Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘ हम तो डुबेंगे सनम, लेकीन तुम्हे लेके डुबेंगे’
जॉर्जनितीने एनडीए हैराण
समर खडस

आणीबाणी मागे घेतल्यानंतर १९७७ साली जॉर्ज फर्नाडिस यांनी पहिल्यांदा मुजफ्फरपूर या मतदारसंघातून निवडणूक लढविली. जॉर्ज यांना आणीबाणीत बडोदा डायनामाईट खटल्यात अटक

 

झाल्याने आणीबाणी संपली तरीही त्यांची तुरुंगातून सुटका झाली नव्हती. तुरुंगातूनच त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला होता. त्यामुळे मतदारसंघात एकही दिवस प्रचार करण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यांचे दंडाबेडी घातलेले छायाचित्र असलेले पोस्टर बिहारमधील प्रत्येक मतदारसंघात त्यावेळी लागले होते आणि संपूर्ण बिहारमध्ये एकच घोषणा निनादत होती ‘‘जेल का ताला टुटेगा जॉर्ज फर्नाडिस छुटेगा..’’
स. का. पाटीलसारख्या मोठय़ा नेत्याला हरवून ‘जायंट किलर’ ठरलेले जॉर्ज नंतर मुंबईतून हरले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ते मुजफ्फरपूरहून जिंकले तेव्हाच झाली होती. आज त्याच मुजफ्फरपूरमधून पुन्हा एकदा एकाकी जॉर्ज निवडणूक लढवत आहेत. शारीरिकदृष्टय़ा थकलेले जॉर्ज हे या निवडणुकीत हास्यास्पद ठरतील, असे अनेकांना वाटत होते. मात्र त्यांना समजाविण्यासाठी अडवाणी यांना जसवंत सिंग यांची नेमणूक करावी लागली यातच त्यांची राजकीय शक्ती दिसून आली आहे.
राजकारणात कोणीही कुणावरही उपकार करत नाही. अनेकदा समोर उभ्या असलेल्या सख्ख्या नातेवाईकांशी, मित्रांशीही दोन हात करावे लागतात. नातीगोती बाजूला ठेवून का लढले पाहिजे, हेच तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरूक्षेत्राच्या रणांगणावर समजावून सांगितले होते. राजकारणात शक्ती असली तरच सगळे विचारतात अन्यथा तुम्ही विजनवासात जाता हा साधा नियम आहे. जॉर्ज यांच्यामागे कोणताही जनाधार उरलेला नाही, असे वाटणाऱ्यांना जेव्हा त्यांच्यामागे भूमीहार आणि राजपूत या दोन जाती एकवटताना दिसू लागल्या तेव्हा चालता-बोलता न येणाऱ्या जॉर्ज यांची मनधरणी करण्यासाठी भाजपला धावपळ करावी लागली, तर नितीश यांच्या चेहऱ्यावरील मिश्किल हास्य जाऊन कपाळावर आठय़ा उमटू लागल्या.
उद्या बिहारच्या पहिल्या टप्प्यात ज्या १३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे, त्यातील तीन ते चार मतदारसंघ हे नक्षलग्रस्त आहेत. त्यातील जमुई मतदारसंघात दिग्विजय सिंग आणि जॉर्ज फर्नाडिस यांचा समर्थक उभा राहिल्याने तेथील राजपूत मते एकवटली आहेत. जनता दल (यु)चा उमेदवार यापूर्वी या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारताना दिसत होता. मात्र फर्नाडिस यांच्या समर्थकांमुळे आता हा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल झाला आहे.
हाच प्रकार मुजफ्फरपूर, बांका, मुंगेर, भागलपूर आदी मतदारसंघांमध्ये झाला आहे. जॉर्ज फर्नाडिस मुजफ्फरपूरमधून जिंकतील, असेही अनेकांचे म्हणणे आहे. मात्र ते जिंकतील किंवा नाही, हा वादाचा मुद्दा असला तरीही जनता दल (यु)चे कॅप्टन जयकुमार निषाद यांना कुठल्याही परिस्थितीत ही जागा जॉर्ज यांच्यामुळे जिंकता येणार नाही, असे बोलले जाते. तोच प्रकार बांका मतदारसंघात दिग्विजय सिंग जिंकले नाही तरीही जनता दल (यु)चा उमेदवारजिंकण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. त्यामुळे जॉर्ज-दिग्विजय या जोडगोळीमुळे जनता दल (यु) आणि भाजपच्या सहा ते सात जागा खड्डय़ात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फर्नाडिस यांना पटविण्याचा जेव्हा भाजपकडून प्रयत्न केला गेला तेव्हा फर्नाडिस यांनी त्यांना वेगळेच गुपीत सांगितले. नितीश निवडणुकीनंतर एनडीएबरोबर राहणार नाहीत, त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा त्याच्यावरच अधिक लक्ष ठेवा, असा सल्ला जॉर्ज यांनी अडवाणी यांना दिल्याचे समजते. पंतप्रधानपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकेक जागा जोडण्याच्या प्रयत्नात असलेले अडवाणी त्यामुळे हिरमुसले असले तरी थकलेल्या जॉर्ज यांना समजाविण्याची कला त्यांना जमलेली नाही. एकंदर पाहता जॉर्ज फर्नाडिस यांची ‘पोलिटीकल इनिंग’ या निवडणुकीत संपली तरीही त्यांचे ध्येय एकच आहे. ‘ हम तो डुबेंगे सनम लेकीन तुम्हे लेके डुबेंगे’ म्हणत जॉर्ज यांनी दिग्विजय या त्यांच्या शिष्याच्या मदतीने दुसरा शिष्य नितीश कुमार यांच्यासमोर मोठा पेच उभा केला आहे. या पेचातून नितीश सहीसलामत सुटतात की अडकतात हे लवकरच पहायला मिळणार आहे.