Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उत्तर भारतीयांना पूर्ण संरक्षणाचे राहुल गांधी यांचे आश्वासन
मधुबनी, १५ एप्रिल/ पीटीआय

उत्तर भारतीयांविरोधात कथित द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे

 

यांच्यावर थेट हल्ला चढवून काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी मुंबई वा इतरत्र नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना पूर्ण सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन देऊन, राज ठाकरे यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले.
भारत एकसंध राष्ट्र आहे. राज ठाकरेंना उत्तर भारत व तेथील जनता वेगळी वाटत असेल आणि ते त्यांचा तिरस्कार करत असतील तर त्यांना तसे खुशाल करू द्या, तुम्ही मात्र त्याकडे कृपा करून दुर्लक्ष करा. मुंबई, दिल्ली, तामिळनाडू, पंजाब वा कोणत्याही राज्यात नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना सुरक्षा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने गेल्या पाच वर्षांत दलित, गरीब आणि तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी जे जे शक्य आहे ते केले आहे. बिहारमध्ये काँग्रेस लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवत आहे हे चांगलेच आहे, असे सांगून राहुल गांधी यांनी एकीकडे भारत प्रगती करत असताना मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारची मात्र पीछेहाट होत असल्याची टीका केली. बिहारमध्ये केंद्र सरकारच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे या राज्यातील लाखो लोक नोकऱ्यांसाठी इतर राज्यांत जातात. गेल्या पाच वर्षांत यूपीए सरकारने दलित, गरीब, आणि शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. गरिबांसाठी अनेक योजना आणल्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.
मधुबनी येथे काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री शकील अहमद यांच्या प्रचारासाठी ते आले होते.