Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पडद्याआडील लढतच अधिक चर्चेत
जळगाव
अविनाश पाटील

पोटनिवडणुकीवेळी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीचे तत्कालीन व सध्या शिवसेनेच्या वरच्या पंक्तीत स्थान मिळविलेले नेते सुरेश जैन स्वत: उमेदवार नसतानाही पराकाष्टा करीत

 

असल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघात हाच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अ‍ॅड. वसंत मोरे विरूध्द भाजपचे ए. टी. पाटील अशी मुख्य लढत या मतदारसंघात वरवर दिसत असली तरी जैन यांच्या कडवट भूमिकेमुळे मोरे विरूध्द जैन असे स्वरूप या लढतीला प्राप्त झाले आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी भाजपचे एम. के. अण्णा पाटील यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने पूर्वाश्रमीच्या एरंडोल मतदारसंघात २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या जैन यांनी मोरे यांच्या पराभवाचा विडा उचलला होता. परंतु सहानुभूतीच्या लाटेवर मोरे विजयी झाले. पुनर्रचनेनंतर आता जळगाव मतदारसंघात जैन यांच्या वर्चस्वाखालील जळगाव तालुक्याचा समावेश करण्यात आल्याने भाजपचे उमेदवार ए. टी. पाटील यांचा विजय त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे.
पोटनिवडणुकीतील पराभूत उमेदवार आ. डॉ. बी. एस. पाटील यांच्याऐवजी राष्ट्रवादीमधील असंतुष्ट ए. टी. पाटील यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील निष्ठावंतांचा एक गट नाराज आहे.
एटींना उमेदवारी देण्यात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे. दोघे उमेदवार पारोळ्याचे असल्याने पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या या तालुक्यात मतविभागणी अनिवार्य आहे.
जळगावमधून विधानसभेवर सलग आठ वेळा निवडून येणाऱ्या सुरेश जैनांमुळे जळगाव शहर व ग्रामीण मतदारसंघात भाजपला फायदा होण्याची स्थिती आहे. एरंडोलमध्ये सेना, राष्ट्रवादी समान तर अमळनेरमध्ये भाजपचे वर्चस्व, पाचोऱ्यात सेना, चाळीसगावमध्ये युती व आघाडी समसमान, असे चित्र आहे. पोटनिवडणुकीत मोरे यांना भरभक्कम आघाडी देणारा चोपडा विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी रावेरला जोडला गेल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम राष्ट्रवादीच्या मताधिक्यावर होऊ शकतो. मराठा समाजाचे दोन्ही उमेदवार असल्याने जातीय प्रचाराला आपोआपच पायबंद बसण्याची चांगली गोष्टही घडली आहे.
प्रचाराचे मुद्दे

अ‍ॅड. वसंत मोरे
जळगाव-सोलापूर रेल्वेसाठी प्रयत्न, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत रस्त्यांची कामे, २२ महिन्यांच्या कालावधीत खासदार निधीतून केलेली शंभर कोटींची कामे

ए. टी. पाटील
पाडळसरे प्रकल्प पूर्ण करणार, महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण, सिंचनासाठी विशेष योजना

२००७ च्या पोटनिवडणुकीचे चित्र
पूर्वीच्या एरंडोल मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे अ‍ॅड. वसंत मोरे यांनी भाजप-सेना युतीचे डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर ५२ हजार मतांनी मात केली.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
सिंचन प्रकल्पांअभावी ग्रामीण भागात भेडसावणारी टंचाईची समस्या, जैन इरिगेशन वगळता बडय़ा औद्योगिक प्रकल्पांची वानवा, रस्त्यांची बिकट अवस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्या इत्यादी.

एकूण काय? - जैन-खडसे यांच्या वर्चस्वाचे काँग्रेस आघाडीपुढे आव्हान