Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९

सुंदरबनातील सुंदरी जिजामाता उद्यानात
दर सहा महिन्यांनी एक विषय मुंबईत चर्चेचे मूळ धरतो. दरखेपेस पुन्हा पुन्हा तीच चिंता समोर येते. निसर्गप्रेमी प्रचंड हळहळतात. सामान्य माणसेही त्या विषयी चिंता व्यक्त करतात.. काही काळाने नेहमीच्या रामरगाडय़ात तो विषय मागे पडतो. सारेजण विसरून जातात. सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा काही तरी निमित्त होते आणि मग पुन्हा एकदा पूर्वीची राणीबाग आणि अर्थात आताचे जिजामाता उद्यान जाणार की, राहणार या भोवती चर्चा सुरू होते. चर्चेच्या या फे ऱ्या गेली अनेक वर्षे सुरूच आहेत. आणि या चर्चेत बऱ्यापैकी सत्यांशही आहे, हे वेळोवेळी सिद्धही झाले आहे. आताही पुन्हा त्या चर्चेचा सुरुवात झाली आहे. परंतु, या चर्चेवरचे लक्ष ढळू न देणे हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच त्या त्या ऋतूमध्ये ही बाग अनुभवणे हेही महत्त्वाचे आहे! किंबहुना आपण काय गमावणार आहोत, याची जाणीव अधिक तीव्र व्हावी असे वाटत असेल तर खास करून वसंतामध्ये या बागेला भेट द्यायलाच हवी. या बागेच्या वैशिष्टय़ाला तर अगदी त्याच्या प्रवेशद्वारापासूनच सुरुवात होते. प्रवेशद्वारीच द्वारपालाप्रमाणे दोन मोठे बावोबाब उभे आहेत. हे वृक्ष ओळखणे एकदम सोपे आहे. त्यांच्या घेरच प्रचंड आहे. एखादे झाड उलटे रोपावे तसे ते प्रथमदर्शनी भासते. एरवी वर्षांतील १० महिने ते निष्पर्ण असते. त्याचे शास्त्रीय नाव अॅडन्सोनिया डिजिटाटा. त्याला आपल्याकडे गोरखचिंच किंवा चोरआमली असेही म्हणतात. त्याला चोरआमली म्हणण्यामध्येही त्याचे वैशिष्टय़ दडलेले आहे. या झाडाचे खोड आकाराने प्रचंड असते. त्याचा वापर चोरटे लपण्यासाठी करतात. हा वृक्ष मूळचा आफ्रिकेतील आहे. तिथे तर काही हजार वर्षे एवढे वय असलेले बाओबाबही पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलियामध्ये एक बाओबाब सहा हजार वर्षे वयाचा आहे. याचे खोड एवढे मोठे असते की, आफ्रिकेतील एका बाओबाबच्या खोडात एक हॉटेल तर एका ठिकाणी चक्क एकाने घर थाटले आहे. आपल्याला जवळचा असलेला संबंध थेट गोरखनाथांशी जोडलेला आहे. असे म्हणतात की, गोरखनाथांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना याच वृक्षाखाली विद्यादानाचे पवित्र कार्य केले.

‘चांगभलं’मध्ये राज
‘मी मराठी’ वाहिनीवरील ‘चांगभलं’ या गम्मत-गप्रांच्या कार्यक्रमाने दर्शकांच्या मनाची चांगलीच पकड घेतली आहे. या शुक्रवारी रात्री ९ वाजता मकरंद अनासपुरे या हरहुन्नरी कलावंताने सादर केलेला ‘आबुराब’ चक्क राज ठाकरे यांना त्यांच्या घरी जाऊन भोटतो आणि विचारतो, ‘तुम्ही बाळासाहेब ठाकरे, जे शिवसेनाप्रमुख आहेत, डिट्टो त्यांची कार्बनकॉपी करायचा प्रयत्न करता अशी लैय लोकं बोंब मार्तात.. नेमकं काय आहे? कधी भरून येतं का हो तुम्हाला आठवणींनी..? वाटतं का काधी की जावं त्याही घरी आणि सगळ्यांना मिठीत घ्यावं.. खूप भांडावं कडाकडा आणि हक्कानं, हट्टानं पोटभर जेवून यावं? तसंच परभाषिक म्हणून तुम्ही अशा एखाद्या माणसाचा द्वेष करता का? मराठी माणसावर दया दाखवता?’ या सगळ्या गप्पांत रंगलेला आणि उत्स्फूर्तपणे चक्क व्यंगचित्र रेखाटणारा राज या शुक्रवारी, रात्री ९ वाजता ‘मी मराठी’ वाहिनीवर तमाम रसिकांच्या भेटीला येत आहे.
प्रतिनिधी

‘जोडी जमली रे’मध्ये घरजावयांची चर्चा..
‘जोडी जमली रे’मध्ये आज, गुरुवारच्या भागात स्पर्धक, त्यांचे पालक आणि सूत्रसंचालक जोडी या सगळ्यांमध्ये लग्नाशी संबंधित अनेक विषयावर चर्चा रंगणार आहे. विशेष म्हणजे मुलाला घरजावई व्हायला आवडेल का या विषयावर स्पर्धक चर्चा करणार आहेत. इंटरॅक्टिव्ह खेळ, ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’ याशिवाय लग्न, समाज, चालीरीती यावरील साधकबाधक चर्चा, तज्ज्ञांचे अनुभवी मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम अन्य रिअॅलिटी शोपेक्षा काहीसा वेगळा आहे.
अनुरूप जोडीदार निवडण्याची अभिनव पद्धत या कार्यक्रमाद्वारे सादर केली जात आहे. गुरुवारच्या भागात घरजावई विषयावरील चर्चेत अनुप, सागर आणि मनीष या स्पर्धकांची मते समजणार आहेत. तसेच पुन्हा एकदा जोडीदार बदलले जाणार आहेत. या भागात गायत्री-मनीष, अर्चना-अनुप आणि अनघा-सागर अशा जोडय़ा असतील. ही अदलाबदल केल्यामुळे अनुरूपतेचा निकष पूर्ण करण्यासाठी स्पर्धक मनोरंजक खेळ खेळतील. त्यातून त्यांची ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’ घेतली जाईल. त्याशिवाय हिंदी चित्रपटांची नावे मूकाभिनय करून ओळखण्याचाही खेळ पाहायला मिळेल. यात पालक आणि कविता मेढेकर-अतुल परचुरे ही सूत्रसंचालक जोडीही स्पर्धकांना
मदत करून धमाल उडवतील. स्टार प्रवाहवरील हा कार्यक्रम रात्री १० वाजता प्रसारित होत आहे.
प्रतिनिधी