Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीचा मार्ग बिकट
रावेर
जयप्रकाश पवार

रावेर लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक भाजपचे उमेदवार खा. हरिभाऊ जावळे यांना ‘नवा भिडू, नवा डाव’ याप्रमाणे ‘नवा मतदारसंघ, नवा प्रतिस्पर्धी’ अशारितीने लढावी लागत आहे.

 

नीतिमत्ता, साधनसुचिता व स्वयंशिस्त या त्रिसूत्रीचे आचरण करणाऱ्या भाजपच्या प्रतिमेला बट्टा लावण्याचे काम कुणी केले तर या मतदारसंघातील पक्षाच्याच खासदाराने केले होते. अशी एकूण काळीकुट्ट पाश्र्वभूमी असताना हरिभाऊंनी २००७ च्या पोटनिवडणुकीत जळगावमधून निवडणूक लढविताना राष्ट्रवादी उमेदवारावर मात केली. ‘मराठा विरुद्ध लेवा पाटील’ समीकरणात त्यांनी बाजी मारल्याने यावेळी पुनर्रचित रावेरमधून एक अनुभवी खेळाडू म्हणून पक्षाने त्यांना उभे केले. पण राष्ट्रवादीचे उमेदवार विधीज्ञ रवींद्र पाटील हेही कमी अनुभवी नाहीत. नाही म्हणायला पाटील ज्या काही निवडणुका लढले त्यात त्यांची कधी हार तर कधी जीत झाली. तथापि, निवडणूक आखाडय़ातील उमेदवारांच्या गर्दीतून वाट काढण्याचे दिव्य दोघांनाही पार पाडावे लागेल.
आताचा रावेर अन् यापूर्वीच्या जळगावमध्ये भाजपचे एकनाथ खडसे यांचा दबदबा आहे. ‘कधी तळ्यात तर कधी मळ्यात’ यानुसार कधी काँग्रेस, काहीकाळ राष्ट्रवादी, आता शिवसेनेत असलेले सुरेश जैन आणि खडसे यांचे अलीकडे बऱ्यापैकी राजकीय सूत जमले. त्याचे दृष्यपरिणाम येत्या निवडणुकीत दिसू शकतात.
जावळेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने अ‍ॅड. पाटलांना पुढे केले. याच पाटलांनी विधानसभा निवडणुकीत एकदा खडसेंना निकराची लढत दिली. त्यात त्यांना सुमारे दोन हजारांनी पराभूत व्हावे लागले तरी दिग्गजालाही नामोहरण करू शकतो हा आत्मविश्वास त्या लढतीतून ते मिळवू शकले. हा अनुभव घेवून पाटलांनी जावळे यांचा मार्ग रोखण्याचा चंग बांधला आहे. पूर्वीच्या जळगावमधून सलग दोनवेळा विजयी झालेले वाय. जी. महाजन लाचप्रकरणात अडकल्याने पक्षाची पुरती नाचक्की झाली.
जावळे यांच्या रुपाने पक्षाने पोटनिवडणुकीत कशीबशी जागा कायम राखली. बसपानेही सोशल इंजिनिअरिंगचा फाम्र्यूला अमलात आणत मराठा समाजातील सुरेश पाटील यांना रिंगणात उतरविले. जावळे यांच्यासाठी डागळलेली पक्ष प्रतिमा, रवींद्र पाटलांना भुसावळमधील पक्षार्तगत बंडाळी या प्रश्नांना तोंड देणे अपरिहार्य असले तरी त्यातूनच त्यांना मार्गही काढावा लागेल.

प्रचाराचे मुद्दे

खा. हरिभाऊ जावळे
शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा, सिंचनाची व्यवस्था, रासायनिक खते वेळेवर उपलब्ध व्हावीत.

अ‍ॅड. रविंद्र पाटील
लोकाभिमूख सरकार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिला बचत गटांना कर्जपुरवठा.

२००७ च्या पोटनिवडणुकीचे चित्र
पूर्वीच्या जळगावमधून भाजपचे हरिभाऊ जावळे यांच्याकरवी राष्ट्रवादीचे डॉ. अर्जून भंगाळे २५ हजार मतांनी पराभूत.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न

रेल्वेशी संबंधीत प्रश्न, केळी-कापूस आणि ऊसाशी संबंधीत प्रश्न. शेती सिंचन. भूगर्भातील खोलवर गेलेल्या पाणी पातळीची समस्या.

एकूण काय? - खासदार लाचखोरीच्या पाश्र्वभूमीवर जळगावातील विजयी पंरपरा रावेरमध्ये टिकविण्याकरीता भाजपाची सत्वपरीक्षा.