ते यास राजी होतील, असे नाही. काहीही करून ज्यांना पंतप्रधान बनायचे आहे, त्यांनी आतापासूनच तीन-तीन डगरींवर पाय ठेवून उभे राहायचा प्रयोग सुरू केला आहे. आजच्या मतदानाचे आणखी एक वैशिष्टय़ असे, की आजच्या फेरीत तीन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात थेट लढत होत आहे. उद्याच्या भाताची परीक्षा घ्यायला हे शीतही कदाचित उपयोगी ठरायची शक्यता आहे. सर्वच बाजूंनी प्रश्न उभे असताना या कोडय़ातून मतदार आपली सुटका कशी करतात, हे दिसून येणार आहे. आजच्या १२४ लोकसभा मतदारसंघांत २३ हजार खेडीही आपले भवितव्य ठरवायला मदत करणार आहेत, त्यांचे प्रश्न तर अनंत आहेत आणि त्यातून त्यांची सुटका कुणीच करू शकत नाही, अशी अवस्था आहे.